रघ्याची बायको - भाग ४

         शांता हळूच खाली उतरली. मोठ्या प्रेमाने तिने बाहुलीला उचललं आणि सासरी जायला निघाली. चोरांनी चोरीचं सामान तिथेच टाकलेलं. तिची नजर त्यावर गेली. "काय करावं घ्यावं का? आपण नाही घेतलं तर दुसरा कोणीतरी घेईलच ना? मग मीच घेते." असा विचार करून तिने ते गाठोडं उचललं आणि घरचा रस्ता धरला.

बाहेर पडताना जी भीती वाटत होती ती पार नाहीशी झाली होती. त्या गाठोड्यात काय असेल हा विचार तिला सतावत होता. घरी गेल्याशिवाय ते उघडता येणार नव्हतं. ती घराजवळ आली. दार ठोठावलं. नेमकं रघ्यानंच दार उघडलं. तिला समोर पाहताच त्याला खूप आनंद झाला. सासू बाहेर आली. शांतेला समोर पाहून तिचा पारा चढला. ती काही बोलणार एवढ्यात शांता तिला म्हणाली, "सासूबाई, मी काय आणलंय ते बघा तरी आधी."

काहीतरी आणलंय म्हटल्यावर सासू शांत झाली. तिने शांतेला घरात घेतलं आणि फणकाऱ्याने बोलली, "काय आणलंयस? हे बोचकं? कुठं गेलतीस भीक मागाया?

रघ्या इतका वेळ गप्प होता. आईला विनाकारण शांतेवर डाफरताना बघितल्यावर त्याने आईला शांत राहायचा इशारा केला आणि शांतेच्या हातातलं गाठोडं घेतलं. तिघेही त्याच्या भोवती बसले. गाठोडं चांगलंच जड लागत होतं. रघ्याने ते सोडलं. क्षणभर त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यात मौल्यवान दागिने, चांदीची भांडी, रोख पैसे, सुटे माणिक मोती आणि हिरे सुद्धा होते. हा सर्व ऐवज पाहून रघ्याने आधी त्या सामानाची चौकशी केली.  


gudhgarbh , goodhgarbh , gudhkatha , raghyachi bayko , part 4 , भाग ४ , गूढगर्भ , गूढकथा , रघ्याची बायको , https://gudhgarbh.blogspot.com/2020/11/blog-post.html


"अहो, त्या चोरांनी माहित नाही कुठून कुठून हे चोरीचं सामान जमवलेलं. मी झाडावर बसलेली. अचानक माझ्या हातून सासूबाई पडल्या." म्हातारीनं डोळे वटारले.

".... म्हंजे माजी भावली पडली. त्यांनी वर बगितलं आन मला भूत समजून पळाले पार गावाभायेर. ते परत येतील म्हणून मी तिथना पळाले नि आले घरी."

"पण येक गोष्ट बाकी बरुबर वळखली बग त्या चोरांनी. तुला भूत समजले.... न्हाई तसंबी कंची बाई येवड्या रातीला गावाभायेर येकली फिरल?" म्हातारी फिदीफिदी हसायला लागली.

"म्हंजे हा चोरीचा ऐवज हाय तर." रघ्या खात्रीनं म्हणाला.

एवढा ऐवज आयुष्यात पहिल्यांदाच पाहिल्यामुळे म्हातारीचे डोळे फिरले. ती लाडात येऊन शांताला म्हणाली,"गं बाय, आज पायल्यांदा येवडा मोटा तीर मारलास तुजी दृष्टच काडाया हवी. चल, घरात चल. आन रग्या, या गोष्टीची खबर भायेर कुनाला लागाया नको. शांते, गप ऱ्हायचं. काय.... नायतर उगा बोभाटा करशील."

रघ्यापण एवढी संपत्ती पाहून हरखला. त्याने शांतेची पाठ थोपटली. शांत मनाने तिघे झोपी गेले. इकडे शांतेच्या दार ठोठावण्याने अक्काच्या सुनेला जाग आली होती. तिने सहजच बाहेर डोकावल्यावर शांताला मोठ्या गाठोड्यासकट दारात उभी पाहिली होती. दिसली. तिने दुसऱ्याच दिवशी याची खबर काढायचं ठरवलं.

आता शांतेची सासू तिच्याशी नरमाईने वागू लागली. तिला स्वैपाकात जातीने मदत करू लागली. पण शांताला स्वैपाक येऊ लागला होता. अजूनही ती तिच्या बाहुलीला जीवापाड जपत असे. तिच्यामुळे तर त्यांना ती संपत्ती मिळाली. रघ्या आज शेतावर गेलाच नव्हता. त्या ऐवजी नदीकाठची जमीन विकत घ्यायच्या खटपटीस लागला. नदीकाठी थोडी जमीन विकत घ्यावी, तिथे मळा लावावा, झालंच तर हंगामी पिकं घ्यावीत असं बऱ्याच वर्षांपासून त्याच्या मनात होतं.  त्याची ही इच्छा आता पूर्ण होणार होती.


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


* रघ्याची बायको - भाग ३

* दत्तकृपा

अनाहूत

* वारसा

No comments:

Post a Comment