अनाहूत - भाग ६

"आवं, या घाटाचं रस्त्याचं काम चालू व्हतं. कंत्राटदार मेला राक्षस व्हता. जरा त्या मजुरांना बसू द्यायचा न्हाय की झोपू द्यायचा न्हाय. मजुरांमध्ये काय काय बायाबी व्हत्या. तवा मी हितंच हुतो कामाला. दिसभरात कोन्या कामगाराला शिवी हासडली नाय, नायतर पेकाटात लात मारली नाय तं त्याला घशाखाली घास नाय जायचा दुपारी. मी त्याला डबा घेऊन जायचो दुपारच्याला. रतिलाबी कदिकदी आमचा शंकर जायचा नायतर मी. त्या कातळावर त्यो कंत्राटदार खुर्ची टाकून बसायचा. समूर एक झाड हुतं. त्या झाडाला एक पोरगी तिच्या चार म्हैन्याच्या पोराला झोळीत टाकून काम करायची करायची. पोरगीच हुती. येकटी ऱ्हायची नि पोराला टाकून काम करायची. तिचा दादला दिसला नाय तिच्यासंग.पर येक पोरगा हुता सोबतीला. धा-बारा वर्साचा असल. तो बी कामासाठीच आलता इते. कोण न्हवतं बिचाऱ्याला. दिसभर मरमरेस्तो काम करायचा नि सुट्टीला तिच्या ल्हान लेकराला संबालायचा. पोरगा हुशार व्हता पर तब्येतीने बेताचा हुता. त्याला जीवावरचं काम जमायचं न्हाय. कंत्राटदार सांगल त्ये काम करावं लागाचं. काम केल्याबिगर पैकाबी मिळायचा न्हाय. बिचारा, पुरा दिसभर काम करून गाठीला पैका ठिऊन तसाच झोपायचा. म्या कदी उरलं सुरलं घेऊन येयाचो त्येच्यासाटी. तेव्हा कळी खुलायची.

कंत्राटदारानं आरामासाठी येक खोपटं बांदलं हुतं. येकदा रातीला कंत्राटदार जेवाय बसनार हुता. म्या डबा ठेवला आन बसलो. त्यो राक्षस डबा उगीडणार येवढ्यात त्याला कसलीतरी आठवण झाली. खिसा चाचपत तो त्या झोपडीत ग्येला. हिकडं मी बसलेलो तर माज्या बाजूला त्ये पोरगं कदी येऊन हुबं ऱ्हायलं मलाच म्हाईत न्हाई. न्हेमीसारखा त्यो पिपाला टेकून हुबा ऱ्हायला आन सटकन बाजूला झाला. पिप गरम डांबरानं भरलेला हुता. धडपडत बाजूला झाला तर नेमका डब्याला पाय लागला डबा उलाटला आन पिसाटला न्हवं राक्षस. तडातडा आला आन त्या पोराच्या कानशिलात लावल्या. मरेस्तोर मारला त्याला. म्या मदे पडलो तर मलाबी ढकलून दिलान. लईच पेटला हुता. कायबी करून मन भरना तवा त्यान काय केलं असल? त्या पोराला उचलून गरम डांबराच्या पिपात टाकला. जीव गेला वो त्या पोराचा. भायेर यायला बघत हुतं ते लेकरू, बोंबलत व्हतं पर त्याला जर्रा दया नाय आली. त्यान मला धमकी दिली जीवे मारायची म्हनून गप ऱ्हायलो.


गूढगर्भ , गूढकथा , अनाहूत , भाग ६ , https://gudhgarbh.blogspot.com/2020/09/blog-post_12.html , gudhgarbh , goodhgarbh , gudhkatha , anahut , part 6

"त्याचा आणि या केसचा काय संबंध?" तावडे नोकरावर भडकले.

"सबंध हाय सायब, थेट सबंध हाय."

"ज्या दिशी ते पोरगं मेलं त्याच्या दुसऱ्या दिशी कंत्राटदार डंपरखाली येऊन मेला. त्याला अपघात समजून इसरले समदे. तंवर रस्त्याचं काम बी झालेलं. मग त्याचं खोपटं बी तोडलं. समदं मोकलं करून मजूर वापस गेले. त्यानंतर एकदा म्या तितं गेलो हुतो. ते झाड, जिथं ती पोरगी तिच्या बाळाला झुल्यात निजवायची ते पार मेलं हुतं. कालंठिकार पडलं हुतं. अजुनबी तसंच हाय ते. त्या जागेत एकदीस रातीचा गेलतो. गिरनाची रात हुती बगा. त्या जागत येक झोपडी हुती. कालूख हुता म्हून म्या ब्याटरी लावली आन गेलो. ब्याटरी चालू केली आन जवल गेलो पर कोन असल्याचा मागमूस न्हवता तितं. पायाला कायतरी चिकचिकीत लागत हुतं. दोनेक मिंटानी ब्याटरी इझाली. मग कंदील लावला तर तो बी टिकंना. ह्या काय परकार म्हनायचा. घरात जाम कालूख हुता. आत पाय टाकनार येवड्यात दार उगिडलं. समूर चांदन्यात तो उबा हुता. तो पोरगा. पार डांबरात न्हायला व्हता. नजर कोरी. लागला की मला घरात वडाया. पाय चिकटलं हुतं. पलताबी येना. म्या जोर लावला आन आय भवानीचं नाव घेऊन पार झाडाजवल पलालो. लई शिव्या घातल्या. अडीनडीला म्या खायाला द्यायचो आन माज्यावरच उलाटला. म्या जवल करायचो न हा सूड उगवाय बगत हुता. तवापासून म्या तीतं जानं कायमचं टाकलं बगा. घाट पार करायचा असल तर दुसऱ्या कुनाला तरी जाया सांगतो. येकट्याला जायची हिम्मत व्हत नाय."

"हाऊ इज इट पॉसिबल? डॉक्टर, चला. आपल्याला बहुतेक घाटातच याची उत्तरं सापडतील."

"तावडे, तुम्ही या गोष्टी लाइटली घेतल्या तर हा गुंता कधीच सुटणार नाही. कधीकधी आपल्या आकलनापलीकडच्या गोष्टी अस्तित्वात असतात मग तुम्ही मान्य करा अथवा करू नका."

डॉक्टरांनी तावडेंना समजावले आणि नोकराकडे वळून म्हणाले,

"तुला काय वाटत, या सगळ्यातून निघण्याचा काही मार्ग असेल का? सर्व केसेसमधले खून ग्रहणाच्या दिवशीच झालेत. तू गेलेलास त्या दिवशी सुद्धा ग्रहण होतं. ते घर एरवी तिथे नसतं...." 

"….पर ते झाड तर असतंय." डॉक्टरांचं वाक्य मधेच तोडत नोकर उद्गारला.

"येस, असू शकतं. बॉडीवर सापडलेला काळा पदार्थ त्या झाडाला लागला होता. तू म्हणतोस तो मुलगा गरम डांबरामध्ये पडून मेला. तुला दिसला. त्या पठारावरच्या झोपडीपाशी गेल्यावर पायाला चिकट काहीतरी लागतं.... इफ आय एम नॉट रॉंग, त्या झाडातच खरी गोम आहे. जस्ट वेट...."

डॉक्टरांनी लॅपटॉप उघडला आणि पुढच्या चंद्रग्रहणाचा दिवस शोधला.

        "तावडे, हे पहा. पुढचं चंद्रग्रहण आजपासून बरोब्बर पंचवीस दिवसांनी आहे. तेव्हा या दिवशीच जाऊन आपण ते झाड कायमचं उध्वस्त करू. त्यानंतर हा सावल्यांचा खेळ निश्चितच थांबेल." हॉटेलवरच्या नोकराला ग्रहणाच्या दिवशी भेटायचं आश्वासन देऊन दोघे निघाले. 



(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


* अनाहूत - भाग ७

* दत्तकृपा  


No comments:

Post a Comment