अ मिडसमर ड्रीम - भाग ३

 

आता पुढचा सर्व खेळ त्या चौघांना खेळायचा होता. समोरच एक खोली सदृश तंबू होता. ते चौघे आत गेले. जागा प्रशस्त होती. जागोजागी मंद पिवळे दिवे झुलत होते. मोठमोठी लाकडी कपाटे आणि मंचकं होती. एका काचेच्या कपाटात बरीचशी पुस्तकं ठेवली होती. नियमावलीचं पुस्तक आता केटच्या हातात होतं. सर्वजण त्यात डोकं खुपसून होते. केट पुढल्या ओळी वाचू लागली. त्यात लिहिलं होतं.... “खोलीत आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार कुऱ्हाडीने करा."

"व्हॉट द हेल इज धिस. कुऱ्हाडीने पाहुणचार करायला आम्ही काय खविस आहोत?" केट बडबडली.

पुढच्याच पानावर चित्रविचित्र आकृत्या काढल्या होत्या. माणसाच्या शरीरावर मेंढीचं शीर, मानवी सांगाड्याच्या कमरेखालचा भाग लांबचलांब आणि बराचसा अवाढव्य, दुसऱ्या चित्रात मधोमध बसलेला माणूस आणि त्याच्या भोवताली रोमन लोकांप्रमाणे पेहराव केलेली माणसं, त्यांच्या हातात धारदार शस्त्रं, पुढच्या चित्रात वश केलेला माणूस त्याची शुद्ध हरपून बैठकीवर बसलाय असं दर्शवलं होतं त्याच्या भोवतालची माणसं गुढघ्यावर बसून दोन्ही हात वर करून बसली आहेत आणि बैठकीवरचा माणूस माणसात राहिलेला नाही, त्याचे डोळे मोठे झालेत, शरीर आक्रसलेलं आहे, शरीरावर त्या लोकांनी शस्त्राने जखमा केल्या आहेत, त्यातून विचित्र किडे आणि कीटक बाहेर पडत आहेत, त्या पुढच्या चित्रात तो माणूस पूर्णतः सैतानात परिवर्तित झालेला आहे व त्याच्या आजूबाजूची माणसं देखील त्याच्याच सारखी झालेली दिसत होती.


gudhgarbh , goodhgarbh , a midsummer dream , part 3 , अ मिडसमर ड्रीम , भाग ३ , गूढगर्भ , गूढकथा


जेम्सने कपाटातील बाकीची पुस्तकं चाळली. त्यातही काही अशीच अगम्य चित्रं आणि सांकेतिक भाषा होती. चित्रं यापेक्षाही भयावह वाटत होती. बाकीचे सर्वजण खोलीत भिरभिरत होते. खोलीतल्या अँटिक सामानाच्या किंमतीचा अंदाज लावत होते. जेम्सने त्यांना त्यातले एक पुस्तक दाखवले. ही जागा आणि हा खेळ साधा नाही हे त्यांच्या लक्षात आलं. सर्वजण घाबरून स्तब्ध झाले. स्टेलाला कुणीतरी पाय ओढत चालल्यासारखा आवाज आला. कोणीतरी चालत त्यांच्याच दिशेने येत होतं. ते अनवाणी असावं पण त्याची चाहूल लागत होती. तिने सर्वांना सावध केले आणि वाचलेल्या नियमाची आठवण करून दिली.

सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी लपले. आवाज जास्तच जवळ यायला लागला. अचानक धाडकन दरवाजा उघडला. नियमावलीच्या पुस्तकात दिलेल्या चित्राप्रमाणे तो किळसवाणा सैतान त्यांना इतस्ततः शोधू लागला. जेम्स आणि फ्रॅंक वेगवेगळ्या टेबलांखाली लपले होते. स्टेला आणि केट वेगवेगळ्या कपाटात लपले होते. ते सर्वजण एकमेकांना पाहू शकत होते. स्टेलाच्या कपाटात काही कपडे टांगले होते. केटच्या कपाटात हत्यारं होती. सळई, कुऱ्हाड, सुरा, तलवार, बंदूका अशा विविध हत्यारांनी पूर्ण कपाट ठासून भरलेलं होतं. तिने फ्रॅंकला काहीतरी खूण केली. पण फ्रॅंकला ती समजलीच नाही.

एक एक करत तो सैतान सर्व जागा शोधून एकदम कपाटाकडे वळला. आत लपलेली स्टेला कपाटातच खाली बसली. तो पाय ओढत चालत होता. भीतीने तिला घामाच्या धारा लागल्या होत्या. त्याने कपाटाची दारं उघडली. आत लावलेल्या कपड्यांमधून फिरत त्याची नजर स्टेलावर पडली. त्याच्या हातातून पडणारा घाणेरडा स्राव तिच्या केसांवर झिरपला. मान तिरकी करत तो तिच्या आणखी जवळ जाऊ लागला. स्टेलाने अंग आक्रसून घेतलं. तो तिला पकडणार एवढ्यात केट वाऱ्याच्या वेगाने आली आणि हातातल्या धारदार कुऱ्हाडीने तिने त्याचं मुंडकं धडावेगळं केलं. रक्तासारखा काळपट चिकट स्राव तिच्या तोंडावर मानेवर उडाला.



(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)

No comments:

Post a Comment