गंजलेली तलवार आणि तुटलेली म्यान

        (सदर लेख सध्याच्या युवावर्गाला उद्देशून लिहिण्यात आलेला असून सदर लेखाद्वारे कुणालाही कमी लेखण्याचा अथवा अपमानित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. जर हा लेख वाचून वाचकांमध्ये तिळमात्रही सकारात्मक बदल जाणवला तर ते मी माझ्या लेखनाचं सार्थक समजेन.)


सध्या 'मराठी बोला चळवळ' जोरात चालू आहे. त्याची प्रकर्षाने गरज आहे असंच वाटायला लागलंय. मराठी भाषा संवर्धनासाठी आपण काय करतो? सध्या कुठलंही मुलाच्या तोंडून आई बाबा अशी हाक ऐकू येत नाही. जो तो मम्मी, पप्पा, ममा, डॅड अगदी माँ सुद्धा बोलतो पण आई म्हणून हाक मारायची लाज वाटते लोकांना. मला आठवतं, शाळेत असताना एका शिक्षिकेने म्हटलं होतं,"तुम्ही तुमच्या आईला मम्मी म्हणून हाक मारता ना? मम्मी म्हणजे काय माहितेय का? इजिप्तमध्ये मृत  शरीर जतन करून पिरॅमिडमध्ये ठेवतात. त्याला मम्मी म्हणतात. तुमची आई तशी आहे का?" लहानपणी इतर मुलांचं ऐकून मीसुद्धा बाबांना पप्पा म्हणून हाक मारायचंच प्रयत्न केलेला पण ती हाक कधी तोंडातून स्पष्टपणे  निघालीच नाही. आजकाल मुलांना इंग्रजी माध्यमात टाकण्याचं फॅड वाढलंय. मला लोक सल्ले देतात तुमच्याही मुलांना इंग्लिश मीडियमलाच घाला. आता कोण विचारतं मराठी शाळांना. इतक्या शिकलेल्या तुम्ही, मग काय प्रॉब्लेम आहे? मेळाव्यांना जयंत्यांना तोरणं पताका लावून नुसता छत्रपतींचा जयजयकार करून उपयोग नाही. नुसत्या कोरड्या ललकाऱ्या काय कामाच्या? ते राज्यप्रेम रक्तात भिनलं पाहिजे. अरे, इंग्रजांनी इतकी वर्ष आपल्याला लुटलं आणि आजही आपण त्यांचेच हुजरे होऊन त्यांना श्रीमंत बनवायच्या मागे लागलोय.

आमची मुलं जरा बरं बोलायला लागली, कळती झाली की आम्ही काय करतो? त्यांना ए बी सी डी शिकवतो. मग कॉन्व्हेंट शाळेत धाडतो. लावतो ढीगभर ट्युशन्स. मग ऐपत असो वा नसो. पोरगं इंग्लिश शाळेत गेलं पाहिजे बास. त्यातल्या सकाळच्या प्रार्थना मुलांना शब्दाने कळत नाहीत. आम्ही कधी शाळेचं तोंडपण पाहिलं नसलं तरी हरकत नाही पण पोराला डायरेक्ट इंग्लिश मीडियमला घालणार. बिचाऱ्या पोराचं खेळाचं वय मागे पडतं. मुलं मुर्दाड होतात. गाढवासारखं ओझं वाहायची वृत्ती त्यांना लहानपणापासूनच चिकटते. ज्या वयात गोष्टी ऐकायच्या, मैदानावर धावायचं, पडायचं, बागडायचं त्या वयात त्यांच्यावर मानसिक बोजा पडतो.  बरं घरी तरी त्यांच्या कानी काय पडतं.... हूड हूड दबंग, शीला की जवानी, तुला फिरवीन माझ्या गाडीवर.... शी.... अरे, असे संस्कार दिले तर अशीच मुलं निपजणार. आजकाल कुणी संध्याकाळी शुभंकरोती, परवचा म्हणत नाही तर टीव्ही लावतात आणि त्यावर अतिउद्बोधक कुटील मालिका पाहतात. त्यातून मुलांवर नको ते संस्कारच होत असतात. बालबुद्धीला त्यांचं आवडीचं कार्टून लावून दिलं तर तिथेही तेच. ऑगी त्याच्या प्रेयसी मांजरीवर लाईन मारत असतो, शिनचॅन शिव्या घालत तरी असतो नाहीतर स्वतः खात तरी असतो, तो शीजुका त्यातल्यात्यात बरा पण तोही निर्बुद्धपणाचा कळस गाठताना दाखवतात.

अरे काय हे.... रिमोट तुमच्या हातात असतो ना? मग काहीतरी बुद्धीला चालना देणारे कार्यक्रम पहा की. मराठीचा उदो उदो करताना चोवीस तास मराठी वाहिनी पाहिली जाते पण त्यावरचे सर्वच कार्यक्रम दर्जेदार असतात असं कुठे आहे? ज्ञानासाठी चाकोरी मोडावी लागली तर त्याहून चांगली गोष्ट नाही. ज्ञान.... मग ते कुठूनही मिळवा. ते श्रेष्ठच असते. अगदी अशिक्षित, दुय्यम दर्जाच्या माणसाकडून का होईना. अगदी तटस्थ अबोल निसर्गसुद्धा आपल्याला दोन्ही हातांनी भरभरून ज्ञान देत असतो फक्त ते हेरणारी नजर हवी.

बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं शिक्षण घेतलं पण ते मातीला विसरले नाहीत. त्यांच्या समाजाला विसरले नाहीत. विवेकानंदांनी भारतीय अस्मितेला पार सातासमुद्रापार  नेलं. डॉ. माशेलकर, जयंत नारळीकर, हे त्या त्या क्षेत्रात उच्चांक गाठूनही त्यांच्या मातीशी एकनिष्ठ राहिले. त्यांचे पाय नेहमी जमिनीवर राहिले. जन्माला मराठी म्हणून यावं, मराठीवर उभं आयुष्य पोसावं, त्या मातीशी नाळ सांगून अवघ्या महाराष्ट्राकडून सहानुभूती मिळवावी आणि उदो उदो करावा तो इंग्रजीचा. काही लोक तर असेही आहेत जे मराठी कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. भरपूर प्रसिद्धी पावलेत. आपलं माणूस, आपल्या गावातलं राज्यातलं म्हणून लोक माया करतात. त्यांच्या कार्याला भरघोस प्रतिसाद देतात. त्यांना अक्षरशः डोक्यावर नाचवतात. पण ते फक्त त्यांची नेमून दिलेली कामं करत असतात. प्रत्यक्षात कुणी हितचिंतक चाहते आलेच तर त्यांच्याशी बोलताना या लोकांची त..त..प..प.. करणारी अस्खलित मराठी कळते.

का? कशासाठी असल्या लोकांचं हित चिंतावं? संभाजी राजांना तब्बल सोळा भाषा अवगत होत्या. पण त्यांनी या गोष्टीचा कधीही बडेजाव मिरवला नाही की दुरुपयोग केला नाही. त्यांना एकच ध्येय गाठायचं होतं. शिवरायांना दिलेला शब्द पाळायचा होता. स्वराज्य टिकवायचं होतं, वाढवायचं होतं. आणखी बळकट करायचं होतं. पार दिल्लीपर्यंत भगवा फडकवायचा होता. जर छत्रपतींच्या छाव्याने राजपदाला पोहचून सुद्धा ती मिजास केली नाही, मायबोलीचा अपमान केला नाही तर आपल्यासारखे पामर तो करायला धजावतातच कसे? मराठी भाषा ज्याने आत्मसात केली त्याला आयुष्यात इतर कोणत्याही भाषा शिकण्यास अडथळा येत नाही. मराठीला मुळातच सुंदर वळण असल्याने बोलणाऱ्याच्या जिव्हेला आपसूकच ते वळण लागते आणि जगाच्या पाठीवर कुठलीही भाषा शिकताना तिचा उपयोग होतो.

आम्ही मराठी, ताठ बाणा , ताठ कणा हे फक्त स्लोगन म्हणून टीशर्टवर मिरवणारे आम्ही. कुणा माणसाचं मराठी आडनाव पाहून त्याच्याशी संवाद साधावा तर त्याचं मराठी ऐकून हा नक्की मराठीच आहे का असा संशय येतो. नाव जेवढं मोठं, जेवढं पांढरपेशी तितकं ते मायबोलीपासून लांब गेलंय असं समजावं. काही अपवाद सोडले तर हे खरं आहे.

आजकाल लोक ज्ञान मिळवण्याच्या मागे फार कमी लागतात. त्यांना भावी पिढी नट नट्यांसारखी हवी असते. रस्त्याने चालताना तुम्हाला मॉडर्न कपड्यातला, केस रंगवलेल्या किंवा सरळ केलेल्या बायका पहिल्या की समजून जावं यांनी शाळेत फार वर्ष काढली नसावीत. अकलेच्या नावाने बोंब आणि तीच अक्कल पाजळण्याची फार घाई असते लोकांना. कूल टीशर्ट घातलेली मुलं दिसतील, कपाळावर कौतुकाने चंद्रकोर काढलेली, हाताच्या मनगटावर 'क्षत्रियकुलावतंस' अशी मोठमोठाली अक्षरं गोंदलेली मुलंही दिसतील. हातात पैसा आला म्हणून काहीही करावं काय? भाळी चंद्रकोर लावून शिवरायांचा वसा घेणारे कितीजण आहेत? हातावर 'क्षत्रियकुलावतंस' गोंदलेल्या मुलाला क्षत्रियांचा सोडा स्वतःच्या कुळाचा उद्धार तरी झेपणार आहे काय? कुवत आहे का तेवढी? हातावर गोंदलेलं वाचता आलं तरी पुरेसं आहे. आधी  तेवढी उंची गाठावी आणि मग खाशी मिरवावी.

महाराजांनी जर कर्तृत्वशून्य बडेजाव मिरवला असता तर हिंदवी स्वराज्य उभं राहिलं असतं? आजच्या जगात माणसाच्या तोंडावर स्तुती करणारे लोक त्याची पाठ वळताच त्याला शिव्या घालतात, दूषणं देतात. पण महाराज.... महाराज पाठमोरे होताच त्यांच्या पाठीकडली माणसं त्यांच्या पायाची धूळ कपाळी लावत होती. का? कशासाठी? कशासाठी राजांवर एवढं प्रेम? जीवापेक्षाही जास्त? महाराजांच्या काळात आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही तसेच इंग्रजांसारखे विदेशी शत्रू यांना घाबरून नमतं घेऊन जर शिवराय त्यांच्या मातीशी एकनिष्ठ राहिले नसते त्यांनीही हुजरेगिरी केली असती तर भारताच्या नकाशात आजचा महाराष्ट्र वेगळ्याच नावाने दिसला असता. भारताबाहेरचे प्रतिस्पर्धी आणि भारतातले कट्टर जहरी शत्रू यांची मनसबदारी स्वीकारून देखील महाराजांनी हिंदुत्वाचा, मराठीचा भगवा फडकता ठेवला. आज किती जणांमध्ये आहे ही धमक, हा विश्वास, ही वृत्ती.

gudhgarbh , goodhgarbh , gudhkatha , ganjleli talvar ani tutleli myan , https://gudhgarbh.blogspot.com/2020/11/blog-post_10.html
Image Credit - India Mart

शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात असं म्हणतात म्हणे. म्हणजे थोडक्यात काय तर लोक धोका पत्करायला तयार नाहीत. रिस्क नको म्हणूनच अवघी मराठी जमात लाचारीने नोकरी करण्यात आयुष्य खर्ची घालते आणि कुणी चुकून माकून व्यवसाय केलाच तरी तो न वाढवता 'आमची शाखा कुठेही नाही' असं मोठ्या अभिमानाने सांगण्यात धन्यता मानतात. अलीकडे ही वृत्ती थोडीफार बदलतेय म्हणा. ते कौतुकास्पद आहे. लोकांना मेहनत नको, आयता मुजरा हवा. अरे शिवराय तर दूरची गोष्ट अशा घरात शिवरायांचा केवळ मावळा जरी जन्माला आला तरी तो संपूर्ण कुळाचा उद्धार करेल. राजांचे मावळे होतेच तसे. इमानी, कर्तबगार, नम्र आणि स्वाभिमानी. आजच्या पिढीने तर शिवरायांशी तुलना करूच नये. अरे सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहायला सामर्थ्य लागतं. शिवराय सामान्य नव्हते. त्यांनी इतके गड किल्ले बांधले पण एकावरही स्वतःचं नाव म्हणून लिहिलं नाही. आणि सध्याचे नेते साधं शौचालय बांधलं तरी त्यावर नावं लिहून मोकळे होतात. यातच सर्व आलं. पूर्ण निस्वार्थी आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती असावी. अशावेळी विजयाची महत्वाकांक्षा उराशी बाळगून केलेलं कोणतंही कार्य कधीच वाया जात नाही.

या लेखाप्रपंचाचा उद्देश एवढाच की नुसतं आपल्या अंगाखांद्यावर मिरवून मराठी जगणार नाही. ती जिवंत ठेवण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. हुजरेगिरी बंद केली पाहिजे. हे जेव्हा बंद होईल तेव्हाच ताठ मानेने शिवजयंती, मराठी भाषा दिन साजरे करा. मिरवण्यासाठी इतर अनेक व्यासपीठं आहेतच की पण ज्या मातृभूमीच्या अंगाखांद्यावर खेळलो, जिचा आधार घेतला तिच्याच छाताडावर थयथय नाचून तिला पुरती जमीनदोस्त केलीत तर भविष्यात तुम्हाला कुशीत घेणारं, मायेचं व्यासपीठ उरलेलं नसेल. एकवेळ इतर भाषा शिकलेली व्यक्ती मराठी बोलू शकणार नाही पण मराठी बोलणाऱ्या व्यक्तीला जगातली कोणतीही भाषा उच्चारायला मुळीच कठीण नाही एवढं मात्र नक्की.

महाराजांचं कर्तृत्व तेवढं होतं. त्यांनी जेवढी माणसं जमवली ती जीवावर उदार होऊन लढणारी होती. सय्यद बंडाचा वार स्वतःच्या छातीवर झेलणारा जीव महाला, असंख्य वार अंगावर झेलुनही प्राणपणाने लढत असताना ज्याचं शीर उडवलं तरी धड लढत होतं असे बाजीप्रभू देशपांडे, महाराजांची कठोर निर्भत्सना जिव्हारी लागून त्या एका ध्यासापायी वेडे होऊन वीरगती लाभलेले प्रतापराव गुजर अशी कितीक नावं देता येतील. अनेकांचा तर बखरीत उल्लेखही नसेल. असे कैक असतील पण त्यांना कसलीच फिकीर नव्हती. वेडे लोक इतिहास घडवतात आणि अशा वेड्यांचा इतिहास शहाणे लोक वाचतात. आज साडेतीनशे चारशे वर्षांपूर्वीचा महाराजांचा इतिहास आठवून आमच्या अंगावर रोमांच उभे राहतात, रक्त सळसळतं. 'शिवाजी महाराज की....' असं म्हणायचा अवकाश क्षणाचाही विलंब न लावता आपल्या तोंडून 'जय....' हा उद्घोष निघतो. मग ते हयात असताना, मूर्तिमंत चैतन्यरूप, साक्षात भवानी आईची तलवार समोर तळपत असताना काय होत असेल? महाराजांच्या एका शब्दावर जीवावर उदार होणारे मावळे पाहिल्यावर वाटतं आजच्या तरुणाईला या मावळ्यांची तरी सर येईल काय? अशी स्वामीनिष्ठा, कर्तृत्व, कर्तव्यदक्षपणा, अपार मेहनत आणि जिद्द आजच्या पिढीत सापडेल काय? मग काय अधिकार आहे यांना शिवजयंती साजरी करण्याचा? आजकाल शिवजयंती म्हणजे निव्वळ टाईमपास झालाय. स्पीकरवर मोठ्या (शक्यतो कर्कश्श) आवाजात गाणी लावायची समोर महाराजांचा पुतळा किंवा तसबीर ठेवायची रात्री एखादा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचा आणि उरल्या सुरल्या पैशात पार्टी करायची.... झाली शिवजयंती. शिवरायांसारखं दिसण्याचा अट्टाहास तरी कशाला? केस ऑक्सिडाइज्ड करून विक्षिप्तपणे कापून कपाळावर चंद्रकोर मिरवतात. 'क्षत्रियकुलावतंस' लिहिलेल्या हातानेच दारूचे ग्लास रिचवतात गळ्यात महाराजांची प्रतिकृती लटकवतात आणि मनात नको नको ते विचार असतात. आज असे किती तरुण आहेत जे मागितल्यावर मोकळ्या मनाने मोबाईल तुमच्या स्वाधीन करतील? आणि तो मोबाईल चाळल्यावर तुम्हाला लाजिरवाणे वाटणार नाही. नुसता वरवरचा देखावा काय कामाचा? कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा महाराजांपुढे जेरबंद करून आणली तेव्हा महाराजांच्या तोंडून काय उदगार निघावेत? महाराज उद्गारले,"जर आमच्या आऊसाहेब इतक्या सुंदर असत्या तर आज आम्हीही इतके सुंदर असतो." परस्त्री मातेसमान मानणारे शिवबा सैनिकांवर गरजले. त्यांनी सुभेदाराच्या सुनेची चोळीबांगडी देऊन पाठवणी केली.

आज प्रत्येकजण माझा राजा माझा राजा करतोय त्याचं कारण एकच. राजांनी कधीही जातिभेत, वर्णभेद केला नाही. बारा बलुतेदार आणि अठरापगड जातीतले लोक त्यांच्या पदरी चाकरीला होते. त्यांनी प्रत्येकाचा विचार केला म्हणूनच ते महाराज झाले. प्रत्येक भाषेचा आदर केला पाहिजे. प्रत्येक संस्कृती श्रेष्ठच असते. प्रत्येकाला स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान असावा. उगाच करायचा म्हणून द्वेष करू नये आणि आधुनिकतेच्या नावाखाली चांगल्या गोष्टींची मोडतोड करून सरमिसळही करू नये. ती मूळ प्रतिकृती ज्याने बनवली त्याच्या आसपास जरी फिरकू शकत असाल तरच तिला हात लावायची हिम्मत ठेवा. अन्यथा आपल्याला त्या बिघडवण्याचा काहीएक अधिकार नाही. इथे मुद्दा फक्त मराठी भाषेचा नाही तर मराठी अस्मितेचा आहे. प्रत्येकवेळी आपण जगाच्या पाठीवर मागे पडतोय. एकेकाळी कर्कश्श वाटणार पंजाबी संगीत त्यांच्या सध्याच्या पॉप स्टार्सनी जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवलंय. गुजराती माणूस त्याच्या मधाळ बोलण्याने धंद्यात सर्वांची मनं जिंकून घेतो आणि स्वतःच्या जातभाईंना मदतीचा हात देऊन त्यांचा उद्धार करतो. बिहारी लोक प्रसंगी पडेल ते काम करतात, कुठेही राहतात. आपण काय करतो? आजवर आपल्या आजोबा पणजोबांनी कितीतरी जागा जमिनी अशाच कोणाकोणाला दान दिल्या आहेत. स्वतः टॅक्सी विकत घेऊन ती बिहारी भय्यांना भाड्याने चालवायला देणारे महाभागही पाहिलेत. इतकंच कशाला दादरसारख्या भागात स्वतःचा हक्काचा फ्लॅट असताना उपऱ्यासारखं लांब कुठेतरी वसई विरारला जाऊन राहायचं आणि इथली घरं जास्त भावाने भाड्याने द्यायची हा तर अनादीकाळापासूनचा फंडा आहे. हेच करायचं तर मग व्हॉट्सअप फेसबुकवर कशाला फुशारक्या मिरवता? कशाला ते टिळे आणि माळा घालून मराठीपणाचा बनाव आणता? काय हक्क आहे तुम्हाला? सध्या गिरगावातल्या गुढीपाडव्याच्या मिरवणुकीतही अर्धे अधिक गुजराती असतात, उरलेले फोटोग्राफर्स आणि बातमीदार असतात. काय साधतो आम्ही यातून? सर्वांनी उत्तरोत्तर स्वतःची प्रगती साधली आणि आम्ही? पूर्वीपेक्षाही जास्त गाळात रुतत चाललोय. हाताच्या बोटावर मोजता येणारी काही मोजकी माणसं आहेत ज्यांनी त्यांच्या बुद्धीच्या जोरावर जागतिक कीर्ती संपादन केली आहे. मराठी लोकांकडे कल्पना असतात पण ते त्याचा खूप लवकर खुलासा करून त्याचं महत्व कमी करतात किंवा उशिरा अंमलात आणल्यामुळे त्यांच्या कल्पना दुसऱ्या कुणीतरी अगोदरच प्रत्यक्षात आणलेल्या असतात. त्यामुळे यांना मिळणार नफा नगण्य असतो मग पुन्हा दुसरी कल्पना पुन्हा तेच.... हे दुष्टचक्र सुरूच रहातं.

कर्तृत्वशून्य विचार अर्थहीन असतात. मराठी लोकांनी फॅशन करू नये, मिरवू नये, विविध भाषा शिकू नये असं मी मुळीच म्हणत नाही म्हणणारही नाही. जगात जे जे सुंदर आहे त्या त्या सर्व गोष्टींची प्रचिती घ्यावी. मनात मायबोलीचा अभिमान जागता ठेवावा आणि मराठ्यांच्या नसानसांत असलेला पराक्रमाचा वारसा पुढे चालू ठेवावा हीच श्रींचरणी प्रार्थना.

जय भवानी.... जय शिवराय....

No comments:

Post a Comment