दत्तकृपा

मी आणि श्रुती अगदी जिवलग मत्रिणी. दुपारच्या टळटळीत उन्हात बागेत खेळत होतो. तहान लागली म्हणून दोघी पाणी प्यायला भटवाडीत शिरलो. तिथे आमच्या कोणी मैत्रिणी नव्हत्या. मग जवळच्याच एका इमारतीत घुसलो. आम्ही एकेक घराचा कानोसा घेत होतो. बहुतेक सर्व वामकुक्षी घेत होते. पहिला मजला गेला. दुसरा गेला. तिसरा आला. इथे इतर मजल्यांपेक्षा जरा जास्तच काळोख होता. आम्ही वर गेलो. समोरासमोर दोन खोल्या होत्या. पहिल्या खोलीचं दार वाजवलं. दोन क्षण शांततेत गेले. एका साठीच्या आजीने दरवाजा उघडला. आम्ही दचकलोच. दारात तोंडाचं बोळकं झालेली म्हातारी डोळे वटारून उभी होती. बाहेर आलेल्या केसांचे तुरे, अस्ताव्यस्त साडी आणि तिच्या मोठ्या डोळ्यांमुळे भयाण वाटत होती.

"आजी, पाणी द्या ना प्यायला." इति मी.

तिने आम्हाला आत घेतले. डाव्या हाताला स्वयंपाकघर होते. त्याच्याच बाजूला हॉल. इथे एव्हढा काळोख कसा. भर दुपारी पडदे लावून मुद्दाम केल्यासारखा काळोख आहे हा. असो, आजी झोपल्या असतील म्हणून असेल कदाचित. मी मनोमन विचार करत होते.   



"बसा. मी पाणी आणते." आम्हा दोघींना हॉलमध्ये बसवून ती पाणी आणायला गेली.

श्रुती म्हणाली, "दुसरीकडे कुठेतरी गेलो असतो ना पाणी प्यायला. ही आजी बघ कसली डेंजर वाटतेय."

"चूप गं, डेंजर काय.... आता सर्वजण झोपलेत. आणि खालच्या मजल्यावर ते बागेत भेटणारे काका राहतात. शिवाय आमच्या शेजारच्या काकू इथे जवळच कामाला येतात. त्यांनी बघितलं तर घरी सांगतील. मार पडेल उगाच त्याचं काय?"

इकडे तिकडे बघत आम्ही आजीची वाट बघत होतो. बराच वेळ झाला तरी आजी येईना. मग म्हटलं एकदा बघून तर येऊ म्हातारी काय करतेय ते. आम्ही हळूच स्वयंपाकघरात डोकावले. गॅसवर पातेल्यात काहीतरी रटरटत होतं. आजी ओट्याशी उभी राहून ते ढवळत होती.

"काय यार, पाणी द्यायचं सोडून ही काय शिजवत राहिलीय. चला, त्यापेक्षा घरी जाऊ."

आम्ही तिला सांगायला जाणारच होतो की तिने गॅसखालचा खण उघडला आणि त्यातून एक मानवी मुंडकं बाहेर काढलं. ते पाहून माझ्या काळजाचं पाणी झालं. श्रुती तर गारच पडली. त्या खणात अजून बरीच मुंडकी होती. बहुतेक म्हातारी आमचीही तीच अवस्था करणार होती.

बाहेर पळून जावंसं वाटत होतं. दरवाजा समोरच होता पण जणू पाय गोठले होते. आजीने हातात मोठा सुरा घेतला. अरे देवा, आता कोणत्याही क्षणी ती मागे फिरणार.... देवा.... वाचव रे.... (दत्त) महाराज, प्लिज यातून सोडवा. तिचे लक्ष नाही हे पाहून आम्ही हळूच दरवाज्याजवळ गेलो पण लॅच उघडता येईना.

"आई गंऽ.... उममम्ऽऽ.... आआआऽऽ...." आम्ही दरवाजाशी झगडत होतो.

शेवटी एकदाचा तो दरवाजा उघडला. बाहेर आलो तर खालच्या मजल्यावर आमच्या ओळखीचे काका दिसले. वाटलं आता काही धडगत नाही. इतक्या दुपारी खेळतोय म्हणून ओरडतील. पण ते उलट म्हणाले,"काय गं, इथे काय करताय? अभ्यास नाही? घरी जा. उगाचच फिरत बसू नका."

हुश्श.... त्यांच्या रूपात जणू (दत्त) महाराजच आले होते माझी सोडवणूक करायला.

दोघी धडाधड जिने उतरलो. डोळ्यांवर लखकन ऊन आलं. एकदम अंधारी आली आणि डोळे उघडताच मी माझ्या लाडक्या बिछान्यात होते. बापरे..! किती भयानक स्वप्न.


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)

1 comment: