रघ्याची बायको - भाग २

          तिने ही गोष्ट रघ्याच्या कानावर घातली. लग्न झालेलं नसतानाही तिची किरकिर असायची आणि आता झालंय तर बायकोबद्दल सांगून किरकिर करते. हिला माझ्या कष्टाचं कायच नाय. असा विचार रघ्याला सतावायचा. पण शेवटी तिचाच आधार होता आजपर्यंत त्याला म्हणून गप्प बसायचा.      

सासू शांतेशी बोलेनाशी झाली. बिचारी शांता एकटी पडली. तिने एक शक्कल लढवली. कापडाची बाहुली तयार केली तीही माणसाच्या उंचीची. आत चिंध्या भरल्या. काजळाने डोळे नाक रंगवले. कुंकवाच्या गंधाने तोंड काढलं आणि सासूचं जुनं लुगडं नेसवलं. आता ती त्या बाहुलीलाच सासू समजून तिच्याशी गप्पा मारायची. स्वैपाक करताना बाहुलीला विचारायची सासूबाई मीठ किती घालू, तिखट बरोबर आहे ना आणि स्वतःच्या अंदाजाने स्वैपाक करायची. हळूहळू तिची प्रगती होत गेली. ती चांगला स्वैपाक करायला शिकली. सून सुधारली म्हणून रघ्याची आई तिच्याकडे लक्ष द्यायची नाही. तिला त्या बाहुलीबद्दल अजिबात माहिती नव्हती. शांता तिला स्वैपाकघरातल्या माळ्यावर लपवून ठेवायची. एकदा सासू बाहेर गेलेली. शांता बाहुलीला घेऊन ओटीवर बसली आणि तिच्याशी गप्पा मारू लागली. शेजार पाजारच्या बायकांनी हे पाहिलं. त्यांना वाटलं शांताला वेड लागलंय. त्यांनी ही गोष्ट रघ्याच्या म्हातारीच्या कानावर घातली. तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तरातरा येऊन ती शांताला शोधायला लागली. शांता चुलीपाशी बसली होती. बाजूला बाहुलीला बसवलेली. लोकं म्हणतात ते खरंच असं समजून तिने शांताचा हात पिरगाळला. तिला खेचतच ओटीवर आणलं आणि म्हातारीच्या तोंडाचा पट्टा चालू झाला.

"काय गं भवाने, तुला म्हनं येड लागलंय. कुनाशी बोलत असतेस तासनतास? ह्या.... ह्या भावलीशी? समदे येड्यात काडतात तुला. नि तुझ्यामुळं नाय नाय ते ऐकावं लागतंय मला. मला वाटलं आता सुदारली. पर हिचं याड वाढतच चाल्लय." शांता निमूटपणे सर्व ऐकून घेत होती. 

"तुला इथं थार केला ना हीच चूक झाली. लय नाटकं पाह्यली तुजी. आता बास. तुजी भावली घे नि चालू पड इथनं. पुन्हा थोबाड नाय बगायचं तुज. चल, चालती हो आदी इथनं."


gudhgarbh , goodhgarbh , raghyachi baayko , part 1 , https://gudhgarbh.blogspot.com/2020/10/blog-post_30.html , गूढगर्भ , गूढकथा, रघ्याची बायको

 

म्हातारीने तिला हाताला धरून बाहेर काढलं. शांता गयावया करत होती. रडत होती. पण म्हातारीला पाझर फुटला नाही. शेजारच्या बायका ओटीवर उभ्या राहून तमाशा बघत होत्या. एकही बाई तिला थांबवायला पुढे आली नाही. कारण रघ्याच्या म्हातारीच्या नादी लागणं हे कुण्या शहाण्याचं काम नाही हे त्यांना पक्क ठाऊक होतं.

"तुम्ही काय तमाशा बघताव? चला सुटा इथनं." म्हातारीच्या एका आवाजानं बायकांचा घोळका पांगला.

शांता रडत चालली होती. मारामुळे अंग ठणकत होतं. अंधार पडायला लागला होता. रस्त्यावरची माणसं तिच्याकडे वळून वळून पाहत होती. त्यांच्या नजरेपासून दूर जाण्यासाठी ती रानातल्या टेकडीच्या दिशेला जायला लागली. टेकडी खाडी पलीकडे होती. पुढे शांताचं गाव होतं. त्यामुळे तिला टेकडीलगतचा रानातला परिसर ओळखीचा होता. खाडीवरचा अरुंद पूल तिने ओलांडला. पुढं जावं की न जावं या संभ्रमात पडलेली असताना तिने एकवार हातातल्या बाहुलीकडे नजर टाकली. अंधारात बाहुलीचा धूड भयानक वाटत होतं पण तिच्या लेखी ती बाहुली तिची सासू होती. तिने बाहुली छातीशी घट्ट धरली आणि पुढे चालू लागली. पाहता पाहता ती गावापासून बरीच दूर आली. चालता चालताच तिला कनवटीला ठेवलेल्या पानाची आठवण झाली. लागलीच तिने कनवटीचं पान सोडवून त्याचा तोबरा भरला.

टेकडीला वळसा घालून गाडीरस्ता गेला होता. ठराविक वेळेत सुटणाऱ्या एस.टी. सोडल्या तर गावात इतर कोणतंही वाहन कधी दिसायचं नाही. गाडीरस्ता सोडून आत एक पायवाट गेली होती. थोडं अंतर चालल्यावर जरा मोकळी जागा होती. तिथे एक संगमरवरी शिळा आडवी ठेवली होती आणि त्याला लागूनच एक मोठा दगड ठेवला होता. बाजूला एक मोठ्या घेराचं आंब्याचं झाड होतं. सभोवार आमराई होती. रातांब्यांचं बन होतं. या जागेत ती दिवस ढवळ्या बरेचदा येऊन गेली होती. टेकडीपलीकडे तर गाव होतं तिचं. यावेळी मात्र ती इतर कोणताही विचार करायच्या मनःस्थितीत नव्हती. सुन्न होऊन ती त्या आंब्याच्या झाडाला टेकून बसली.


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


* रघ्याची बायको - भाग १

दत्तकृपा

अनाहूत

* वारसा 

2 comments: