चित्रकार - भाग १

'निवारा' च्या लहानग्या मंचावर प्रोफेसरांचा सत्कार होत होता. प्रोफेसर निखारगे. खरंतर प्रोफेसर ही पदवी केवळ नावालाच. ते एक उत्कृष्ट चित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. निवारा या अनाथाश्रमासाठी त्यांनी मोलाचं सहकार्य केलं होतं. तिथल्या काही मुलांची जबाबदारी स्वीकारली होती. वर्षातून दोनदा आश्रमाला त्यांची भरभक्कम देणगी ठरलेली असायची. त्यांच्या व्यग्र जीवनशैलीतून वेळात वेळ काढून ते आश्रमाच्या मुलांना भेटायला यायचे. त्यांना खाऊ खेळणी आणायचे. जणू ते आश्रमाचे पालनकर्तेच झाले होते.


प्रोफेसरांचं भाषण संपलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. आश्रमप्रमुखांनी त्यांना कार्यक्रमानंतर थोडावेळ थांबण्याची विनंती केली. त्यांनीही ती आनंदाने स्विकारली. निरोपाचे शब्द बोलून मान्यवरांनी कार्यक्रमाची सांगता केली. विनंती मान्य केल्यानुसार प्रोफेसर थांबले. मुलांमध्ये रमले. त्यांची नजर एका गोंडस मुलावर पडली. तो मुलगा आश्रमात नवीन होता.


"सर, हा मुलगा कोण?"


"तो होय, तो परवाच आलाय इथे. कुणा गरिबाने सोडलंय त्याला आमच्या नकळत. तशी सोयही आहे आपल्याकडे. तुम्हाला माहीतच आहे. तरी बऱ्यापैकी रुळलाय म्हणायचा इथे."


"बरं बरं, मी त्याचं पोट्रेट करू शकतो का?"


gudhgarbh , chitrakar , gudhkatha , गूढगर्भ , गूढकथा , चित्रकार


"करा की, हे काय विचारणं झालं? तुम्हाला वेळ आहे आता? म्हणजे तुम्ही थांबताय आता?" आश्रमप्रमुखांनी हसत विचारणा केली.


"नाही नाही, पुढल्या वेळेस येताना आधी कळवीन तुम्हाला. खूप एकटं वाटतंय हो." शेवटचं वाक्य प्रोफेसर कुणाला कळेल न कळेल इतपत मोठ्याने म्हणाले.


प्रोफेसरांनी आश्रमप्रमुखांचा निरोप घेतला आणि ते तडक त्यांच्या बंगल्यावर आले. बक्षीर तालुक्यात मारद नावाच्या गावी त्यांचा टुमदार बंगला होता. गाव कसलं ते एक प्रकारचं रान होतं. त्यांचा हा बंगला शहरापासून फारच लांब होता. त्यांच्या बंगल्यावर त्यांचा नोकर आणि ते असे दोघेच राहत. बंगल्याच्या प्रवेशद्वाराला लागूनच स्वयंपाकघर, समोर बैठकीची खोली, तिच्या डावीकडे गेलेला पॅसेज आणि त्याला जोडलेली प्रोफेसरांची स्टडीरूम. स्टडीरूम ही प्रोफेसरांची आवडीची जागा होती. बंगल्याच्या सर्व खोल्यांपासून ती वेगळी असल्यासारखी वाटायची. वरच्या मजल्यावर चार खोल्या. ज्या नेहमी बंद असायच्या.


प्रोफेसर घरी येताच नोकराने त्यांना पाणी दिलं. कार्यक्रम कसा झाला त्याबद्दल विचारलं. पण प्रोफेसर दुसऱ्याच कुठल्यातरी गहन विचारात गढलेले होते. नोकराने त्यांना चहाची विचारणा केली. त्याला चहा ठेवायला सांगून ते त्यांच्या स्टडीरूम मध्ये निघून गेले. पॅसेजमध्ये मंद दिवे लावले होते. स्टडीरूमच्या सर्व भिंतींवर व्यक्तिचित्रे म्हणजेच पोट्रेट्स लावली होती. त्यातल्या काही चित्रांतील व्यक्तींचे चेहरे उतरले होते. ओढल्यासारखे वाटत होते. खोलीच्या एका कोपऱ्यात एका कागदी खोक्यात बॉक्समध्ये जुनी पेंटिंग्स ठेवली होती. प्रोफेसर कितीतरी वेळ त्यांची स्वतःचीच चित्र निरखित होते.


No comments:

Post a Comment