अ मिडसमर ड्रीम - भाग ५

 

ते पाहून उरलेल्या तिघांनी आक्रोश सुरु केला. फ्रॅंक त्याला बाहेर काढण्यासाठी वाळूत उतरणार होता. पण तो त्या रिंगणात उडी घेणार तोच त्या वाळूत पुन्हा हालचाल झाली आणि तसाच एक हात बाहेर आला. मग असे बरेच हात त्या रिंगणातल्या वाळूत उगवले. भक्ष्य चाचपडू लागले. ते दृश्य पाहून केटला भोवळ यायची बाकी होती. पुन्हा सर्वजण तंबूतून बाहेर आले. यावेळेस त्यांना भीतीपेक्षा त्यांचा मित्र गमावल्याचं दुःख जास्त होत होतं. पुन्हा कुणाचातरी बळी जाण्यापेक्षा इथून पळ काढावा असं ठरलं. ते सर्व बाहेर पडायचा रस्ता शोधू लागले पण तो मघाचा मोठा लाकडी दरवाजा कुठेच दिसेना. तो डोअरकीपरही कुठेतरी गायब झाला होता. सुरुवातीच्या खेळात स्टेलाच्या केसांवर पडलेला चिकट स्राव अजूनही तिच्या केसात तसाच होता. त्याचा कुबट सडका वास येत होता. जत्रेतल्या खेळण्यांच्या बाहेरून तारेचं कुंपण होतं आणि त्यावर मंद उजेडाचे दिवे सोडले होते आणि मानवी मुखवटे लटकवले होते. नीट निरखून पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं ते मुखवटे नाहीत तर मृत व्यक्तींची मुंडकी आहेत. ते कुंपणाचा शेवट शोधू लागले. मुंडक्यांच्या डोळ्यांच्या हालचाली होत होत्या. त्यांनी खाड्कन डोळे उघडले आणि दात विचकत म्हणाले, "यू व'र ट्रॅप्ड. नाऊ प्ले ऑर डाय." त्यांची रक्ताने माखलेली तोंडं अजूनच भयानक दिसू लागली. घाबरून सर्वांनी तिथून पळ काढला. आपण केवढ्या मोठ्या संकटात अडकलोय याची केटला प्रचिती आली. फ्री एंट्रीच्या नादात तिने स्वतःसोबत बाकी तिघांचेही जीव धोक्यात घातले होते.


gudhgarbh , goodhgarbh , a midsummer dream , part 5 , गूढगर्भ , गूढकथा , अ मिडसमर ड्रीम , भाग ५ , https://gudhgarbh.blogspot.com/2021/01/blog-post_10.html


यावेळी पुस्तक केटकडे होते. तिने पुस्तकातला पुढला नियम वाचला.... 'प्ले ऑर पनिश.' समोरच नेमबाजीचा स्टॉल होता. स्टॉलच्या एका बाजूला आडवे पाईप बांधून स्टॉलचे दोन भाग केले होते. त्याला लागूनच एक टेबल होता त्यावर नेमबाजीची लांब बंदूक ठेवली होती. स्टॉलच्या दुसऱ्या टोकाला एकात एक असे चार वर्तुळ असलेले मोठे वर्तुळ लावले होते. स्पर्धकांनी बाहेरच्या बाजूने त्या वर्तुळाच्या मध्ये असलेला विजेचा ब्लब फोडायचा होता. वर्तुळाच्या उजव्या बाजूला बरीचशी खेळणी ठेवली होती. त्यात गाड्या होत्या, बाहुल्या होत्या, मोलू म्हणजे टेडीबियर्स होते. जिंकलेल्या स्पर्धकाला बक्षीस द्यायला म्हणून ठेवली असावीत असा सर्वांचा समज झाला. फ्रॅंकने बंदूक उचलली आणि नेम धरला. अतिउत्साहात त्याचा नेम चुकला. बंदुकीची गोळी तिथल्या खेळण्यातल्या गुबगुबीत गुलाबी रंगाच्या टेडीला लागली आणि तो खाली पडला. फ्रॅंकने झाडलेली गोळी टेडीच्या डोळ्याला लागली होती. त्याचा डोळा फुटला होता. फुटक्या डोळ्यातून रक्ताचा ओघळ वाहत होता. एक डोळ्याचा तो टेडी केविलवाणा आणि तितकाच भयानक दिसत होता.

फ्रॅंकने खाली पडलेल्या टेडीकडे न बघताच नाराजीने बंदूक पाइप पलीकडच्या टेबलावर ठेवली. तो बेसावध होता. आपण हा खेळ हरलोय त्याअर्थी शिक्षा भोगावी लागणार याची स्टेला व केटला कल्पना होती. बंदूक ठेऊन फ्रॅंक वळणार एवढ्यात त्याच्यावर मागून हल्ला झाला. कुणीतरी त्याच्यावर उडी मारली. मघाशी नेम चुकल्यावर डोळा गमावलेला टेडी त्याच्या मानगुटीवर बसला होता. एक डोळा फुटल्यामुळे त्याचा अर्धा चेहरा रक्तबंबाळ झाला होता. एवढुश्या मऊ पंजाला नखं आली होती. तोंडात करवतीसारखे काटेरी दात होते. त्याने आपले तीक्ष्ण दात फ्रँकच्या मानेत खुपसले आणि त्याचा कडकडून चावा घेतला. फ्रॅंक त्या अचानक झालेल्या हल्ल्याने गडबडला होता. वेळीच सावधगिरी बाळगून त्याने त्या टेडीला मागून पकडलं आणि लांब भिरकावून दिलं. स्टेलाने चपळाई करून टेबलावरची बंदूक घेतली आणि फ्रँकच्या दिशेने फेकली. फ्रॅंकने एकाच हातात ती झेलून टेडीवर गोळी झाडली. टेडी गतप्राण झाला. तिघांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सहज म्हणून स्टेलाचं लक्ष त्या नेमबाजीचा बोर्डवर गेलं. तिथे आता मघाच्या टेडीची जागा दुसऱ्या खेळण्याने घेतली होती.



(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


* रघ्याची बायको

* रिटर्न गिफ्ट 

No comments:

Post a Comment