वारसा - भाग ८

"आपल्या म्हणजे? तुमचं वाड्याशी नातं काय?"

"मी रघुनाथ, दादा आणि गोदाक्काचा धाकटा भाऊ. तुझा काका." विश्वनाथ स्तंभित होऊन बघत राहिला.

"द्वारकानाथाने म्हणजे दादांनी ऐन विशीत लग्न केलं पण त्यांना संतान नव्हती. गोदाक्काचं लग्न दादांच्या आधी झालेलं. पण तिचीही कूस उजवली न्हवती. तिच्या पोटी आलेलं मूल जगत नसे. अशीच दहा वर्ष गेली. गोदाक्का तीनदा गर्भारशी राहिली होती. तीनही वेळेस तोच अनुभव आलेला. अशातच तिचा नवरा वारला. सासरच्या जाचाला आणि टोमण्यांना कंटाळून ती कायमची माघारी आली. मी त्या दरम्यान बोर्डिंगात होतो शिक्षणासाठी. अधूनमधून यायचो. असंच एकदा सुट्टीत आलो होतो. दादा कसलीतरी उपासना करत होते. गोदाक्का तिचा झालेला छळ विसरून वहिनीला त्रास द्यायची. मला तिचं वागणं पटायचं नाही. आमच्यात नेहमी वाद व्हायचे. मी असलो की वहिनीला आधार असायचा. मग पुन्हा तेच. एकदा मी कंटाळून कायमचा वाड्याबाहेर पडलो. मला वाड्याबद्दल कधीच लालसा वाटली नाही. आजही वाटत नाही. मी स्वतःचा व्यवसाय सुरु करायचं ठरवलं. त्यासाठी आधी आवश्यक ते व्यावसायिक शिक्षण घ्यायला म्हणून मला बाहेर जावंच लागणार होतं. दादाची साधना पूर्ण होत आलेली. मी ठरवलं. आपला जम बसला की येऊन वहिनीला घेऊन जायचं. गोदाक्का माझं तोंड देखील पहात नव्हती. मी दादांच्या परवानगीने बाहेर पडलो. ते बरोब्बर पंधरा वर्षांनी आलो. पेठेत माझ्या कानावर आलंच होतं म्हणून मी थेट ओळख न दाखवता कामासाठी नोकर म्हणून राहिलो. माझा एकंदर अवतार पाहून मला कुणीच ओळखलं नाही. जाताना जरतारी कोट-टोपी घालून गेलेला रघुनाथ आज दाढी वाढवून फाटक्या कपड्यात शंभुनाथ होऊन काम मागायला आला होता. खऱ्या खोट्याची शहानिशा करण्यासाठी मी हे नाटक केलं. मला या सगळ्याच्या मुळापर्यंत जायचं होतं. मी माझं बस्तान बसवलं होतं पण वहिनीसाठी मला हे नाटक करणं गरजेचं होतं." शंभुनाथ खिन्नपणे म्हणाला.


gudhgarbh , goodhgarbh , gudhkatha , vaarsaa , part 8 , https://gudhgarbh.blogspot.com/2020/10/blog-post_15.html , गूढगर्भ , गूढकथा , वारसा , भाग ८


"सर्व घर गोदाक्काच्या ताब्यात होतं. मी आडून आडून दादा दिसतोय का ते पाहायचो. पण तो काही दिसला नाही. वरच्या खोलीतून फक्त वस्तू पडल्याचे, ओरडायचे आवाज यायचे. त्याची शक्ती क्षीण झालेली. त्याच खोलीत तर भुयार होतं. मला त्या खोलीजवळ जायची मनाई होती. मालक बाहेरगावी गेलेत असं गोदाक्काने मला सांगितलं होतं. आमच्या थोरल्या वहिनींवर त्यानं घाला घातला. यशोदा वहिनीला अभद्राची चाहूल लागली होती. गोदाक्का जबरदस्ती वहिनीला त्या खोलीत पाठवणार होती. ती वहिनीला फरफटत ओढत घेऊन चाललेली. अचानक झटापटीत तिचा हात सुटला, वहिनीचा तोल गेला आणि ती पायरीवरून खाली पडली.  माझ्या डोळ्यांदेखत मी घरच्या सुनांचा बळी जाताना पाहत होतो पण मी काय करू शकणार होतो. दादांची साधना पूर्ण झाली होती. वाड्यात नव्याने जन्माला येणारा जीव तो वारसा पुढं चालवणार होता. म्हणूनच मी जाणूनबुजून अविवाहित राहिलो. वारस जपावा तर वाडयाच्या मालकाचा बळी जाणार, मालकाला वाचवावं तर वाड्याचा वारस जाणार. यातून कसं बाहेर पडायचं हेच कळेनासं झालंय."


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


वारसा - भाग ७

* अनाहूत

* दत्तकृपा 

No comments:

Post a Comment