रिटर्न गिफ्ट - भाग २

"अहो मालक.... अहो चहा तरी...." त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत आत ते दिसेनासे सुद्धा झाले.  

"काय तरी कमाल या माणसाची. चार दिवस बाहेर चाललेत तर मला सांगायची काय गरज. मी काय जेवायला येणारे यांच्याकडे. भलताच सैरभैर दिसतोय हा माणूस."  

त्याने स्वतःसाठी चहा करायला घेतला. 'सुग्रास' मधून जेवणाचं पार्सल आणलं होत. जेवून लवकरच तो झोपला. रात्री कसल्यातरी खुडबुडीनं त्याला जाग आली. त्याने घड्याळ पाहिलं. रात्रीचे दोन वाजले होते. दाराबाहेर कुणीतरी चालत होतं पण ती चाल सराईत नव्हती. लहान मूल पायात मोठ्यांच्या चपला घालून जसं चालेल तशी होती ती चाल. त्यानं कानोसा घेतला पण त्या खडखडाटाशिवाय दुसरा कसलाच आवाज नव्हता. हळूहळू तो झोपेच्या गहिऱ्या अंमलाखाली झोपी गेला. सकाळी कचेरीत निघताना त्याने सहज म्हणून समोरच्या दोन बिऱ्हाडांवर नजर टाकली. पैकी एका घरात त्याच्यासारखीच सडाफटिंग पोरं रहात होती. महिनाभर कात्री न लागल्यानं डोक्याचं वाढलेलं जंजाळ, दाराबाहेर वाळत घातलेल्या भोकं पडलेल्या बनियन यावरून त्यांची बेरोजगारी साफ दिसत होती.  आतून आवाज येत होते.

"यार तुला बोललो होतो ना चपला आत ठेव म्हणून. आता बोंबला...."


goodhgarbh , gudhgarbh , return gift , part 2


दुसऱ्या खोलीत एक मध्यमवयीन जोडपे रहात होते. नवरा बायको आणि सासरा. त्यांनाही मुलबाळ नव्हते. मग रात्री चप्पल फरफटत कोण नेत होत? चाळीच्या पायऱ्या उतरताना त्याच्या एक गोष्ट लक्षात आली. चाळीत एकही बिऱ्हाडाच्या चपला त्यानं दाराबाहेर काढलेल्या पहिल्या नव्हत्या. कदाचित म्हणूनच मालकही काल तसेच मागे फिरले, चपला काढायला नकोत म्हणून. असं स्वतःशीच म्हणून तो हसला. संध्याकाळी चाळीत पाऊल ठेवताक्षणीच त्याला जीवघेणी शांतता जाणवली. समोरची बिऱ्हाडं खोल्या रिकाम्या करून निघून गेली होती. मालकाचं बिऱ्हाड सुद्धा नव्हतं. व्हरांड्यात ब्लबचा पिवळसर प्रकाश पडला होता. जो तिथला अंधार अजूनच गडद करत होता. शांतता अंगावर येत होती. 'सुग्रास' चं पार्सल तसंच पडलं होतं. आज जेवायची इच्छाच होईना. बळेबळेच दोन घास खाऊन तो जमिनीवर पहुडला. पुन्हा कालच्यासारखीच खुडबुड. चरफडत त्यानं कूस बदलली. पण बाहेर तर कोणीच नाहीय, दोन्ही बिऱ्हाडं नाहीत. मग कोणाच्या चपला? क्षणभरात त्याच्या लक्षात आलं की तो चप्पल आत घ्यायला विसरला होता. घ्यावी का चप्पल आत? कोण असेल बाहेर? मनाचा हिय्या करून दबकत दबकत तो दरवाज्यापाशी पोहोचला. आतून दारातला झिरोचा बल्ब लावला. मरगळल्यासारखा त्याचा जेमतेम उजेड पडलेला. चप्पल त्याने काढलेल्या जागीच ठेवलेल्या होत्या. अगदी व्यवस्थित.

"पळाली वाटतं. कोणाची पोरं एवढ्या रात्री खेळतात देव जाणे."

दार लावून तो झोपला. सकाळी नेहमीच्या तयारीने कचेरीत जायला निघाला. सवयीने कुलूप लावून चप्पल घालणार तेवढ्यात....

"अरे, चप्पल? रात्री तर इथंच होत्या...."


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


अनाहूत

वारसा

No comments:

Post a Comment