रघ्याची बायको - भाग ६

रघ्याची मावशी त्याच गावातल्या टेकाडावर राहत होती. तिला एक मुलगा होता. अजून लग्नाचा होता. मावशी सुद्धा रघ्याच्या आईसारखीच रणचंडीचा अवतार होती. त्यामुळे तो लहानपानापासून मावशीकडे जास्त असा गेलाच नव्हता. अचानक भाचा दारात आलेला पाहून मावशीला आनंद झाला.

"काय रं, असा अचानक काहून आलास? घरी समदं ठीक हाय न्हवं?" तिने काळजीने विचारलं.

"मावशे, समदं ठीक हाय. आये आठवण काडत हुती म्हून म्हनलं बगुन यावं. म्हाद्या कुटं हाय."

"आस्स आस्स.... आरं म्हाद्या गेलाय वावरात, चार दिस झाले पाटलाच्या वावरात मजुरीला जातोय." मावशीनं चहा पाणी देऊन त्याचा पाहुणचार केला.

"बरं. म्हंजी चांगलं चाललंय म्हनायचं."

"चांगलंच म्हनायचं. मुखात दोन घास जातायत ते काय कमी हाय. म्हाळसाईची किरपा म्हणायची."

"मावशे, ती नदीकाठची जमीन कशी हाय गं?"

"कशी म्हंजी?"

"म्हंजी तीत शेती बिती करत्यात काय?"

"करत्यात ना. लय कसदार जमीन हाय बग ती. पयली कुणीतरी गावातल्यानंच केलेली पर आता भायेरुन लोक येऊन करत्यात शेती. पीक लै फर्मास येतंय बग तीत. इकाय काडलीय म्हनं ती जमीन. पर मॉप पैका लागतोय."


gudhgarbh , goodhgarbh , gudhkatha , raghyachi bayko , part 6


रघ्याला हवी असलेली सर्व माहिती मावशीने स्वतःच्याच तोंडून सांगितली. रघ्या निर्धास्त झाला.

"मावशे, मी इथं येऊ चार दोन दिस?"

"आरं मंग ये की. मी काय नाय म्हननार हाय व्हय तुला?"

"न्हाय म्हंजे मी येकला न्हाय. आयेला नि बायलीला बी आनीन म्हनतो संगती. आईला तुजी लै याद येते. नि शांता माजी बायकुबी लगीन झाल्यापासना कुटं गेली न्हाय. देवदर्शनाला बी न्हेली नव्हती मी तिला. म्हंजी बग चालल ना तुला?"

"आरं मंग या की. माजं खोपटं ल्हान असलं तरी माजी मानसं जड न्हाईत मला. या निवांत." रघ्याला जणू देवच पावला.

"उद्यालाच येतो."

एवढं बोलून रघ्या ताड्कन उठला आणि मावशीचा निरोप घेऊन निघाला सुद्धा. मावशी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली.

रघ्यानं त्याच रात्री त्याच्या कुटुंबासोबत घर सोडलं. तो कायमचा त्याच्या मावशीच्या गावी निघून गेला. इकडे अक्काच्या सुनेने शांतेची कहाणी आपल्या सासूला सांगितली. सासूने तिलाही शांतेसारखंच सोंग घेण्याचा सल्ला दिला. अक्काची सून बेरकी होती. तिला ही योजना पसंत पडली. त्याच दिवशी तिने एक मोठी बाहुली बनवली. अगदी तिच्या उंचीची. तिला कोळशाने डोळे काढून भेसूर बनवलं, ओठ रंगवले आणि स्वतः कुंकू लावून डोळ्यात भरपूर काजळ घालून तयार झाली. तिचा हा अवतार कुणाच्या दृष्टीस पडू नये म्हणून तिने डोक्यापासून पायापर्यंत गोधडी पांघरली होती. तिचा नवरा कंदील घेऊन तिला सोडायला येणार होता. दोघेही शांतेनं सांगितलेल्या त्या टेकडीजवळच्या झाडाजवळ जायला निघाले. तिचा नवरा तिला सोडून नदीवरच्या पुलापलीकडे कंदील घेऊन तिची वाट पहात बसला. अक्काची सून झाडाच्या मधोमध बेचकीत जाऊन बसली आणि दरोडेखोरांची वाट पाहू लागली.


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


* रघ्याची बायको - भाग ५

* अनाहूत

* दत्तकृपा

* वारसा 

No comments:

Post a Comment