रिटर्न गिफ्ट - भाग ७

        "चला, आवरा लवकर. शाळेला उशीर होतोय." त्या स्त्रीला निरोप देऊन दोन्ही मुलं निघाली. तो त्यांच्या मागोमाग जात होता. दोघेही अनवाणी चाललेले. छकुलीचं दप्तर तिच्या भावाने घेतलेलं. दोघेही सावधपणे चालत होते. इतक्यात समोरून एक ट्रक भरधाव वेगात आला. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक मुख्य रस्ता सोडून वेगाने पुढे आला. अचानक झालेल्या त्या हल्ल्याने मुलं भांबावली. काही कळायच्या आतच त्या ट्रकखाली चिरडली गेली. ते दृश्य त्याच्याने पाहावलं गेलं नाही त्यानं डोळ्यावर हात आडवा घेऊन मान दुसरीकडे फिरवली. तोच रिवाइंड केल्यासारखं सर्व प्रसंग उलट मागे गेले. खोलीतला प्रकाश अंधाराच्या डोहात गुडूप झाला आणि त्याला खडबडून जाग आली.

तो घामाने निथळत होता. घड्याळ पाहिलं. रात्रीचे तीन वाजले होते. मघाशी पाहिलेलं ते स्वप्न होतं तर. म्हणजे ही त्यांचीच खोली. किती सोसलं असेल त्या कुटुंबाने? हातातोंडाशी मिळवणी करता येत नव्हती बिचाऱ्यांना. मला निदान दोनवेळा जेवायला तरी मिळतंय. किती यातना झाल्या असतील. त्याचे डोळे पाणावले. मनाशी एक खूणगाठ बांधून तो पुन्हा झोपला.


gudhgarbh , gudhkatha , return gift , part 7


सकाळी जरा उशिरा जाग आली त्याला. कामावर जावंसं वाटत नव्हतं. तो तसाच पडून राहिला. आन्हिकं आटपून बाजारात गेला. त्या दोन मुलांचं वय अंदाजे सांगून त्यानं छानशा चपला विकत घेतल्या. रात्री सर्व आवरून त्याने त्या नव्याकोऱ्या चपला दाराबाहेर ठेवल्या. अंथरुणावर पडून अधीरतेने त्यांची वाट पाहू लागला. वाट बघता बघता कधी डोळा लागला हे त्यालाही समजलं नाही. रविवार असल्या कारणाने लवकर उठायची घाई नव्हती. तरीही सकाळी लवकरच जाग आली. सकाळी दाराबाहेर ठेवलेल्या चपलांचा त्याला साफ विसर पडला. अंथरुणात लोळत पडलेला असतानाच दारावर टकटक झाली.

"कोण आहे? रविवारीही झोपू देत नाहीत मनासारखं." त्यानं त्रासिकपणे दार उघडलं.

"अहो, पाहुणे आलेत का घरी? एवढ्या चपला कोणाच्या?"

दारात मालक उभे होते आणि दाराबाहेर चपलांचा ढीग पडला होता. त्यात त्याच्या अगोदर चोरीला गेलेल्या चपलाही होत्या. क्षणात त्याला काल दाराबाहेर ठेवलेल्या नव्याकोऱ्या चपलांची आठवण झाली. त्या ढिगात तो ते जोड शोधू लागला. पण ते सापडले नाहीत. त्याने केलेल्या उपकाराच्या बदल्यात त्याला ही रिटर्न गिफ्ट मिळाली होती.


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)

No comments:

Post a Comment