अनाहूत - भाग २

(एक वर्षानंतर....)

हिंजवणी.... किती नयनरम्य परिसर.... थंड हवेचं ठिकाण म्हणून पर्यटकांचा राबता असतो इथे. पण प्रत्येक सुंदर गोष्टीला एक शाप असतो असं म्हणतात. तसंच काहीसं आहे. घाटमाथ्याच्या वळणात एक जीवघेणं गुपित दडलंय. स्थानिक लोकांना माहिती आहे म्हणून ते सहसा तिकडे फिरकत नाहीत. पर्यटन व्यवसायावर गदा नको म्हणून कुठे वाच्यताही होत नाही. तसं हातावरचं पोट आहे इथल्या लोकांचं. असो, फार नाही पण वर्षाकाठी एक तरी बळी जातोच त्या घरात. गेली कित्येक वर्ष तिथे हे अव्याहतपणे चालू आहे. बुद्धीला न पटणारी गोष्ट असूनही तिचं अस्तित्व मान्य करावंच लागतं.
रात्रीची वेळ. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा किर्रर्र काळोख. दिवसा नयनरम्य दिसणारा हिंजवणी घाट आता भयाण वाटतोय. घाटात टुरटुरत धावणाऱ्या बाईक ची टूरटूर सोडली तर कसलाच आवाज नाही आणि हेडलाईट सोडल्यास इतर कोणता प्रकाशही नाही. बाईक वर दोन तरुणी बसल्या होत्या. जीन्स टॉपवर होत्या आणि चेहरा स्कार्फने बांधला होता.
"नीता, अजून किती लांब आहे गं? ओह.... हिला ऐकू थोडीच जाणार. एकतर हेल्मेट, त्यावर स्कार्फ आणि हा भणाणा वारा. निघाल्यापासून बाईक मीच चालवतेय. हात पण दुखत आलेत." दीपिका म्हणाली.
"काय झालं? बाईक का थांबवलीस? ऑल ओके ना?"
"वा.... वा.... शहाणे, कधीपासून मीच बाईक चालवतेय. हाताचे तुकडे पडलेत. इथून पुढे तू चालवणार आणि मी मागे बसणार."
"ओके डियर, ऍज यू विश." नीता बाईकवर पुढे बसत म्हणाली.
त्याचं संभाषण चाललं असतानाच घाटावरच्या पठारावर सावल्या हलल्याचा भास झाला. सावल्या एकवटल्या आणि बघता बघता तिथे एक घर तयार झालं. कुट्ट काळ्या रंगाचं. बाईकला किक मारली पण ती चालूच होईना. बराच वेळ तिची धडपड चालली होती. हेडलाईट पण मंद झाले. एकंदर काय प्रकार आहे ते कळेनासं झालेलं.

गूढगर्भ , गूढकथा , अनाहूत , भाग २ , https://gudhgarbh.blogspot.com/2020/08/blog-post_25.html , Gudhgarbha , Goodhgarb , Anahut , Part 2

"बाजूला हो, मी बघते." दीपिकाने बाईक चालू करण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
त्यांच्या नकळत मागच्या पठारावर सावल्या जिवंत होत होत्या. वठलेल्या झाडातून सरसरत येऊन विचित्र आकार घेत होत्या. पाहता पाहता तिथे झोपडीवजा घर तयार झाले. वटारलेल्या डोळ्यांच्या दोन खिडक्या तयार झाल्या. रात्रीच्या काळोखात त्या अजूनच भयानक दिसत होत्या.
झोपडी पाहून नीता म्हणाली, "ए, ते बघ. तिथे घर आहे बहुतेक. चल ना बघू काही मदत मिळते का."
"मॅडम, इथे घाट संपेपर्यंत साधी चहाची टपरी नाही. मी कित्येकदा आलेय या रस्त्याने. मला तर कधी दिसलं नाही बॉ. मधेच कुठून उपटलं? म्हणजे इथेही अतिक्रमण केलंय बहुतेक." दीपिका हसत म्हणाली.
"हाऊ फनी, सध्यातरी तिथे जाण्यातच शहाणपण आहे. तसंही आपल्या घोस्ट रायडर बाईक ला किक मारण्यात चांगला अर्धा तास गेलाय. बाईक चालू होत नाहीये. रात्र इथे उभ्यानेच काढायची का? तू बस इथे तप करत मी चालले." नीता तडक झोपडीकडे निघाली. ती पठाराचा चढ चढू लागली. पाय जमिनीला चिटकत होते. तेवढ्यात मागून दीपिका पळत तिच्या दिशेने आली.
"का गं, तपोभंग झाला वाटतं. घाबरलीस ना? खरं सांग."
"घाबरू कशाला, तू घाबरशील म्हणून तुला सोबत करायला आली ते बघ. काय गं, इथे एकपण दिवा नाही. माणसांची चाहूल पण नाही. इथे एवढ्या वर कोण राहत असेल आणि पायाला काय लागतंय मघापासून?"
वठलेल्या झाडापासून घराभोवतालचा पूर्ण परिसर डांबर ओतल्यासारखा झाला होता.
"आतमध्ये पण दिवा नाही. चल मोबाईलच्या टॉर्चलाईट मध्ये काही दिसतंय का बघूया."
दोघींनी पॅन्टच्या खिशातून आपापले मोबाइलला काढले पण मोबाईल चालूच होईनात.
"अगं येताना तर फुल चार्ज करून आणलेला मोबाईल. घरून निघाल्यावर थेट इथेच उतरतोय. तरी बॅटरी कशी संपली?"
"मरो, चल आत जाऊन बघूया." नीता जोशात म्हणाली आणि आत घुसली.
घरात पूर्ण काळोख होता. बाहेरच्यापेक्षा घरात पाय जास्त चिटकत होते. डांबर जळल्यासारखा वास येत होता. त्या खिडकीपाशी गेल्या.
"घर रिकामी आहे वाटतं. चला इथे थांबून फायदा नाही." नीताने खिडकीतून बाहेर पाहिलं. खाली बाईक उभी असल्याची खात्री केली आणि दोघी बाहेर पडायला वळल्या.
"अगं, दरवाजा कुठेय?" नीता चाचपडत म्हणाली.
"नीता, दरवाजा सोड ती खिडकी कुठे गेली मघाची?" दीपिका पुरती घाबरली होती. 
थोड्याच वेळात घरातल्या जमिनीची दलदल झाली. दोघींच्या ओरडण्याचे, विव्हळण्याचे आवाज येत राहिले. बऱ्याच वेळानंतर ते शांत झाले. सावल्या पुन्हा झाडात मिसळून गेल्या.

(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)

2 comments: