वारसा - भाग १

          साधारण स्वातंत्र्यापूर्वीचा काळ होता तो. विश्वंभरपेठेत कुलकर्ण्यांचा भला थोरला ऐसपैस वाडा होता, गावाबाहेर काही एकर शेतजमीन होती. विश्वंभरपेठ सुद्धा त्यांचीच. विश्वंभर हे द्वारकानाथांचे म्हणजे दादांचे वडील. यदुनाथांचे आजोबा. आज वाड्यात लगबग सुरु होती. आनंदी आनंद होता. कुलकर्णी वाड्यात नव्या सुनेचं आगमन होणार होतं. यदुनाथरावांचं तिसरं लग्न होतं. गोदाक्काला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पुन्हा एक अभागी जीव मृत्यूच्या दारात उभा ठाकला होता.

         "वरात आली वाटतं...." शंभूनाथाने हाळी देताच गोदाक्काचे डोळे लकाकले. तिने सुमतीला आरतीचं ताट आणि तांदळाचं मापटं घेऊन यायची सूचना केली.

वीणा मनात विचारांचं काहूर घेऊन चालत होती..... "वरात नुसती नावालाच. ना वाजंत्री ना लवाजमा. एवढ्या मोठ्या मातब्बर घराची सून अशी पायीपायीच घरी यावी?"

यदुनाथरावांचं नाव साऱ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होतं. पिढीजात सावकार होते ते. वीणाच्या वडिलांकडून लग्नात एकही पैसा ना घेता त्यांनी वीणाला अर्धांगिनीचा मान दिला होता.

"काही हरकत नाही. हवी कशाला गाडी नि घोड्याची मिजास. एवढं मोठं घराणं आणि एवढ्या मोठ्या मनाचा माणूस लाभला हेच पुरेसं आहे."

वरात आली. त्या नव्या जोडप्याला पाहून विश्वंभरपेठेतल्या प्रत्येक माणसाला अचंबा वाटत होता. वाड्यात सामसूम होती. आसपासचा परिसर सुद्धा गोठल्यासारखा वाटत होता.


gudhgarbh , gudhkatha , vaarsaa , part 1 , https://gudhgarbh.blogspot.com/2020/09/blog-post_22.html , गूढगर्भ , गूढकथा , वारसा , भाग १


"काय बाई एकेकाचं नशीब, बायकोला वर्षसुद्धा झालं नाही जाऊन की लगेच नवी बायको मिळते." समोरच्या चाळीतल्या जानकी काकू कुजबुजल्या.

यदुनाथरावांनी त्यांच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला.

"अगंबाई! मी इथं बोलले ते त्याला समजलं की काय....." त्याच्या नजरेचा कटाक्ष सहन होऊन त्या पदर तोंडाला लावून लगबगीने लगबगीने घरात पळाल्या.

सुमतीने नव्या जोडप्यावरून भाकरतुकडा ओवाळला, पायांवर पाणी घातलं आणि आरती करून वीणाला मापटं ओलांडायला सांगितलं. गृहप्रवेश झाला. दिवसभराच्या शिणवट्याने दोघेही थकले होते.

"चल बाळ, तुला तुझी खोली दाखवते." गोदाक्का उसन्या मायेनं म्हणाल्या. वीणा शालू सावरत त्यांच्या मागोमाग गेली.

यदुनाथरावांची खोली वेगळी होती. गोदाक्काखेरीज ते कुणाशी फार बोलत नसत. त्यांचा स्वभाव तुसडा होता. इतकंच काय सुमती सुद्धा कधी त्यांना सामोरी जायची नाही. वीणा यदुनाथरावांहून तब्बल सत्तेचाळीस वर्षांनी लहान होती. अजूनही षोडशाच होती. सध्यातरी तिला यदुनाथरावांपासून वेगळंच राहावं लागणार होतं. यदुनाथराव स्वतःच्या खोलीत शांतपणे येरझाऱ्या घालत होते.

"यदुनाथा, आता सर्व नीट पार पडलंय ना. स्वस्थ झोप. अजून संपूर्ण एक वर्ष आहे आपल्या हातात. वीणाला तेरावं सरत आलंय म्हणत होतास ना, मग आता 'ती' वेळ काही दूर नाही." गोदाक्का काळजीच्या स्वरात म्हणाल्या. यदुनाथाने नुसत्याच भुवया आक्रसून घेतल्या.

"शंभूला सांगून उद्याच वीणाला इथली सर्व माहिती द्यायला सांगणार आहे आणि सुमती आहेच सोबतीला. तू निश्चिन्त राहा." यदुनाथाच्या कपाळावरील आठ्या विरळ होत गेल्या.


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


* अनाहूत

* दत्तकृपा 

2 comments:

  1. छान लिहिलंय की ... , सावकाशीने सर्व भाग वाचीन

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. तुम्ही तुमच्या सवडीने वाचा. हरकत नाही.

      Delete