रिटर्न गिफ्ट – भाग ५

 

सकाळी कचेरीत त्याला चाळीचे मालक भेटायला आले होते.

"अरे मालक, तुम्ही इथे कसे काय?"

"मी तुम्हाला भेटायलाच आलो.जरा बोलायचं होतं."

"हो, बोला ना."

"मी पुन्हा चाळीत परत येणार नाही. म्हणजे आम्ही कायमचे वर्ध्याला शिफ्ट झालोय. तुम्ही सोडले तर चाळीत दुसरा भाडेकरु नाही. तुम्हीही दुसरीकडे राहायला जा. इथे तुम्हाला शांतीने राहता येणार नाही."

"दुसरं घर कशाला? ही खोली काय वाईट आहे? इथून मला कचेरी जवळ आहे, सुग्रास मध्ये माझ्या जेवणाची उत्तम सोय झालेली आहे शिवाय तुमचं भाडंही मला परवडण्यासारखं आहे. तेव्हा प्लिज मला इथून जायला सांगू नका. हवं तर मी तळमजल्यावरच्या खोलीत शिफ्ट होतो. वरचा मजला पूर्णपणे बंद ठेवा तुम्ही. पण आता जागा सोडायला सांगू नका."

मालकासमोर तो लोटांगण घालायचा तेवढा बाकी होता.

"हे पहा, हवं तर मी तुम्हाला दुसरी एखादी खोली बघून देईन. तेही लवकरात लवकर. मग तर झालं."

"पण मला तिथे काहीही त्रास होत नसताना का सोडू मी ती खोली?"

"म्हणजे? तुम्हाला तिथे काहीच जाणवलं नाही? कसले भास झाले नाहीत?"

"भास? कसले भास?"


gudhgarbh , gudhkatha , goodhgarbh , return gift , part 5


"घाबरू नका.... तुम्हाला म्हणून सांगतो. आमच्या चाळीत चपला चोरीला जातात ते कोणत्या चोरांमुळे नाही तर दोन मुलांमुळे."

"म्हणजे? दोघं पार्टनर आहेत का चप्पल चोरीच्या धंद्यातले?"

"अहो तुम्ही माझं बोलणं हसण्यावारी नेताय. दोन लहान मुलं आहेत ती."

"कोणती मुलं? हा.. हा.. ती चार ते पाच वयोगटातली? एक मुलगा एक मुलगी?" त्याने माहिती पुरवली.

"हो बरोबर, पण तुम्हाला कसं माहित? तुम्ही पाहिलंय त्यांना? मी तुम्हाला बोललो होतो ना काहीही झालं तरी दार उघडू नका. चाळीत एकही भाडेकरू टिकू देत नाहीत ही मुलं."

"अहो पण ती फार गोड आहेत हो. त्यातली ती मुलगी तर मला फार आवडते. त्यांना का घाबरू मी?"

"कारण ती दोन्ही मुलं या जगात नाहीत."

"काय......" तो जवळच्या खुर्चीचा आधार घेत खाली कोसळला.


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)

No comments:

Post a Comment