मला भेटलेली (देव) माणसं - भाग १

       कधीकधी आपल्या जवळची माणसं आपल्याला दुःख देतात आणि अनोळखी माणसांकडून नकळत सुखाचा शिडकावा होतो. आतापर्यंत बरेच कडूगोड अनुभव आलेत. पण त्यातही काही आठवणी अजूनही ताज्या आहेत. चांगलं काम कधीच वाया जात नाही. एखाद्याला मनापासून केलेली मदत लाख मोलाचे आशीर्वाद देऊन जाते.

मी ग्रॅंटरोडला कामाला असतानाची गोष्ट. संध्याकाळी ऑफिस सुटायचं. घरी यायला आठ - सव्वाआठ वाजायचे. सणासुदीच्या दिवसात मला आमच्या रानडे रोड, छबिलदासच्या गल्लीत फिरायला जाम आवडायचं. अजूनही आवडतं. ते गणपतीचे दिवस होते. स्टेशनला उतरून मी थेट आयडियलच्या गल्लीत आले. तिथले मखर बघायला मला फार आवडतात. भले आमच्याकडे गणपती बसत नसले तरीही. मी खास मखर, रोषणाई आणि इतर सजावटीचं सामान बघायला तिथे जायचे. तिथून पुढे मग छबिलदास, वनमाळी, धुरू हॉल असं करत मी मखर पहात होते. तिथे एक पासष्टीच्या आसपासचे सडपातळ गृहस्थ मखर खरेदीला आलेले. दोन - चार स्टॉलवर मी त्यांना मखरासाठी घासाघीस करताना पाहिलं. योगायोगानं आम्ही एकाच स्टॉलवर मागेपुढे करत ती सजावट पाहात होतो. स्टॉल वर मी मखर पहात असताना नेमके ते तिथे आले. त्यांना मनपसंत मखर मिळत नव्हतं.

न रहावून मी त्यांच्याशी संवाद साधला. बोलता बोलता समजलं की त्यांना त्यांच्या गणपतीसाठी मखर खरेदी करायचं होतं. गणपतीची मूर्ती दीड फुटाची होती. जे मखर त्यांना आवडले त्यांची किंमत त्यांना परवडण्यासारखी नव्हती.

मी त्यांना म्हणाले, "काका, इथे आत वनमाळीला पण मखर आहेत. तिथे पाहूया का?"

काकांनी होकार दर्शवला. आम्ही वनमाळीला गेलो. तिथे स्टॉलवरचं मखर त्यांना आवडलं. दोन हजाराचं ते मखर त्यांच्या मूर्तीला साजेसं होतं.

काका मला विचारत होते, "पंधराशे बरोबर आहेत ना?"

मी म्हटलं,"बाराशे सांगा. बघू किती कमी करतात."

मग काकांनी घासाघीस करून तेराशेला ते मखर घेतलं. मग आम्ही नक्षत्रपर्यंत चालत आलो.

"काका रहायला कुठे तुम्ही?", मी विचारलं.

"मी बोरिवलीला राहतो."

"इतक्या लांबून फक्त मखरासाठी आलात? घरचं कुणी सोबत नाही येत का?"

"अगं मुलगा आहे पण त्याला या सगळ्याची आवड नाही. घरच्या गणपतीची सर्व खरेदी मीच करतो."

संध्याकाळच्या भर गर्दीच्या वेळी काका ट्रेनने घरी कसे जातील हा प्रश्न मला पडलेला.


gudhgarbh , goodhgarbh , mala bhetleli (dev) manas , (1) ,


"तू कुठे राहतेस?" काकांनी विचारलं.

"मी इथेच राहते जवळच."

"म्हणजे दादरमध्येच ना.... बरं बरं." बोलता बोलता नऊ कधी वाजून गेले समजलंच नाही.

"चला काका. मी निघते.उशीर होतोय. खरंतर आमच्याकडे गणपती येत नाही पण मला ते सजावटीचं सामान पाहायला फार आवडतं म्हणून येते मी मार्केट फिरायला."

काकांनी खिशातून पाकीट काढून शंभराची नोट माझ्या हातात ठेवली.

"हे काय?" मी गोंधळून विचारलं.

"अगं असू दे, आजकालची मुलं कुणाला मदत करायला पुढं येत नाहीत. तू एवढी मला मदत केलीस, माझ्यासोबत सगळी दुकानं फिरलीस म्हणून हे. ठेव हो."

"काहीतरीच काय काका. मी कसल्या अपेक्षेने तुम्हाला मदत केली नाही. ठेवा हे पैसे." मी ते पैसे बळेच काकांच्या हातात ठेवले.

"बरं मग काही खातेस का? जवळ हॉटेल आहे का चांगलं? चाल आपण नाश्ता करू. नाही म्हणू नको."

त्यांचा आग्रह मला मोडवेना. आम्ही जवळच्याच 'आदर्श' हॉटेलमध्ये गेलो. सव्वा नऊ होऊन गेलेले. मी त्यातल्यात्यात स्वस्त आणि लवकर संपेल अशी डिश मागवली. काकांनी त्यांच्या आवडीची डिश मागवली. दरम्यान त्यांनी माझं नाव, मोबाईल नंबर लिहून घेतला. अनोळखी माणसाला मोबाईल नंबर देणे धोक्याचे समजून मी माझ्या मोबाईलचे शेवटचे दोन क्रमांक चुकीचे सांगितले.

आम्ही नाश्ता संपवून बाहेर पडलो. मी धावत पळत घरी आले. घरी जुजबी चौकशी झाली आणि सज्जड दम देखील मिळाला. काकांनी नंतर माझ्या फोन नंबरचं काय केलं कुणास ठाऊक. आजपर्यंत एकट्या आईव्यतिरिक्त ही घटना मी कुणालाही सांगितलेली नव्हती. त्या काकांचा चेहरा आता विस्मृतीत गेलाय पण गणपती आले की ही घटना मला हटकून आठवते.


(गूढगर्भ - लेखसंग्रह)

No comments:

Post a Comment