वारसा - भाग ७

             "थोरल्या मालकीनबाईंना म्हाईतीच न्हवतं या समद्याबद्दल. सारा कारभार त्यांच्या नजरेआड चालायचा तो बी ऐन मध्यानरातीला. एकदीस ईपरीत घडलं. गोदाक्काचा नवरा वारला आन ती वाड्यावर आली ती कायमचीच. दादांचा तिच्यावर लय जीव. तुमी बोल्लात ते समदं खरं हाय बगा. त्या सप्ताहात म्हंजे अष्टमीच्या दिसाला त्यांचा काळ येनार व्हता. त्याच्या अदुगरच त्यांनी मालकीनबाईंवर घाला घातला. त्या कुटंच सापडना. चार दोन दिसांनी मालक समोर आलं. लै राजबिंडं दिसत व्हतं. त्यो तरनाबांड गडी तिशीचा वाटायचाच न्हाई. पंधरा-सोलाचा कवला पोरंच जनू. म्या बगतच ऱ्हायलो. मालकीनबाय गेल्याचं त्यांना कायबी सोयर सुतक न्हवतं. जवलपास धा वर्स सरली. आता त्याला दुसऱ्या लग्नाची घाय झालती. तसं लगीन बी झालं. धाकल्या मालकीनबाय म्हंजे तुमची आय आली. यशोदा..... यदुनाथराव झाले. मग तुमी झालासा. जसजशी वर्सं सरायला लागली तसं दादांचं रुपडं बदलाया लागलं. ते म्हातारं दिसाया लागलं. पन ते म्हातारपन जरा इचित्रच व्हतं. कातडं पांढरंधोप पडत चाल्लेलं. डोळं खोल जाया लागलं. तुमच्या आयेचा अपघात झाला. त्या वाड्याच्या पायरीवरून खाली कोसलल्या. तितंच मालकांचं घोडं आडलं बगा. मग एकदा त्यांनी गोदाक्काला बोलावलं. बराच येळ दोघ बोलत व्हते. भौतेक ते त्यांना लग्नासाठी पोरगी बगायला सांगत व्हते. गोदाक्काचा आवाज येत व्हता कि मी ईधवा.... मी काई करू सकत न्हाई. मी यदुनाथाचं नाव ऐकलं बगा. म्हणजे म्होरला डाव त्यांनी खेळायचा असंल. मंग आता यदुनाथानं सोताचं लगीन करावं असं ठरलं कारन दादा जास्ती दिस काडू शकनार न्हवते."

"अजुनबी आटवतो तो दिस. माडीवरच्या खोलीत कसले कसले आवाज येत व्हते. ते मानसाचे वाटतच न्हवते. कोणतरी वरडत व्हतं. किचलत व्हतं. पण वर जाऊन बगायची हिम्मत कोनाच्यात न्हवती. वर्सभर ती खोली बंदच व्हती. नंतर नंतर समदं शांत झालं. आपल्या पेटेचं रुपडं बी पालटलं. यदुनाथानं लगीन करून वैनीबायला आनलं तवा ती खोली उगडली बगा. आतला नजारा किलसवाना व्हता. दादांच्या रुपातला त्यो सैतान वाट फुटल तिथून भायेर पडला व्हता. डोले जाग्यावर न्हवते. समदं आंग रगात सुकल्यागत सुकून गेलतं. समद्या भोकातून रगात व्हाऊन गेलतं आन तोंड बी सताड उगड व्हतं. म्या आन गोदाक्कानं त्यावर अदुगर कपडा टाकला. कसातरी त्याला बांदला आन परसात पुरून टाकला. त्यानं कदी तरास मातर दिला न्हाय."




"अरे कसा देणार, ते निव्वळ त्याचं शरीर होतं. आतल्या सैतानाने यदुनाथाचं शरीर मिळवलं ना."

"बरुबर बोल्लात. आपल्या पैल्या वैनीबाय अक्षी सुंदर व्हत्या दिसाया. यदुनाथराव त्यांना कदीच कुठंच एकलं सोडायचे न्हाईत. पर ते समदं त्याचं ढोंग व्हतं. बाई न्हाती-धुती झाल्याबिगर त्याला कायबी करता येत न्हवतं. एकदाची ती येळ आली आन त्यानं पैली झडप घातली."

"पण शंभू तुला कसं समजलं सगळं?"

"आरं मी माज्या डोल्यांनी पाह्यलंय समदं. आपल्या वाड्यात एक भुयार हाय. तितंच लपतात यदुनाथराव. घरच्या सुनेला काय बाय सांगत्यात आन त्या भुयाराच्या खोलीचं तोंड उगडत्यात. ते भुयार दादांच्या खोलीतच हाय. समद्या सुनांना त्या भुयाराच्या सैतानानच खाल्लंय. पैली शारदा, नंतरची पुस्पा.... आन आता..... ईनावैनी." सदऱ्याने डोळे पुसत शंभू पुढे बोलू लागला.

"आता कुटं जगदुनिया दिसनार तर या सैतानाच्या तावडीत गावलीय पोरगी. काय करावं कळंना झालंय. मी बी लय धुंडाळलं पन परत्येक येळी निराशाच पदरी आली. आपल्या गावात तर कुनीबी तांत्रिक-मांत्रिक न्हाय. गुरव न्हाय. जरा कुटं जाईन म्हनलं तर गोदाक्का जाऊन देत न्हाईत. कदीकदी वाटतं समदं टाकून, या पैशाअडक्यावर लात मारून भायेर पडावं पन आशेवर तग धरून हाय की कदीतरी थांबल समदं. पण म्या या घरचा असूनबी काय बी करू शकलो न्हाई की करू शकत न्हाई."

"शंभू, वाड्यात कोणताच नोकर फार दिवस टिकत नाही. एकतर तो स्वतःहून काम सोडून जातो किंवा गोदाक्का तरी हाकलून देते. दादांबाबत एव्हढी माहिती कुणालाच नाही. मलाही नाही. तुला दादांच्या विद्येबाबत माहित आहे? त्यांची साधना माहित आहे? जर तुला सर्व माहित असेल तर तू इथे कसा थांबलास? वाडा सोडून का गेला नाहीस?"

शंभू कावराबावरा होऊन नजर चोरत होता.

"तू काहीतरी लपवतोयस आमच्यापासून. खरं काय ते सांग. तुला वाड्याबद्दल एव्हढी माहिती कशी? दादांच्या खोलीत असलेलं भुयार कधी मी देखील पाहिलं नव्हतं मग तू तर एक नोकर. मी ऐकलंय की दादांना सख्खा भाऊ होता. रघुनाथ नावाचा. बोल, खरं काय ते कळलंच पाहिजे मला. कोण तू? वाड्याशी तुझा काय संबंध?" विश्वनाथ जरबेने म्हणाला.   

"कुलकर्ण्यांचा निर्वंश होणंच नशिबात आहे आपल्या. आता फक्त उघड्या डोळ्यांनी बघत बसणं एवढंच आपल्या हातात आहे." शंभूनाथाची अस्खलित भाषा ऐकून दोघेही चाट पडले.


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


वारसा - भाग ६ 

* अनाहूत

* दत्तकृपा 

No comments:

Post a Comment