रघ्याची बायको - भाग ३

         इकडे रघ्याला म्हातारीचा प्रताप समजल्यावर तो संतापला. तो शांताला शोधायला बाहेर पडणार तोच म्हातारीने त्याला अडवलं.

"खबरदार भायेर गेलास तर, ती येडी पोर लोढन्यागत गळ्यात मिरवण्यापरीस असाच ऱ्हायलेला चालशील मला. लक्षात ठेव एक पाऊल जरी भायेर टाकलंस तर माजा मुडदा गावंल तुला."

रघ्याचा नाईलाज झाला. एवढ्याशा कारणावरून आणि लोकांच्या भडकावण्याने शांताला घराबाहेर काढलं गेलं याची त्याला खंत वाटत होती. आता तिच्या घरच्यांना काय उत्तर द्यायचं या विचारात तो होता.

रात्र झाली. रातकिडे किरकिरु लागले. नदीकाठचा गार वारा अंगाशी लगट करत होता. इतका वेळ सामसुम असलेला तो परिसर लोकांच्या आवाजाने गजबजला. चार-पाच लोकांचा घोळका शांताच्या दिशेनेच येत होता. इतका वेळ रानातल्या काजळकाळ्या अंधाराला न घाबरणारी शांता माणसांची चाहूल लागताच घाबरली. सरसर आंब्याच्या झाडावर चढून लपून बसली. हातात बाहुली घट्ट धरलेली होती. ते लोक जवळ आले. ते चार जण होते. धोतराचा गुढघ्यापर्यंत घट्ट मारलेला काचा, खांद्याला घोंगडं, हातात कडं, डोईला पटका आणि प्रत्येकाच्या हातात तीक्ष्ण हत्यारं होती. एक दोघांकडे कसलीतरी गाठोडी होती. पेटत्या मशाली होत्या. त्यांनी हातातली गाठोडी झाडाच्या बुंध्याशी ठेवली आणि ते आपापसात बोलायला लागले. हातातल्या पेटत्या मशालींनी त्यांचे रापलेले चेहरे उजळून निघाले होते.  त्यातल्या एकाने सर्वांना थांबायचा इशारा केला आणि सर्वांना उद्देशून म्हणाला,

"ही जागा बरी हाय. वाटनी करून घेऊया इथंच. भाईर गाडीरस्ता हाय. गाव लांब हाय इथपासून. चला घाई करा. ह्या इथंच, ह्या सपाट पाथरीवर करा वाटनी."


gudhgarbh , goodhgarbh , gudhkatha , raghyachi bayko , part 3 , https://gudhgarbh.blogspot.com/2020/11/blog-post.html , गूढगर्भ , गूढकथा , रघ्याची बायको , भाग ३ , https://gudhgarbh.blogspot.com/2020/11/blog-post.html


"आरं, ही तर कुनाचीतरी कबर दिसते. दुसरीकडं कुठं जाऊया की. त्यातनं आज आमुशा बी हाय."

"आरं मर्दा, आमुशेला भीतोस व्हय रं. वाटण्या हितंच व्हनार. आता उगा कारनं दिवू नगं. सरदाराच्या कानावं गेलं तर काय खऱ्याचा नाय. चला पटपट, घाई कराया हवी."

त्याने हुकूम देताच बाकीच्यांचा नाईलाज झाला. त्यांनी हत्यारं बाजूला ठेवली. गाठोडं चौथऱ्यावर ठेवण्यात आलं. मशालींचा उजेड मंद होत चाललेला. अमराईतल्या सावल्या भिववू लागल्या. जमावातल्या एकानं गोठोडं सोडलं आणि त्यातल्या सामानाच्या चार समान वाटण्या केल्या. दुसरं गाठोडं म्होरक्याला दाखवायला म्हणून तसंच ठेवलं. त्यांच्या म्होरक्याच्या नकळत लुटलेली संपत्ती परस्पर आपसात वाटून घ्यायची तयारी चाललेली. ते चार जण दरोडेखोर आहेत हे ती समजून गेली होती. बुंध्यात ठेवलेली हत्यारं पाहूनच शांतेला घाम फुटला. तळवे घामेजले. हातांना कापरं भरलं. हाताच्या घामामुळे बाहुलीचं काजळ आणि तोंडाचं गंध विस्कटलं. फांदीवरचा तिचा तोल ढासळला. स्वतःला सावरायचा नादात तिच्या हातून बाहुली निसटली आणि नेमकी त्या गाठोड्याजवळ पडली. लोकरीचे केस, मळलेल्या सुती कापडाची साडी, काजळ पसरलेले डोळे, लाल तोंड अशा अवताराच्या त्या चार फुटाच्या बाहुलीचा तो अवतार पाहून दरोडेखोरांच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच वेळी जोराचा वारा सुटला आणि त्यांच्या हातातल्या उरल्यासुरल्या मशाली विझल्या. मिट्ट काळोख झाला.

"आरं गाठुडं उचला. हितं नीट वाटनी करता यायची न्हाई. आसू दे. पुढे भेटेल एकादी मोक्याची जागा."

सर्वांनी माना डोलावल्या. गाठोडं बांधलं. आणि आता हत्यारं उचलणार तोच त्यातल्या एकाचं लक्ष वर झाडावर गेलं. तो थरथर कापू लागला. त्यांची बोबडी वळलेली पाहून बाकीच्यांची पण नजर झाडाकडे वळवली. पाहतात तर फांदीवर एक बाई विचित्र अवस्थेत बसली होती. केस मोकळे सुटलेले, भेसूर चेहरा, कपाळाचं कुंकू पुसून कपाळभर मळवट भरलेला, रडून रडून डोळ्यातलं काजळ बाहेर पसरलेलं आणि त्यातच घरून पानाचा तोबरा भरून आल्याने तोंड लालेलाल झालं होतं. जणू काही आत्ताच कुणाचातरी घास घेऊन आली असावी. तिला पाहून त्यांच्यापैकी एकाच्या छातीत तीव्र कळ आली. तो जागच्याजागी गतप्राण झाला. शांता काहीतरी बोलणार होती पण भीतीने तिला धड तोंड उघडता येईना. त्या अंधारात तिचं तोंड विचित्र दिसत होतं. दरोडेखोरांना वाटलं झाडावर हडळ बसलीय. त्यांनी हत्यारं आणि चोरीचा ऐवज तिथेच टाकून पोबारा केला. त्यांचा मृत साथीदाराला उचलायचं भानही त्यांना राहिलं नाही. त्याला तिथेच टाकून ते पसार झाले.  


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


* रघ्याची बायको - भाग २

* दत्तकृपा

* अनाहूत

* वारसा 

1 comment: