अवेळ

त्या दिवशी सकाळपासूनच तिचं लेकरू रडत होतं. 

पोट दुखत असेल म्हणून ओव्याचा शेक झाला. 

हिंग लावून झालं पण त्याचं रडं थांबेना. 

एकतर कालपासून पावसाच्या पिरपिरीचा 

तिला मनस्वी वैताग आलेला 

त्यात ह्या पोरामुळे जीव मेटाकुटीला आलेला. पण दुसरा इलाज नव्हता. बाहेर पाऊस मी म्हणत होता. थकल्या डोळ्यांनी तिने कुडाला पाठ टेकली अन् तिचा डोळा लागला.


"अगं बाई, सांजावलं..."


ती लगबगीने उठली. तोंडावर पाणी मारून देवासमोर दिवा लावला. बाळ शांत निजलेला होता. तिला हायसं वाटलं. तिची स्वैंपाकाची लगबग सुरु झाली. चूल पेटवली नाही तोच बाळ पुन्हा रडू लागला. हातचं काम टाकून ती त्याला घ्यायला गेली.


"काय झालं माज्या राजाला..."


असं म्हणून तिने बाळाला दुध पाजून झोळीत टाकलं. अजूनही तो रडतच होता. किंबहुना आणखी जोरात रडू लागला.


"अरे गप की रे... काय झालंय तरी काय आज तुला....आता गप नाय बसलास तर टाकूनच देईन तुला." 


ते शब्द ऐकले मात्र पाठीचं धनुष्य झालेली तिची काटकुळी सासू डाफरली.


"अगं, असलं कायबाय बोलू नको. आमुशा हाय आज."


बाळ दमून झोपलं. त्याचा चेहरा मलूल झाला होता. तिने स्वयंपाक केला. एव्हाना नवरा घरी आला होता. जेवून, झाकपाक करुन सर्व झोपले. बाहेर पाऊस कोसळतच होता. काजळ फासल्यासारखी रात्र अजुन गडद होत होती. केरोसीन चा दिवा ढणढणत होता. त्याच्या प्रकाशात सावल्या भयाण दिसत होत्या. अचानक दारावर जोराने थाप पडली. त्या आवाजाने बाळ उठलं. रडू लागलं.


"एवढ्या रातचं कोण असंल." नवऱ्याने दार उघडलं. दारात कुणीच नव्हतं.


ती बाळाला मांडीवर घेउन झोपवण्याचा प्रयत्न करु लागली. पुन्हा दारावर थाप पडली.


"च्यामारी, काय वैताग हाय." तो पडल्यापडल्याच बडबडला.


"अहो, बघा तरी कोण हाय ते." 

अवेळ


दाराला लागूनच असलेल्या खिडकीच्या बारीक जाळीतून त्याने डोळे ताणून पाहीलं आणि त्याची बोबडीच वळली. दाराबाहेर एक स्त्री केस मोकळे सोडून उभी होती, विशेष म्हणजे एवढ्या मुसळधार पावसात उभी असूनही ती कोरडीठाक होती. ती कोण असावी याचा त्याला अंदाज आला. ती हडळ होती. तो दबकतच घरात आला. प्रचंड घाबरलेला होता.


"काय झालं. कोन हाय भायेर." तिने विचारलं आणि तेवढ्यात बाहेरून आवाज आला.


"दे! तुला नकोय तर मला दे. तुझं बाळ मला दे. घेतल्याबिगर जाणार नाय मी."


आता सगळेच चरकले. नकळतपणे आपण भलत्याच संकटाला आमंत्रण दिलंय हे तिला कळून चुकलं. तिने बाळाला उराशी घट्ट धरून ठेवलं पण आता उपयोग नव्हता.


रात्रभर दारावर थापा पडत होत्या. पहाटे कधीतरी त्यांचा डोळा लागला. सकाळी बाळाला सणसणून ताप भरला. त्याच्या अंगात रडायचंही त्राण उरलं नव्हतं. घरगुती उपाय झाले. डॉक्टर झाले पण गुण येईना. आईच्या डोळ्यांतील पाणी खळत नव्हतं. शेवटी चार पाच दिवस झाले नाही तोच बाळाने मान टाकली. ती जी कुणी बाळ मागत होती ती त्याला घेऊन गेली.

मुलांना मारा ओरडा पण तोंडून काही वाईटवावगं बोलू नका. शक्यतो तिन्हीसांजेनंतर.... पण रात्रीच्या वेळी मुलं जेव्हा दंगा करतात तेव्हा माझाही संताप होतो, आरडाओरड होते पण मग ही गोष्ट आठवते आणि माझे शब्द तोंडातच विरतात.


No comments:

Post a Comment