रघ्याची बायको - भाग ७

        बराच वेळ झाला. पण कोणी माणूस यायचं नाव घेईना. ती कंटाळली. तितक्यात लांबून माणसांचा आवाज येऊ लागला. ती माणसं जवळ येत होती. अक्काची सून फांदीवर सरसावून बसली. दरोडेखोर जवळ आले. त्यांच्या हातात हत्यारं, मशाली आणि चोरीचं सामान होतं. त्यांनी गाठोडं त्या पाथरीवर ठेवलं. तेवढ्यात अक्काच्या सुनेने बाहुली सरळ त्या गाठोड्याच्या दिशेने फेकली. दरोडेखोरांनी  वर पाहिलं. यावेळी त्या टोळीचा सरदार टोळीसोबत होता. अक्काची सून गोरीमोरी झाली. काय करावं तिला सुचेना. यापुढेही शांतेनं सांगितल्यासारखंच घडेल असं तिला वाटलेलं पण तिचा अंदाज फसला. यावेळी दरोडेखोर घाबरले नाहीत. त्यांनी तिला आवाज दिला.

"ए बाई.... ये. अश्शी खाली ये. जरा आमाला तरी बगु दे भूत कसं असतंय ते. मागच्यायेळी बघितलं न्हवतं  न्हवं."

तिने कसलीही हालचाल केली नाही. चिडीचूप बसून राहिली. पण टोळीचा सरदार हार मानायला तयार नव्हता. त्या किर्रर्र अंधारात पुन्हा एकदा त्याचा आवाज घुमला.

"बाई, खाली येतेस की झाडाला चूड लावू?"

ही मात्रा बरोब्बर लागू पडली. अक्काची सून नाईलाजाने सरसरत खाली उतरली. दरोडेखोरांचा एकंदर आवेश पाहून ती लटलट कापायला लागली.

"आरं हे भूत तर चळाचळा कापतंय की. काय गं ए.... काल तूच हूतीस ना झाडावर? आमचा साथीदार तुज्यामुळं मेला, आमच्या सामानाचं काय केलंस बोल....  बोल नायतर जित्ती न्हाय जाऊ द्यायचं आज तुला."

दरोडेखोरांचे शब्द ऐकून तिने त्यांच्यापुढे लोटांगण घातले. ती गयावया करू लागली. रडू लागली.

"अवं काल रातच्याला बगितली ती मी न्हवती. शांता हुती."

"आता ही शांता कोन?"

"रघ्याची बायकू."

"ती तू न्हवतीस मग तिच्यावानी हितं कशापाई बसलीस झाडावर? राखन कराया?" सर्व दरोडेखोर दात काढून हसू लागले.


gudhgarbh , goodhkarbh , gudhkatha , raghyachi baayko , part 7 , भाग ७ , रघ्याची बायको , https://gudhgarbh.blogspot.com/2020/11/blog-post_9.html , गूढगर्भ , गूढकथा


"ते मला कायबी ठावं न्हाय. आमचा ऐवज गेला तो गेला. तो काय आमी आजपन लुटून आनलाय. पण आमचा साथीदार परत येनार हाय का? ते काय नाय, आज हिला शिक्षेबिगर सोडायची न्हाय. हिला असंच सोडलं तर गावात आपला दरारा ऱ्हानार नाय. उद्या शेंबड पोरगं बी आपल्या वाटेल जायला घाबरायचं न्हाय." टोळीचा म्होरक्या गरजला.

"मग काय करावं म्हनता सरकार?" टोळीतल्या एकाने विचारले.

"हिचं नाक कापा आन सोडून द्या तिला. जल्माची आठवण ऱ्हाईल बाईला."

त्यांनी अक्काच्या सुनेचं नाक कापलं. तिला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून ते वाटेल लागले. तिने बाहुली तिथेच टाकली आणि घोंगडी पांघरून कशीबशी घरी परत आली. तिचा नवरा तिची वाट पाहून केव्हाच घरी गेला होता. तिला या अवस्थेत कुणी पाहिलं असतं तर नक्कीच भूत समजून घाबरलं असतं. घरासमोर येताच ती जोरजोराने दार ठोठावू लागली. तिच्या नवऱ्याला आणि सासूला वाटलं की शांतेसारखं हिलाही घबाड मिळालं. ते जड असेल पेलवत नसेल म्हणून ही जोरजोराने दार बडवतेय. अक्काने दार उघडलं आणि समोर तोंड झाकलेल्या आणि मोकळ्या हाताने आलेल्या सुनेला पाहून तिला संशय आला. तिने तिला घरात घेऊन घडला प्रकार विचारला. सुनेने सर्व वृत्तांत कथन केला आणि घोंगडी बाजूला केली. तिचा चेहरा पाहून नवऱ्याच्या छातीत तीव्र कळ आली आणि तो बसल्याजागीच गतप्राण झाला.

लालसेपायी सोन्यासारखा संसार उध्वस्त झाला. अक्काला आणि तिच्या सुनेला चांगलाच धडा मिळाला. ज्याच्या नशिबात जे असतं तेच मिळतं. कुणाची नक्कल करून कुणाचं नशीब ओरबाडता येत नाही. खरं ना?


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


* अनाहूत

* दत्तकृपा

* वारसा 

No comments:

Post a Comment