रिटर्न गिफ्ट - भाग ३

        त्याने सर्व घरांसमोर चक्कर मारली. चपला नाहीत. तसाच अनवाणी खाली आला. वाटेत नवा जोड विकत घेऊन कचेरीत गेला. संध्याकाळी पुन्हा घरी आल्यावर चपला बाहेर काढल्या. रात्री पुन्हा तोच प्रकार. यावेळी त्यानं दार उघडलं नाही. सकाळी पहातो तर चपला गायब.

"काय साला नाटकं आहेत. आता पैसेही नाहीत जवळ. नवा जोड कुठून आणू."

तो तसाच अनवाणी कचेरीत गेला. संध्याकाळी येताना उसने पैसे घेऊन चप्पलचा जोड घेतला. घरी आल्यावर तो न विसरता घरात ठेवला.

"टोळी पोचलेली दिसते. इथे चप्पलचोरीचं प्रमाण एवढं असेल असं वाटलं नव्हतं."

आज 'सुग्रास' चं पार्सल नव्हतं. उधारीवर चप्पल आणल्या होत्या त्याने. महिना अखेरीस हिशेबाचा मेळ बसला नसता म्हणून गेले दोन दिवस एका बिस्किटाच्या पुड्यावर राहिला होता तो.

आज खोलीबाहेर नुसती धावपळ ऐकू येत होती. दोन लहान मुलं एकमेकांशी खेळत होती. धावायची, खिदळायची, मधेच पडायची. बराच वेळ हेच चालू होतं. तो वैतागला. झोपच येत नव्हती. या पोरांच्या आई बापाला काळजी नाही वाटत का.... खुश्शाल रात्रीची बाहेर खेळायला सोडतात. काम चालू आहे म्हणे. उपहासाने त्याने मान झटकली. ए..ए..ए..क मिनिट.... पण इथे जवळपास तर कुठलंच बांधकाम चाललेलं नाही. कोणत्या चाळीचं रिनोवेशन देखील नाही. मग इतक्या लांबून कोणती मुलं येत असतील इथे खेळायला? तो विचारांच्या तंद्रीतच होता की त्याला जाणवलं सर्व आवाज थांबलेत.

"ही..ही..ही.." त्यानं कानोसा घेतला.

"खि..खि..खि.."

"अरे कोण आहे रे....." त्याचा पारा चढला होता.


gudhgarbh , goodhgarbh , gudhkatha , return gift , part 3


वैतागून त्यानं दिवा लावला आणि दार उघडलं. पाहतो तर बाहेर कोणीच नाही. शेजारच्या घराच्या दाराशी ठेवलेल्या पाण्याच्या पिंपामागे चाहूल जाणवली. तो निर्धाराने पुढे झाला. पिंपामागे काळोख होता. त्या काळोखात चार ते पाच वयोगटाची दोन मुलं अंग चोरून उभी होती. एक मुलगा एक मुलगी. मुलीने साधासा फ्रॉक घातलेला तर मुलाच्या अंगात मळका शर्ट आणि हाफ चड्डी होती. केसांचे बॉबकट. गोंडस होते दोघंही. पण त्यांच्या चेहऱ्यावर अवकळा पसरली होती. कांती पांढुरकी पडली होती त्यांची. गोरेमोरे होऊन दोघे चिडीचूप उभे होते.

"काय रे, इथे काय करताय अशा अवेळी? आई बाबा कुठेत तुमचे? झोप नाही येत तुम्हाला?"

मुलीचा चेहरा रडवेला झाला होता. आता ती मोठ्याने भोकाड पसरणार असं वाटून तो म्हणाला,

"अरे, असं रडू नये बाळा. मी ओरडलो नाही तुला. फक्त विचारलं. हो की नाही?"

" ............ "

"थांबा हं, खाऊ देतो तुम्हाला." असं म्हणून तो खोलीत गेला. सकाळी विकत घेतलेल्या बिस्किटांच्या पुड्यातला एक पुडा घेऊन तो बाहेर आला. ते दोघंही तिथं नव्हते.

"पळाली वाटतं....."

तो खोलीत जाऊन झोपला. झोपेतही डोळ्यासमोर त्या मुलांचे निरागस चेहरे समोर येत होते. दोनच मिनिटांत त्याला गाढ झोप लागली.


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


रघ्याची बायको

दत्तकृपा 

No comments:

Post a Comment