स्ट्रेचरवरचा माणूस

एकदा माझ्या बाबांना फोन आला. तातडीने निघावं लागणार होतं. आमच्या भावकीतील नातेवाईकाला अपघात झाला होता. त्याला एका सरकारी इस्पितळात नेले. पण घाव वर्मी बसल्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला. सर्व सोपस्कार पार पडून मृतदेह मिळायला तसा बराच वेळ लागणार होता. रात्रीची वेळ. मग जमलेले नातेवाईक व इतर मंडळी विरंगुळा म्हणून इस्पितळाच्या परिसरात असलेल्या गवताळ जागेत गेले...आणि मग प्रत्येकजण आपापल्या परीने तो विरंगुळा एन्जॉय करु लागला. कोणी तंबाखूचा बार भरला. कोण हळूच डोळा चुकवून देशी दारूचा घोट घेत होता. बीडी शिग्रेटचे धूर निघू लागले.

बाबा निर्व्यसनी असल्याने त्यांच्यात रमले नाहीत. ते एकटेच त्या हिरवळीवर फिरत होते. अचानक त्यांचं लक्ष काही अंतरावर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेकडे गेले. आत गडप अंधार होता. पण स्ट्रेचरवरच्या मृतदेहाची पांढरी चादर स्पष्ट दिसत होती. बाबांचं कुतूहल दांडगं होतं .गाडीत काय आहे ते पाहिल्याशिवाय त्यांना चैन पडेना. ते गेले गाडीजवळ. स्ट्रेचरवरच्या त्या मृतदेहाच्या डोक्यापासून पायापर्यंत चादर घातली होती.

"ही बॉडी अशी का ठेवलीय? असो. बेवारशी असेल."


gudhgarbh , goodhgarbh , gudhkatha , strecharvarcha manus , https://gudhgarbh.blogspot.com/2020/11/blog-post_17.html

असं म्हणून मागे वळणार तोच ती बॉडी उठून बसली. अंगावर पांघरलेली चादर तशीच होती. बाबांची पाचावर धारण बसली. भर थंडीत घाम फुटला. कसेबसे धडपडत ते भावकीच्या जमावाजवळ आले आणि त्यांनी माझ्या काकांना घडलेला प्रकार सांगितला.

काका म्हणाले, "मी बघतो. मला दाखव ती जागा."

दोघे रुग्णवाहिकेजवळ गेले. परंतू आता तिथे मघाच्या घटनेचा मागमूसदेखिल नव्हता.

"आता काय म्हणावं याला", बाबा विचारात पडले. एव्हाना भावकीतल्या नातेवाईकाचा मृतदेह ताब्यात आला होता. सर्व सोपस्कार पूर्ण झाले होते. आता निघणार, एवढ्यात मागून आवाज आला....

"अरे ए नरसाळ्या... तो स्ट्रेचरचा दरवाजा उघडाच टाकलास व्हय रं... ठावं हाय ना मागच्या येळेला आत कुत्रं शिरलेलं ते... सायेब किती आरडले व्हते म्हायतेय ना... नि त्या कुत्र्याची घाण काडाया लागली ती येगळीच."

बाबांनी त्याला विचारलं, "का रे, मघाशी त्या गाडीत बॉडी होती ना... ती नेली काय?"

"बॉडी कसली... आवं... हा नरसू झोपला व्हता...सायबांनी बगितलं तर वरडतात म्हनून तो निस्ता चादर घेऊन झोपतो... लाईट बी लावत नाय." त्याने खुलासा केला.

ते ऐकून जमावात हास्याचा कडेलोट झाला आणि बाबांनी कपाळावर हात मारला.


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


अनाहूत


No comments:

Post a Comment