अनाहूत - भाग ३

डॉ. एन चंद्रा यांच्या वातानुकूलित कक्षात डॉक्टर आणि इन्स्पेक्टर तावडे बसले होते. डॉ. चंद्रा म्हणजे साडेचार फुटाची उंची, फ्रेंच बियर्ड कट, डोळ्याला राऊंड फ्रेमचा चष्मा, डोक्याच्या मधोमध पडलेल्या टकलावर खुरटलेल्या गवंतासारखे असलेले केस आणि त्याला साजेसा गोल गरगरीत चेहरा. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांचं डॉ. चंद्रा हे नाव सार्थ झाल्यासारखं वाटायचं. इन्स्पेक्टर तावडे त्यांच्या अगदी विरुद्ध. सहा फूट उंची, धिप्पाड देहयष्टी, जाडजूड मिशा, देखणा चेहरा आणि रुबाबदार बांध्यामुळे ते पोलीस कमी आणि नट जास्त वाटायचे. नुकतीच त्यांची वाघळोली गावाहून हिंजवणीला बदली झाली होती. तावडे आणि डॉक्टरांचा स्वभाव जरी टोकाचा असला तरी दोघांची काम करण्याची पद्धत एकसारखी होती. बऱ्याचदा दोघांचं एकाच गोष्टीवर संगनमत होत असे.
"ऐन घाटात रस्त्याच्या वरती पठारासारखा भाग लागतो. पार कातळ आहे तिथे. पावसाळ्यात डांबरासारखा काळा कुळकुळीत दिसतो तो. तिथेच दिवसाढवळ्या मृतदेह सापडतात. मृत व्यक्तींपैकी बहुतेकांच्या गाड्या असतात म्हणजे माणसं सधन असतात. ही बहुतेक चौथी केस आहे." डॉ. चंद्रा सिगारेट शिलगावत म्हणाले.
"पोलीस तपास चालू आहे. माथेफिरू दरोडेखोर असावेत असा प्राथमिक अंदाज आहे." 
"सर्वांना वाटतं पण ते तसं नाही आहे. तावडे ही तुमची हिंजवणीतली पहिली केस आहे. या आधीच्या तीन केसेस माझ्याकडेच होत्या. तीच जागा, तीच वेळ आणि मृतदेह एकाच स्थितीत सापडण्याची ही चौथी वेळ आहे. दरोडेखोर असते तर लोकांच्या महागड्या वस्तू तशाच राहिल्या असत्या का? शिवाय बॉडी कशी सुकत चालल्यासारखी आक्रसल्यासारखी दिसते. नीट पाहिली तर त्यावर कसलेतरी डाग लागलेले दिसतात. हे कुणा माणसाचं काम नाही." डॉ. एन. चंद्रा चष्मा सावरत म्हणाले.
"म्हणजे तुम्ही डॉक्टर असून देखील थोतांडावर विश्वास ठेवता?" तावडेंच्या रुंद कपाळावर आठ्या पसरल्या.

गूढगर्भ , गूढकथा , अनाहूत , भाग ३ , https://gudhgarbh.blogspot.com/2020/08/blog-post.html , gudhgarbh , goodhgarbh , anahut , part 3

"नाही, मुळीच नाही. पण निसर्गावर मात्र माझा पूर्ण विश्वास आहे. आजही निसर्गात काही अगम्य गोष्टी आहेत ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही."
"व्हॉट डू यू मीन टू से?"
"तिथे पहिल्यांदा मिळालेली केस. मि. देवधर आणि त्यांच्या मिसेस. वयस्कर जोडपं होतं. ते कुठे सापडले? घाटाच्या बरोब्बर मध्यभागी. त्याच पठारावर. नंतर कोण होते ते...? तिघे कॉलेजकुमार, अभ्यासासाठी आलेला खगोलतज्ज्ञ आणि आता या मुली."
"ओह, येस येस. घाटात सापडलेल्या दोन तरुणी. त्यातली एक तर फेमस रायटर होती. ह्म्म्म, तिच्या बेपत्ता होण्यानेच तर हे सर्व उघडकीस आलं." बसल्याजागी तावडे कपाळावर हाताची मूठ आपटत होते.
"पोस्टमार्टेमचे रिपोर्ट्स आलेत. त्यावरून स्पष्ट होतं की सर्व मृत्यू कसल्यातरी जबरदस्त मानसिक धक्क्यामुळे झालेत. बॉडीवर साधा ओरखडाही नाही. तरीही अजून पूर्ण गोष्टीचा उलगडा होणं बाकी आहे."
"या व्यक्तींच्या शरीरावर ते डाग कसले? असं वाटतं ग्रीस लागलंय. तुम्ही पहिले असतीलच."
"हो, पाहिलेत ते. ते ग्रीस नाही डांबरासारखा काहीतरी चिकट पदार्थ आहे तो. असाच पदार्थ मला त्या कातळावर दिसला होता. त्या वठलेल्या झाडावर. तुम्हाला एक गोष्ट सांगायचीय. कदाचित तुमचा विश्वास नाही बसणार." डॉक्टर खुर्ची ओढून तावडेंजवळ बसले, "सर्व बॉडीजच्या हाडांमध्ये तोच काळा पदार्थ सापडलाय जो पठारावरच्या वठलेल्या झाडात सापडला होता. आता हे शास्त्र कोणत्या दरोडेखोरांना अवगत आहे?"
तावडे बुचकळ्यात पडले.
"त्या पठारावर कसलीतरी अमानवीय शक्ती आहे. जी इतरवेळी रस्त्यालगतच्या वठलेल्या झाडात वास्तव्य करते. तिची बाहेर पडण्याची ठराविक वेळ असावी. त्यानुसार मी माझा वेगळा निष्कर्ष काढला आहे. आतापर्यंत तुम्ही माझ्याकडे तिथल्या जेवढ्या केसेस आणल्या आहेस त्या सर्वांमध्ये एक समान गोष्ट आहे. सर्व मृत्यू ग्रहणाच्या काळात झालेले आहेत. चंद्रग्रहण.... तुमची हरकत नसेल तर आपण पुन्हा एकदा लोकेशन वर जायचं का?"
"व्हाय नॉट.... जाऊया की. उद्या सकाळीच निघू."


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)





No comments:

Post a Comment