रिटर्न गिफ्ट - भाग ४

         दुसऱ्या दिवशी कचेरीहून घरी येताना त्याने जेवणाच्या पार्सलसोबत एक बिस्किटचा पुडा घेतला. रात्री सर्व आवरल्यावर त्याने तो पूड एका पिशवीत ठेवून ती पिशवी दाराच्या कडीला बाहेरून अडकवून ठेवली. आली तर खातील पोरं....  या विचाराने त्याने दार लावून घेतलं. रात्री पुन्हा बाहेर खुसफूस चालू झाली.

"या पोरांनी ठरवलंय बहुतेक मला त्रास द्यायचं."

 बराच वेळ कूस बदलल्यावर झोप लागेना म्हणून तो बाहेर आला. कालचीच मुलं असतील असं समजून कालच्या पिंपाजवळ गेला. तिथे कोणीच नव्हतं. व्हरांड्याच्या पायऱ्यांपर्यंत गेला. कोणीच नव्हतं. तसाच माघारी फिरला तर ते दोघे व्हरांड्याच्या लाकडी कठड्यावर बसले होते.

"अरे अरे बाळांनो, पडाल की." तो लगबगीने त्यांच्या जवळ गेला. आज त्याने त्यांना जवळून पाहिलं. त्या दोघांपैकी मुलगी जरा लहानच होती मुलापेक्षा.

गोबरे गाल. लहानसे ओठ. गोंडस दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर किंचित दुःखाची छटा होती. त्याने तिला खाली उतरवण्यासाठी म्हणून उचलून घेतले. तिचा स्पर्श कमालीचा थंड होता. मुलाला उरवण्यासाठी त्याच्याकडे वळला तर तो गायब. पुन्हा मुलीकडे वळताच तो एकदम दचकला. कारण तो मुलगा तिच्या बाजूलाच उभा होता.  दोघे त्याच्याकडे शून्य नजरेने बघत होते.


gudhgarbh , goodhgarbh , gudhkatha , return gift , part 4


"अरे बाळांनो, मी तुमच्यासाठी खाऊ ठेवला होता. घेतला नाही तुम्ही?" मुलगी आपली ढिम्मच.

"खाऊ नको तुम्हाला? बरं, मग काय पाहिजे? जेवायला हवं का? आईस्क्रीम खाणार? की मलई?" तुटपुंज्या मिळकतीत स्वतःच्या पोटाची खळगी न भरू शकणारा हा इसम त्या अनोळखी मुलांची फर्माईश पुरी करणार होता. दोघे एकमेकांच्या तोंडाकडे टकामका बघत राहिले.

"बोला लवकर काय पाहिजे."

"चप्पल....." सरतेशेवटी मुलाने तोंड उघडलं.

त्यांच्या राजबिंड्या रुपाकडे पाहताना ती मुले अनवाणी आहेत हे त्याच्या लक्षात आलं नव्हतं.

"चप्पल? का रे? चप्पल नाहीत तुमच्याकडे?" त्या गोंडस मुलीकडे पाहून त्यानं काहीस आश्चर्याने विचारलं.

"अरे पण रात्री चपलांची दुकानं बंद असतात. शिवाय सकाळी मला कामावर जायचं असतं. तुम्ही सकाळी या. रविवारी सकाळी.....मला रविवारी सुट्टी असते. मग जाऊ आपण. चालेल?" त्या दोघांसमोर गुडघ्यावर बसून त्यांची समजूत काढत होता.

"..............."

"आता आधी खाऊ खा बरं."

तो दाराला अडकवलेली खाऊची पिशवी आणायला गेला. येऊन पाहतो तर हे दोघे पसार.

"पळाले....." हातातला खाऊ त्याने उद्या देण्यासाठी डब्यात ठेवला.


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


* स्ट्रेचरवरचा माणूस

* दत्तकृपा 

No comments:

Post a Comment