रघ्याची बायको - भाग १

         महिन्याभरापूर्वीच रघ्याचं लग्न झालं. त्याची बायको शांता बाजूच्याच गावातली. चाळिशीला आला तरी रघ्याचं लग्न जमेना. त्याच्या काळजीने त्याच्या म्हातारीला रात्री झोप लागायची नाही. मग शांताचं स्थळ सांगून आलं. शांता तशी स्वभावाला बरी होती. जणू गरीब गायच. पण घरकामात अगदी गोगलगाय. स्वैपाकात तर आईची मदत घेतल्याशिवाय तिचा स्वैपाक पुरा झाला नाही कधी. तिला नटायची आवड होती. पावडर टिकली तर नेहमीचीच. शिवाय डोळ्यात भरपूर काजळ. तिच्या केसात एखादा गजरा नाहीतर फूल हमखास माळलेलं असे.

तिची आई नेहमी म्हणायची,"शांते, स्वतःहून काम करायला शिक की. सासरी कसं व्हायचं. मला न्हेनार हायेस का पाठराखनीला."

तसं शांतेचं लग्नाचं वय केव्हाच उलटून गेलेलं. तिशी ओलांडली होती तिने. तिचं लग्न ठरलं आणि तिच्या आईच्या जीवाचा घोर कमी झाला. हो, फक्त कमी झाला. नाहीसा नाही झाला. शांतेचं सासरी कसं होणार ही चिंता होतीच की तिला. लग्नाचे सोपस्कार पार पडले. सासरी तिला सासूची पानाची चंची सापडली. पान खायचं नवंच व्यसन तिला लागलं. तिचं नटणं मुरडणं सुरूच होतं पण स्वयंपाकात सुधारणा नव्हती. सुरुवातीला नव्याची नवलाई म्हणून सासू तिला प्रत्येक कामात मदत करायची. मग हे रोजचं झालं. तरी रघ्याच्या आईला तिने पुरता ओळखलं नव्हतं.

महिना सरत आला तरी शांता सासूचं शेपूट सोडेना तेव्हा म्हातारी दरडावून म्हणाली, "गं बये, आल्या दिवसापास्ना बघतेय, तुला एकटीला काम करायला जमत न्हाई का? हे किती टाकू, ते किती टाकू, तांदूळ किती घेऊ, पीठ किती घेऊ. अग तुझा तुला अंदाज येत न्हाई का? आ? आवशीनं पार लाडात वाढवलेली दिसते. तरीच आजून लग्नाची ऱ्हायलीस."

शांता तिला प्रत्युत्तर देत नसे. सासूने मदत करायची बंद केली की तिची तारांबळ उडायची. कधी भाजी खारट तर कधी तिखटजाळ, कधी चपात्या वातड तर कधी भात कच्चाच काढायची. हे राम! रघ्या या सगळ्यात कधी लक्ष घालत नसे. कान भरून भरून म्हातारीने पार भुगा करून टाकलेला त्याच्या डोक्याचा. त्याला या उचापतींमध्ये लक्ष घालायला वेळच नसायचा. शेतावरची कामंच एवढी असायची की त्याला बाकी कुठे बघत बसायला वेळच नसायचा. एकदा शांतेच्या शेजारची अक्का आणि तिची सून बसायला म्हणून आलेली. बघता बघता आणखी दोन चार बाया जमल्या. ओटीवर गप्पांचा फड रंगला.

"गं.... शांते, जरा च्या कर की फक्कड." अक्काने फर्मान सोडलं.

"च्या होय.... मी करते की.  शांतेला दुसरी कामं हायती. झाली का गं कामं सगळी." रघ्याची म्हातारी बोंबलली.

"कसली कामं? समदी कामं आटपूनच तर बसलीय मी हितं. काय ऱ्हायलं असल तर सांगा की." शांता भोळेपणाने म्हणाली.


gudhgarbh , goodhgarbh , raghyachi baayko , part 1 , https://gudhgarbh.blogspot.com/2020/10/blog-post_28.html , रघ्याची बायको , भाग १ , गूढगर्भ


"आगं तुज्या हातचा तर रोजच पितो, मला तुज्या सुनेचा हातचा च्या हवाय. जा गं शांते तू. आन म्हातारे, तू बस हितं. येल ती."

शेजारणीला चहा हवा होता आणि तोही रघ्याच्या बायकोच्या हातचा. रघ्याची म्हातारी लगोलग उठली तसं अक्काने तिला हाताला धरून पुन्हा खाली बसवलं.

शांतेला कळत नव्हतं कुठून सुरवात करावी. साधा चहा करायला तिला एवढा विचार करावा लागत होता. त्यातून तो परक्या व्यक्तीसाठी करायचाय म्हणून ती अजूनच बावरली होती. गडबडीत तिने पातेलंभर पाणी चुलीवर ठेवलं. साखर बुक्की घालून ते खळाखळा उकळलं.

"गं.... शांते. झाला की न्हाई च्या? आन लवकर. म्हातारे, आगं मी काय म्हनत व्हते...." अक्का परत गप्पांत मश्गुल झाली.

कसाबसा चहा तयार झाला. शांता बाहेर आली. इतकी भीती तर तिला रघ्या पाहायला आलेला तेव्हाही वाटली नव्हती. तिला पाहताच अक्काचा चेहरा उजळला. रघ्याच्या म्हातारीच्या कपाळावर आठ्या उमटल्या. कारण चहा कसा झाला असेल याचा अंदाज फक्त तीच लावू शकत होती. अक्का ने हसत हसत पहिला घोट घेतला आणि तिचं तोंड कडवट झालं.

"का वं.... काय झालं?" अक्काच्या सुनेनं विचारलं.

"आगं, च्या मिटाचा केलाय तुज्या सुनेनं." रघ्याची म्हातारी शांताकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहत होती. शांतेच्या काळजाचं पाणी पाणी झालं.

"भवाने, लक्ष कुठं असतं गं तुजं, कवा सुदरायची तू...." असं म्हणत तिने शांताला झोडायला सुरुवात केली.

"रोजच समदं फुकट जातंय. दादला मिनिश्टर हाय व्हय तुजा? भायेरना सोनं आनायचं आन घरात माती करून खायचं...." म्हातारी हातवारे करून बोलत होती. बराच वेळ तिच्या तोंडाचा पट्टा चालू होता.


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


* अनाहूत 

दत्तकृपा

वारसा 

1 comment: