अनाहूत - भाग ७

ग्रहणाचा दिवस उजाडला. इन्स्पेक्टर तावडे डॉ. चंद्रांच्या प्रयोगशाळेत आले.

"चला डॉक्टर, निघायचं ना?"

"हो निघूया, मी सांगितलेल्या वस्तू घेतल्यात ना?"

"हो, सर्व तयारी झालीय. पण तुम्हाला खात्री आहे? अशा पद्धतीने ही क्रिमिनल केस सॉल्व्ह होईल?" गाडीत बसता बसता तावडेंनी शंका बोलून दाखवली.  

"तुम्ही चला तर खरं. पुढे होईल ते होईल. प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. बी पॉसिटीव्ह."

एव्हाना दुपार झालेली. थंडीचे दिवस असल्याने उकाडा जाणवत नव्हता एवढंच. दोघेही घाटाच्या पायथ्यालगतच्या हॉटेलवर गेले. तिथून त्यांनी त्या वयस्कर नोकराला सोबत घेतलं आणि घाट चढू लागले. गाडीच्या मागच्या कप्प्यात पेट्रोलचा कॅन, कुऱ्हाड आणि खूप चिंध्या होत्या. डॉक्टारांजवळ लायटर होतं. घाटाच्या मध्यभागी आल्यावर त्यांनी गाडी थांबवली.

"इथेच आहे ना ते पठार? हम्म्म. तावडे, ग्रहणाची वेळ संध्याकाळची आहे. संध्याकाळी पूर्ण ग्रहण लागणार." 

"मग तोपर्यंत कशाला वाट पाहायची? ते काय झाड दिसतंय आताच जाळून टाकू की." तावडे म्हणाले.

"अहं, नो नो नो नो.... असं हातघाईला येऊ नका. एक प्रयोग म्हणून मी ही पद्धत वापरून बघणार आहे. आजपर्यंतच्या चारही केसेस मध्ये डांबर सोडून आपल्या हाती काहीच लागलेलं नाही हे विसरलात तुम्ही. हा प्रयोग अयशस्वी ठरला तर पुन्हा सुकाणू तुमच्याच हाती येणार आहे."

"सायेब, मी बोललो त्यातला येकेक सबूद खरा हाय. खऱ्या खोट्याचा निकाल लावाय गिरना पातूर थांबाया हवं."

संध्याकाळ सरली. रात्र चढत होती. घाटाच्या पायथ्याशी असलेल्या दरीतून धुकं वर येत होतं. घाटात पसरत होतं. वातावरणात एक प्रकारचं अनामिक गूढ भरून राहिलं होतं. चंद्रप्रकाश रस्त्याशी लपंडाव खेळत होता. सावल्यांचा खेळ सुरु झाला. वठलेल्या झाडातून येऊन सावल्यांनी पुन्हा घराचा आकार धारण केला. अचानक तावडेंचं लक्ष त्या झोपडीकडे गेलं. इतकावेळ सपाट दिसणाऱ्या जागेत क्षणात उभारलेली झोपडी पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

"डॉक्टर, हा नोकर सांगतोय ते खरं असेलही. तुमची थिअरी खरी असू शकते." झोपडीकडे एकटक पाहत तावडे म्हणाले.

"गुड, इतक्या लवकर पटली तुम्हाला माझी थिअरी?"

"मला ती झोपडी दिसतेय डॉक्टर."

तावडेंनी डॉक्टरांना झोपडी दाखवली. आतापर्यंत जिवंतपणाचा कसलाही मागमूस नसलेल्या त्या जागेत अचानक ती झोपडी पाहून डॉक्टर अवाक झाले.

"चला तर मग काम फत्ते करूया." डॉक्टर म्हणाले.


गूढगर्भ , गूढकथा , अनाहूत , भाग ७ , https://gudhgarbh.blogspot.com/2020/09/blog-post_15.html , goodhgarbh , gudhgarbh , gudhkatha , anahut , part 7


येताना सोबत घेतलेल्या वस्तू त्यांनी बाहेर काढल्या. गाडी घाटात ठेऊन तिघे पठार चढू लागले. ते त्या वठलेल्या झाडाजवळ पोहोचले. हातातल्या वस्तू त्यांनी नोकराकडे दिल्या. 

"मी आणि तावडे आत जातो. तू इथेच थांब. जर काही शंका आलीच किंवा आमचा प्रतिसाद आला नाही तर सरळ झोपडी पेटवून दे." नोकराने मान डोलावली.

चालताना पाय चिटकत होते. दोघे झोपडीकडे जायला निघाले. अचानक कशाचीतरी आठवण झाल्याने डॉक्टर माघारी आले आणि खिशात हात घालून त्यांनी लायटर बाहेर काढलं.

"अरे, हे लायटर विसरलोच...." नोकराकडे लायटर देऊन ते पुन्हा आत जायला निघाले.

खिडक्या एकदम काळ्याकुट्ट दिसत होत्या. दरवाजा असून नसल्यासारखा. तावडेंनी दार ढकलून आत प्रवेश केला.

"डॉक्टर, मोबाईल चालू होत नाही. निदान टॉर्च तरी लावला असता."

"काही उपयोग नाही, इथे कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅझेट काम करणार नाही."  

"मग येताना आग पेटवून आणायला हवी होती नाही. थांबा, आलोच मी." तावडे बाहेर पडण्यासाठी वळले.

"डॉक्टर, अहो इथला दरवाजा कुठे गेला? तुम्ही कुठे आहात?"

त्या काळ्याकुट्ट अंधारात दोघे एकमेकांना पाहूही शकत नव्हते.

"मी इथे आहे. अहो, त्या खिडक्या पण गायब होताहेत. आपण फसलो आहोत."

      तावडे खिडकी शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होते. पायाखालच्या जमिनीची दलदल होऊ लागली. जिवाच्या आकांताने दोघे ओरडू लागले. विव्हळू लागले. बाहेर उभ्या असलेल्या नोकराला संशय आला. तो झोपडीपाशी गेला. आतून आरडाओरडा ऐकू येत होता. आवाज एकदम लांबून आल्यासारखा वाटत होता. मघाशी जिथे दारं खिडक्या होत्या तिथे आता काहीच दिसत न्हवतं. नोकराने धावत जाऊन पेट्रोलचा कॅन आणला. तो झोपडीभोवती ओतला. अर्धं पेट्रोल वठलेल्या झाडाच्या बुंध्याशी ओतलं आणि अगोदर झाड पेटवलं.  झाडाने पेट घेतल्याक्षणी झोपडीच्या आकारातल्या सावल्या हलू लागल्या. झोपडी मेणासारखी वितळू लागली. छतातून डांबराचे गरम थेंब अंगावर पडू लागले. जमीन तापली होती. पायांना चटके बसत होते. मायेच्या प्रभावाने अदृश्य झालेले दार हळूहळू दिसू लागले. भिंती फाटलेल्या पडद्यासारख्या दिसू लागल्या. वितळून जमिनीत लुप्त होण्यासाठी त्या झाडाकडे झेपावल्या. तेच त्यांचं आश्रयस्थान होतं. दरवाजा भिंतीसकट वितळून सावली बनला. संधीचा फायदा घेऊन झोपडीत बंद झालेले इन्स्पेक्टर तावडे डॉक्टरांसहित बाहेर पडले. भेसूर किंकाळ्यांनी पठार दणाणत होतं. झाडाच्या खोडातून काळ्या डांबराच्या उकळ्या फुटत होत्या. नोकर त्यावर अजून पेट्रोल ओतून आग वाढवत होता. आर्त किंकाळ्या फोडत त्या पिशाच्चरूपी सावल्या झाडाकडे जाताना सर्वांनी त्यांच्या डोळ्यांदेखत पहिल्या. झाड धडधडत जळत होतं. आगीच्या ज्वालांमध्ये त्या मुलाचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता. काळ्या सावल्या सुटकेसाठी आक्रोश करू लागल्या. नोकर त्याकडे पाहतच राहिला.

          काळ्या डांबराने दोघांचे कपडे माखले होते. हातापायांना थोडीफार काजळी लागली होती.  डॉक्टरांचा चष्मा बाहेर येण्याच्या खटपटीत कुठेतरी हरवला होता. तावडेंची सर्व्हिस रिव्हॉल्वर आत राहिलेली. डोक्यावर सर्व्हिस कॅप नव्हती. अंगावर ठिकठिकाणी डांबराचे डाग लागलेले.

"सायेब, त्याला मुक्ती मिळाली बगा. तुमचे लई उपकार झाले. खरंतर हे मला समजलं तवाच कराया पायजेल हुतं."

"असो, आता सर्व ठीक झालंय ना. तावडेंचाही विश्वास बसला असेल असं वाटतं. काय तावडे?"

"प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ यावी लागते. बाय द वे डॉक्टर, ही मिस्ट्री सॉल्व्ह केल्याबद्दल धन्यवाद. आयुष्यात प्रथमच असली केस पाहिली. तुमची केस सॉल्व्हिंगची नवीन पद्धत कळली." तावडे हसत म्हणाले.

"पण डॉक्टर, फाईल क्लोज करताना रिमार्क काय देऊ?" या प्रश्नावर डॉ. चंद्रादेखील अनुत्तरित झाले. आकाशात चंद्र बरेच दिवसांनी मोकळं हसत होता. 



(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)

No comments:

Post a Comment