वारसा - भाग ४

लग्नाला दोन महिने झाले. दिवसेंदिवस यदुनाथराव अशक्त आणि निस्तेज दिसू लागले. घरातल्या कामांची विभागणी झाली. वीणा लहान असूनही समंजसपणे वाड्याचा कारभार पाहू लागली.

"यदुनाथा, आपल्याकडे फक्त दहा महिने शिल्लक आहेत. आता जे काही व्हायचं ते लवकरात लवकर व्हायला हवं."

"पण 'ती' वेळ आल्याशिवाय काहीच करता यायचं नाही मला." यदुनाथरावांचा भारदस्त आवाज शांतता चिरत गेला त्यांच्या निस्तेज चेहऱ्यावर आठ्या पसरल्या.

वीणा सुमतीच्या खोलीत झोपायची. विश्वनाथ रात्री माळरानावरच असायचा. शंभू वाड्यामागच्या खोलीत. गोदाक्काची खोली ऐसपैस प्रशस्त होती. यदुनाथरावांना एरवी माडीवर राहायला आवडत असे. परंतु आता त्यांना सूर्यप्रकाश सहन होईनासा झाला. ते दिवसा दारं खिडक्या बंद करून अंधारलेल्या खोलीत पहुडलेले असत. प्रकाशाचा कवडसाही त्यांना सहन होत नसे. रात्रीच्या अंधारावर मात्र त्यांची सत्ता चालायची. मैलोनमैल दूर होत असलेल्या हालचाली त्यांना साध्या डोळ्यांनीही स्पष्ट दिसत. दूरवर टाचणी पडलेली खोलीत बसूनही त्यांना ऐकू येई. म्हणूनच वाड्यावर त्यांच्याविषयी कुजबुज होत नसे. त्यांचा दराराच तसा होता.

माळरानावर विश्वनाथ एकटाच बसला होता. अचानक त्याच्या खांद्यावर हात पडला. तो सुमतीचा होता.

"असा एकटाच बसून असतोस इथे. घरी का येत नाहीस." तो उठून झोपडीत गेला. सुमतीही त्याच्या मागोमाग गेली.


gudhgarbh , gudhkatha , vaarsaa , part 4 , https://gudhgarbh.blogspot.com/2020/09/blog-post_30.html , गूढगर्भ , गूढकथा , वारसा , भाग ४


"तू इथंच राहणार असशील तर मीही तुझ्यासोबत इथे राहणार. दोन्ही घरचा विरोध पत्करून तुझ्याशी लग्न करून या घरात आले ते शोभेची बाहुली म्हणून नव्हे."

"हे बघ, घरात जे चालू आहे ते कधीतरी संपेल. तुलाही माहितेय ते. पण कधी ते कुणालाच ठाऊक नाही. निदान तो देखावा पाहायला मी तरी तिथे येणार नाही. तुला निक्षून सांगतो मी."

"अरे, पण मी जवळ असले काय आणि नसले काय तुला काय फरक पडतो. एवढं प्रेम केलं तुझ्यावर. माझ्या जिवापेक्षा जास्त. आणि तू.... काय समजू या सगळ्याचा अर्थ? मी ज्या विश्वावर प्रेम केलं तो असा नव्हता."

"तू समजतेस तसं काही नाही."

"तुला कळत नाही का मला काय हवंय ते?" सुमती हट्टाला पेटली. "माझ्या तोंडूनच वदवून घेणार तू?"

सुमती विश्वनाथला घट्ट बिलगली. क्षणभर त्याचा तोल ढळला आणि तितक्याच वेगानं तो सावरला. चटका बसावा तसे त्याने तिला दूर लोटले.

"काय झालंय तुला? अरे, किती स्वप्न होती आपली आणि तू.... माहेरचे दरवाजे तर केव्हाच बंद झालेत माझ्यासाठी आता सासरचेही बंद झाले असं समजेन. हे बघ, मी शेवटचं विचारतेय. तुझा निर्णय तरी काय?"

"....................."

"ठीक आहे, मला त्या वाड्यात शोभेच्या बाहुलीचं आयुष्य जगायचं नाही. मी चालले...."

या अनपेक्षित धक्क्याने विश्वनाथ भानावर आला. चपळाईने त्याने तिचा हात धरला.

"तू गैरसमज करतेस सुमी. तुला ऐकायचंय.... जाणून घ्यायचंय मी वाड्यावर का थांबत नाही ते.... मग ऐक...."


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


अनाहूत

दत्तकृपा


No comments:

Post a Comment