वारसा - भाग ५

         "काही वर्षांपूर्वी वाड्यात आताइतकी सुबत्ता नव्हती. कुलकर्ण्यांची सावकारकी नुकतीच नावारूपाला आली होती. पण वाड्याचा वंश टिकत नसे. एवढ्या अमाप संपत्तीला वारस हवाच या उद्देशाने माझ्या वडिलांनी-दादांनी अघोरी विद्येची उपासना सुरु केली. तेव्हापासून वाड्यावर चित्रविचित्र प्रकार सुरु झाले. अंगणात कधी कावळ्यांची दाटी असायची तर कधी अपरात्री घराच्या तुळईवर घुबडाचा अशुभ घुत्कार घुमायचा. एकदा वाड्यावर एक काळं मांजर जखमी अवस्थेत आलं. ते कुठून आलं याची कुणालाच माहिती नव्हती. दादांनी त्यावर उपचार केले. हळूहळू ते मांजर बरं झालं. दादा रात्री त्यांची उपासना करत होते. तेवढ्यात ते मांजर तिथे हजर झालं. क्षणात त्यानं मानवी रूप धारण केलं. दादा पाहतच राहिले. असा चमत्कार त्यांनी याआधी कधीच पहिला नव्हता. हा साधासुधा माणूस नाही हे एव्हाना त्यांच्या लक्षात आलं होत. तो माणूस सिद्ध मांत्रिक होता. दादांनी त्यांची इच्छा त्याला बोलून दाखवली."

"अरे, तुझी साधना पूर्ण होत आलीय. त्याचं फळ तुला मिळणारच आणि माझी सेवा करून तू मला संतुष्ट केलंस. तुझी इच्छा पूर्ण करायला मी तुला मदत करेन." 

मांत्रिकाच्या बोलण्याने दादांना हुरूप आला. ते मनोमन खुश झाले. थोड्याच दिवसात त्या मांत्रिकाने दादांना उपासनेसाठी तयार केलं. ज्या दिवशी उपासना पूर्ण झाली त्या दिवशी मांत्रिकाने दादांना सावध केलं.

"ही उपासना साधीसुधी नाही. अमरत्त्वाचं दान असं कुणालाही सहजी मिळत नसतं. तुला तुझा वारस मिळेल पण त्यासाठी दरवेळी एका कुमारी स्त्रीचा बळी द्यावा लागेल. त्या स्त्रीनं जितकं आयुष्य जगलंय तितक्या वर्षांचं आयुष्य तुला अधिक मिळेल. त्याकरिता तुला तिच्याशी संग करावा लागेल. जर त्या स्त्रीचं आयुष्य जगत असताना तुझा दुसऱ्या स्त्रीशी संबंध आला तर तुला पुत्रसंतान प्राप्त होईल."



मांत्रिकाने दादांच्या डोक्यावर क्षणकाल हात ठेवला आणि डोळे मिटले. त्याची मुद्रा चिंतीत दिसत होती. त्याने डोळे उघडले आणि म्हणाला,

"अरे, तुझी जीवनरेषा तर या सप्ताहापर्यंतच आहे. ती संपायच्या आत जर तुझा कोणा स्त्रीशी संबंध आला तर तुझं आयुष्य काही वर्षे वाढील. पण लक्षात ठेव ते पूर्णतः अमानवी असेल. तुझा अंत या सप्ताहातच होईल. पुढील आयुष्य हे तुझ्या आजवर केलेल्या साधनेचे फलित असेल. आणि हो, जर तुला तुझं आयुष्य वाढवायला कुणी स्त्री मिळाली नाही तर हा अमरत्त्वाचा वारसा तुझ्या पुत्राकडे जाईल अन्यथा वाड्यातल्या दुसऱ्या वारसाच्या पुत्राला लाभेल. मग त्याची इच्छा असो वा नसो. शुभं भवतु !" दादा हात जोडून नतमस्तक झाले. वाड्यातून ती काळी मांजर उडी मारून बाहेर पळाली."

"एवढं सगळं घडलंय या वाड्यात? इतकं अभद्र? विश्वा..... आपण हा वाडा सोडून जाऊ. मला नाही राहायचं इथे. मला फक्त तू सोबत असलास तरी पुरेसं आहे."

"अगं, असं कसं. वाड्याचा दुसरा वारस मीच नाही का. यदुनाथाला मुलबाळ नाही अजून. तो मरण्याआधी जर आपलं मूल जन्माला आलं तर ना जाणो त्यालाही हा वारसा मिळायचा."

"पण मग तू माझ्यापासून दूर का पळतोस. मला नीट सविस्तर सांग."

"दादांचा मोठा मुलगा यदुनाथ. धाकटा मी. यदुनाथाचं हे तिसरं लग्न. अगं हा शाप आहे चुकणारा. माझी पहिली वहिनी शारदा. अवघी दहा वर्षांची होती. दोन वर्ष सुरळीत गेली. मग कुठं बेपत्ताच झाली. दुसरी पुष्पा. तिचंही तेच. तीही जवळपास त्याच वयाची होती. तिचं नेमकं वय ठाऊक नाही. पण तिचा मृत्यू मला समजला होता. तरीही मी तिला वाचवू शकलो नाही."

"काय झालं त्यांना?"

"शारदा वहिनी घरातून नाहीशा व्हायच्या आधी यदुनाथ बेपत्ता झालेला. पुष्पा वाहिनी तशा लहानच होत्या. गोदाक्काजवळ झोपायच्या. ऋतुमती झाल्यानंतर त्यांना रीतसर यदुनाथाजवळ झोपता येणार होतं. तो घरी नव्हता. किमान आम्हाला तरी तसंच भासवलं गेलं होतं. मी शेतमालासाठी अधून मधून दूरच्या बाजाराला जायचो. यावेळी मात्र घरीच होतो. ती पावसाळी रात्र होती. वारा सुटला होता. वाड्याबाहेर विजेचं तांडव सुरु होतं. वहिनी यदुनाथाच्या खोलीत आल्या ते मला समजलं कारण मी माडीवर होतो. मला वाटलं काही कामासाठी म्हणून पाठवलं असेल गोदाक्काने. दार लावल्याचा आवाज झाला. मला वाटलं यदुनाथ आत नसावा. मी सहजच खाली उतरलो तोच वहिनींची अस्पष्ट किंकाळी ऐकली. मी दार ठोठावले पण पावसाच्या आवाजाने ऐकू गेले नाही. वहिनींचा आवाज वाढत होता. त्या ओरडत होत्या. मी दार तोडूही शकत नव्हतो. मग तसाच पळत माडीवर गेलो. तिथे पडलेला पत्र्याचा डबा घेऊन त्यावर चढून पाहू लागलो. आत जे काही दिसलं ते काळीज गोठवणारं होतं."


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


अनाहूत

* दत्तकृपा 

2 comments: