वारसा - भाग ९

       "आहे, एक मार्ग आहे. झालं इतकं बास झालं पण आणखी निष्पाप लेकींचे बळी मी जाऊ देणार नाही. या सगळ्याचा शेवट दिसतोय मला." सुमती काहीशा निर्धाराने म्हणाली.

"नक्की काय ठरवलंयस तू?"

"हे सगळं कुठेतरी थांबायला हवं. आपण मूल जन्माला घालू. आपलं बाळ."

"नको नको, असं काही करू नकोस सुमती." शंभुनाथ रडवेला झाला होता. 

"इतके बळी घेतलेल्या सैतानाला मारायला अजून एकाचा बळी गेला तरी हरकत नाही. पण हे थांबवायलाच हवं."

"अगं पण...." विश्वनाथाच्या डोळ्यात काळजी दिसत होती.

"समजतंय मला. तोही हाच वारसा चालवणार याची भीती आहे ना तुला? मग मी माझ्या बाळाला बळी जाऊ देणार नाही. तो या वेदना भोगणार नाही. त्यापूर्वीच आपण त्याला मारून टाकू."

विश्वनाथ तिच्याकडे वेड्यासारखा बघत राहिला. खोपटाबाहेर अंधार पडला होता. रातकिड्यांची किरकिर सुरु झाली. 

"मला माहितेय तुला हे मान्य होणार नाही. विचित्र वाटेल. पण हा खेळ थांबवण्यासाठी तोच एक मार्ग दिसतोय मला. भाऊजी वृद्ध झालेलेच आहेत. ते जास्त दिवस तग धरणार नाहीत आणि तो वारसा आपल्या बाळाकडे येईल. तेच जिवंत नाही राहीले तर....."


gudhgarbh , goodhgarbh , gudhkatha , vaarsaa , part 9 , https://gudhgarbh.blogspot.com/2020/10/blog-post_20.html , गूढगर्भ , गूढकथा , वारसा , भाग ९

विश्वनाथला कोड्याची उकल समजली. दूरवर आशेचा किरण दिसत होता.

दुसऱ्याच दिवशी विश्वनाथ आणि सुमती वाड्याबाहेर पडले. गोदाक्काला तर सुंठीवाचून खोकला गेल्यागत झालं. दोघे माळरानावर राहू लागले. बघता बघता सहा महिने झाले. विश्वनाथने वाड्यावर नवा पाहुणा येणार असल्याची खबर दिली आणि वीणाला सुमतीची काळजी घेण्यासाठी आग्रहाने घेऊन जाऊ लागला. गोदाक्काने आधी समजुतीने नंतर बळजबरीने वीणाला न्यायला विरोध केला. परंतु तिचे काही चालले नाही. यदुनाथ आपला वार्धक्यातला अवतार घेऊन सर्वांसमोर येऊ शकत नव्हता. गोदाक्काने त्याला आणि वीणाला भरभरून दूषणे दिली. वाईटसाईट बोलून झालं. पण आता विश्वनाथ थांबणार नव्हता. गोदाक्काचा विरोध पत्करून तो वाड्याबाहेर पडला.

इकडे वीणा गेल्यामुळे यदुनाथ पिसाळला. वीणा जवळ नव्हती आणि तो अमरत्त्वाचा वारसाही त्याच्याजवळ नव्हता. तो आक्रमक झाला. आरडाओरडा करू लागला. आदळआपट करू लागला. भीतीने गोदाक्काच्या काळजाचं पाणी व्हायचं. तिनं त्याची खोली बाहेरून बंद केली. त्या सैतानाला पाहायची हिम्मत तिच्यात नव्हती.  शेवटी शेवटी तो शांत झाला. गोदाक्काला काळजी वाटू लागली पण ती उघडपणे काहीच करू शकत नव्हती. वाड्यातला सैतान वाड्याबाहेर हतबल होता म्हणूनच तर सुमतीने हा डाव साधला होता. यदुनाथाची जीवनयात्रा संपली. 

यथावकाश सुमती बाळंत झाली. मुलगा झाला. विश्वनाथने काळजावर दगड ठेऊन त्या लहानग्या जीवाचा गळा दाबला. जास्त कष्ट पडले नाहीत. दोघे पुन्हा वाड्यावर आले. सोबत वीणा होतीच. गोदाक्काने बाळाची चौकशी केली तेव्हा बाळ आजारपणात दगावले असे खोटेच सांगितले. सुमुहूर्तावर लहानशी पूजा घातली गेली. वाडा शुचिर्भूत झाला.

वर्षभरातच सुमतीला दिवस गेले. आणि तिला पुन्हा मुलगा झाला. 

"आता हा मुलगा पूर्णपणे वेगळा आहे बघ. माझं बाळ तो वारसा चालवणार नाही." सुमती समाधानानं म्हणालीविश्वनाथला हायसं वाटलं.

"पण त्याला कुठं माहितेय त्या वारसाची लक्षणं लग्नानंतर दिसायला लागतात ते...." दाराआडून गोदाक्का पदरात तोंड लपवून हसत होती.


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


* वारसा - भाग ८

* अनाहूत

* दत्तकृपा 

2 comments:

  1. गूढगर्भ
    वेबसाईटचे नाव खूपच भारीये....
    बॅकग्राउंडचा तो उंच झाडांचा फोटो भीतीची लहर निर्माण करणारा
    वारसा आणि अनाहूत ह्या भयकथा तर मनाला आणि पूर्ण शरीराला भीतीने थरकाप उडवायला लावणाऱ्या आहेत
    खूपच छान उपक्रम आहे
    आणखीन भयकथा जरूर पोस्ट करा
    आम्ही वाट पाहतोय
    अगदी स्तुत्य उपक्रम.

    ReplyDelete
    Replies
    1. माझ्या कथा आवडीने वाचल्याबद्दल आभारी आहे. तुमची प्रतिक्रिया फारच बोलकी आहे. असा वाचकवर्ग गूढगर्भला लाभला हे मी माझं भाग्य समजते. धन्यवाद.

      Delete