अ मिडसमर ड्रीम - भाग १

कॅनडामधील ग्रीसस नावाच्या छोट्या गावात स्टेला केटसोबत राहत होती. केटचे आईवडील विभक्त झाले होते आणि ते तिच्या शिक्षणासाठी वेळोवेळी पैसे द्यायचे. स्टेला अनाथ होती. तिचे आईवडील दोन वर्षांपूर्वी एका अपघातात मरण पावले होते. स्टेला एका फूड मॉल मध्ये पार्ट टाइम नोकरी करून तिच्या राहण्या - जेवण्याचा आणि शिक्षणाचा खर्च पूर्ण करत होती. नुकत्याच परीक्षा संपून सुट्या लागल्या होत्या. ग्रीसस मधील मे महिन्याच्या उबदार स्प्रिंगमध्ये स्टेला, फ्रॅंक, केट आणि जेम्स गाडीतून सुसाटत जात होते. रम्य सायंकाळ होती. स्टेला केट आणि तिच्या दोन मित्रांसमवेत केटच्या घरी पार्टीसाठी निघाली होते. केटच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. पण ती त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी त्यांना भेटून यायची. तशी कोर्टातर्फे तजवीज केली होती आणि त्याचीच अंमलबजावणी म्हणून गेली चार वर्षं ती नाईलाजाने का होईना पण त्यांना भेटायला जायची. त्या एका दिवशी तिचे आईवडील त्यांच्या सध्याच्या संसारातून वेळ काढून केटच्या भविष्याबाबत तिच्याशी चर्चा करायचे. तिची विचारपूस करायचे. झालंच तर खर्चासाठी काही पैसे द्यायचे. त्या पैशातून केट चार पाच महिने अगदी मजेत घालवायची. केवळ यासाठीच तर ती नाईलाजाने त्यांना भेटायला जायची. आजही ती एकटी न जाता तिच्या बाकी तीन मित्रांना सोबत घेऊन निघाली होती. तिथूनच मग ते पुढे नाइटआऊटसाठी बाहेर जाणार होते. सर्व तयारीनिशी निघाले होते. रात्र गडद होत चालली होती.

प्रवासात स्टेलाचे मित्र मजामस्ती करत होते आणि ती एकटीच पुस्तक वाचत होती. उजव्या हाताचा कोपर खिडकीवर ठेऊन दुसऱ्या हातात पुस्तक घेऊन ती वाचत होती. रस्ते मोकळे दिसत होते. पानगळीमुळे झाडं निष्पर्ण झाली होती आणि रात्रीच्या काळोखात भयाण दिसत होती. स्टेला तशी स्वभावाने फारच शांत होती. धसमुसळेपणा आणि मस्तीखोरपण तिच्यात नव्हते. तरीही तिने या तिघांसमवेत मैत्री टिकवून ठेवली होती हे एक कोडेच होते.   


गूढगर्भ , गूढकथा , अ मिडसमर ड्रीम , भाग १ , gudhgarbh , goodhgarbh , a midsummer dream , part 1


केटने तिला अचानक आपल्या पर्समधून एक पुस्तक काढून दिले. ते पुस्तक तिला कॉलेजच्या वाचनालयात मिळालं होतं पण ते पुस्तक वाचनालयाचं नव्हतं. तिने ते न वाचताच तिच्या बॅगेत टाकलं. मुळात तिला वाचनाची आवड नसल्याने तिने ते स्टेलाला देऊ केलं. स्टेलाचं अगोदर वाचत असलेलं पुस्तक पूर्ण होत आलेलं. तिने केटच्या हातातलं पुस्तक उत्सुकतेने घेतलं. जवळपास शंभरपानी पुस्तक होतं ते. पुस्तकाचं मुखपृष्ठ खूपच विचित्र आणि गूढ होतं. त्यावर अंधाराच्या पार्श्वभूमीवर जत्रेतील उंच आणि मोठा आकाशपाळणा दाखवलेला होता, आजूबाजूला जत्रेतली खेळणी तीही जखमी अवस्थेत दाखवली होती. खाली रक्ताचा सडा पडलाय आणि त्यात एक व्यक्ती उभी आहे असं चित्र होतं. त्या व्यक्तीचं चित्र फारसं स्पष्ट नव्हतं. निव्वळ काळी मानवाकृती दाखवली होती त्यात आणि मधोमध पुस्तकाचं नाव लिहिलेलं होतं 'अ मिडसमर ड्रीम'. पुस्तकाच्या अगदी तळाशी लहान अक्षरात डिस्क्लेमर दिले होते पण स्टेलाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. तिने पान उलटले. पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात लिहिले होते.... 'वेलकम'. पुढील पानावर सूचनावजा ताकीद दिली होती - 'एकदा पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर मधेच थांबता येणार नाही. हा एक खेळ आहे, कोणती गोष्ट नाही.'

एकूणच खतरी सुरुवात झाल्यामुळे स्टेला थोडी घाबरली. पुस्तक बंद करायचा विचार तिच्या मनात आला. त्या विचारातच तिने पुढची ओळ वाचली -

...."तुम्ही या पानापर्यंत पोचला आहात म्हणजेच पुस्तक उघडण्याची चूक तुम्ही केलीय. तर आता पुन्हा परत मागे फिरता येणार नाही. बेस्ट ऑफ लक फॉर युअर जर्नी."

तिला हे फारच विचित्र वाटलं आणि तिने केटला पुस्तकाबद्दल काही सांगण्यासाठी म्हणून मान वर केली तर तिचे सर्व मित्र एका रंगीत दिव्यांच्या होर्डिंगपाशी थांबले होते. ती लगबगीनं त्यांच्याजवळ गेली. तेव्हा सर्वजण एका सुरात ओरडले.... "सरप्राईझ...." स्टेलाला काहीच कळेनासे झाले. तिने त्या बाबतीत केटला जाब विचारला.

"ओ कमॉन स्टेला, इथे जत्रा भरलीय. मिडनाईट नंतर एंट्री फ्री आहे. लेट्स गो...."

"पण तुझे पेरेंट्स? ते वाट बघत असतील ना?" स्टेलाने काळजीने विचारले.

"माझे वडील तर मागच्या महिन्यातच एक्सपायर झाले. त्यांनी त्यांची सर्व संपत्ती माझ्या नावे केली आहे. सो नाऊ बी कूल…. ऍन्ड एन्जॉय…. वी आर वेटिंग फॉर यू." केट उत्साहाच्या भरात किंचाळली.

"जत्रा? आत्ता? समरमध्ये कोणती जत्रा भरते? मी तर कधीच ऐकलेलं नाही याबाबत."

"तू खूप बोअरिंग आहेस. आता जास्त वेळ न घालवता आमच्यासोबत चल."

"स्टेला, प्लिज जॉईन अस. तसंही केटने खोटंच सांगितलेलं तुला. आमचा प्लॅन आधीच ठरला होता." फ्रॅंक म्हणाला.

".................." स्टेला निरुत्तर झाली. गाडीत एकटं बसून राहण्यापेक्षा यांच्यासोबत गेलेलं बरं हा विचार करून ती आत जायला तयार झाली.




(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)

No comments:

Post a Comment