रिटर्न गिफ्ट - भाग ६

        "म्हणजे? असं कसं म्हणू शकता तुम्ही. अहो मी त्या दोघांना प्रत्यक्ष पाहिलंय. स्पर्श केलाय. ती बोलली आहेत माझ्याशी. ते सर्व खोटं कसं असेल."

"हे पहा, ती मुलं कोणाची आहेत कुठून आलीत मला काहीच माहित नाही. आम्ही इथे राहत नव्हतो, म्हणजे मी राहत नव्हतो. माझ्या मामांनी इथे काही वर्षांपूर्वी जागा घेतली होती. नंतर ती वाढवून तिथे चाळ बांधली. मी मुंबईला असायचो. आमचं मुळगाव वर्ध्याला त्यामुळे इथे राहायचा प्रश्नच नाही. मामाला दोन्ही मुलीच असल्याने चाळीच्या देखभालीची जबाबदारी मी घेतली. तसाही मी कामानिमित्त मुंबईबाहेरच फिरत असतो. म्हणून मीही होकार दिला. गेल्या वर्षी मामा निवर्तले.  दरम्यानच्या काळात चाळीत काही अफवा पसरल्या होत्या. चोरीच्या आणि...... इतरही काही. पण मी दुर्लक्ष केलं. चाळीत कुणीच भाडेकरू टिकेना म्हणून म्हटलं शेवटी जाऊन बघून येऊ एकदाचं. तेव्हापासून मी वर्षभर इथे राहतोय. मीही तो अनुभव घेतलाय. व्हरांड्यात बागडणं, खिडकीतून आत डोकावणं हे तर नित्याचंच. ती मुलं चपला सोडून बाकी काहीच नेत नाहीत. कुणाला त्रास देत नाहीत. फक्त रात्री धुडगूस घालतात. चुकून कुणी चप्पल बाहेर विसरलंच तर त्याला नवी चप्पल घ्यावीच लागते. मग लोकं घाबरायला लागली. इथे कुणी घर घेईनासं झालं. तुम्हाला दिलेल्या खोलीला व्हरांड्याच्या बाजूची खिडकी नाही म्हणूनच मी ती तुम्हाला दिली."

"गेले काही दिवस मला ती मुलं दिसतात. काही बोलत नाहीत, खाऊ दिला तर नको असतो. कसली लालसा नाही त्यांना. मग फक्त चपलांवरच त्यांचं एवढं प्रेम का असावं?"

"आता समजलं ना तिथे राहायला मी का नको म्हणतोय ते. बाकीची बिऱ्हाडं होती तोपर्यंत ठीक होतं. मला तुमचा जीव धोक्यात घालायचा नाही." मालकांनी स्पष्टीकरण दिलं.


gudhgarbh , goodhgarbh , gudhkatha , return gift , part 6


"अहो पण त्या मुलांचा काहीच त्रास नाही मला."

"मी सांगायचं कर्तव्य केलं तरीही तुम्ही म्हणताय तर राहा तिथे. तुमची मर्जी. मी येत्या रविवारी येऊन जाईन तुम्ही भेटालच ना घरी?"

"हो नक्की या."

मालकांनी त्याचा निरोप घेतला. संध्याकाळी उद्विग्न मानाने तो कचेरीतून निघाला. पार्सल न घेता तो सुग्रास मधेच जेवला. विचार करकरून डोकं दुखायला लागलेलं. दुसऱ्या दिवशी शनिवार असल्या कारणाने कचेरीत जावं लागणार होत. एका सुप्रसिद्ध असामीची मुलाखत घ्यायची होती. त्याला खोलीत जावंसं वाटेना. हॉटेल बंद व्हायच्या वेळेस तो घरी जायला निघाला. गेल्यागेल्याच गाढ झोपला.

खोलीत  गजबजाट ऐकू येत होता. सकाळ झाली होती. खोलीत ऊन पडलं होतं. तो कुणा दुसऱ्याच्याच खोलीत होता. डोळे किलकिले करून पाहिलं. खोली तीच होती. जागोजागी भिंतीचे पोपडे उडाले होते. समोरच स्टोव्ह वर काहीतरी शिजत होतं. विटक्या साडीतली एक स्त्री मुलीला शाळेसाठी तयार करत होती. रात्रीची ती दोन मुलं तिथे होती. मुलगा एका कोपऱ्यात अभ्यास करत होता. अंगात तोच शर्ट घातलेला.

"आई, आज छालेत बूट घातल्याछिवाय घेनाल नाही बोलल्या बाई."

"अरे बाळा, उद्या नक्की आणू हा आपण. बाईंना सांग आईचा पगार झाला की घेणार आई बूट."

"पण आई, तुला काम तर मिळालेलंच नाही अजून. मग कसला पगार मिळणार?"

"अरे मिळेल रे काम, तू नको काळजी करुस."

"बाबा कामावरून कधी येणार. तू रोज बोलतेस उद्या येतील म्हणून. ते आले की मग छकुलीच्या शाळेत पण जातील. रोज रोज का म्हणून तिला चप्पल आणायला लावतात? मी बाईंचं लक्ष नसताना पटकन जागेवर जाऊन बसतो, मग त्यांना समजतच नाही माझे बूट नाहीत ते. पण छकुलीला थोडीच जमणार माझ्यासारखं."

"जाऊ दे रे, घेतात तोपर्यंत शिका. नंतरचं कोणी बघितलंय."


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)

2 comments: