अनाहूत - भाग ४

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच तावडे ड्युटीवर हजर झाले. चौकीच्या दारातच त्यांना गोविंद हवालदाराने कडक सॅल्यूट ठोकला. चहावाल्या पोऱ्याने अवघ्या दहा मिनिटांत त्यांच्या टेबलावर चहा आणून ठेवला.
"थँक यू गोविंदा.... बरं झालं चहा सांगितलास. डोकं जरा दुखतंय आज."
"साहेब आज लवकर आलात. केसबद्दल काय कळलं का?" 
"वरवर सरळ दिसणारी केस वाटते तितकी सरळ नाही. अजूनही महत्वाचं असं काही सापडलं नाही. तरी मी माझी चौकशी सुरु ठेवलीय. बघू काही हाती लागतंय का ते." तावडेंनी केसची परिस्थिती सांगितली.
तावडेंच्या अनुपस्थितीत घडलेल्या चौकीतल्या किरकोळ घटना आणि नोंदवलेले एक दोन गुन्हे सांगून गोविंद निघून गेला. तावडे त्यांच्या जागेवर बसून केसची फाईल चाळत बसले होते. सततच्या विचाराने त्यांचं डोकं दुखत होतं. तेवढ्यात टेबलावरचा फोन वाजला.

गूढगर्भ , गूढकथा , अनाहूत , भाग ४ , https://gudhgarbh.blogspot.com/2020/09/blog-post.html , gudhgarbh , goodhgarbh , anahut , part 4

"हॅलो, इन्स्पेक्टर तावडे बोलतोय." तावडे नेहमीच्या खर्जातल्या धीरगंभीर आवाजात म्हणाले.
"हॅलो, इन्स्पेक्टर तावडे. त्या घाटावरच्या केसचं काय झालं?" कमिशनर साहेबांचा फोन होता. ते अक्षरशः किंचाळत होते.
"सर, मी आता तिकडेच जायला निघतोय. तिथले स्थानिक लोक याबाबत तोंड उघडायला तयार नाहीत. तरीही मी आज जाऊन पाहतो काही धागेदोरे सापडतात का?" तावडेंचा आवाज एव्हाना सौम्य झाला होता.
"तावडे.... तावडे.... तुम्ही किती वर्ष डिपार्टमेंटमध्ये आहात? एका साध्या केसचे पुरावे मिळू नये तुम्हाला?" कमिशनर साहेब तावडेंवर खेकसत होते.
"हिंजवणी घाटात घडणारी ही पहिली केस नाही. या आधी अशा तीन केसेस झाल्यात तिथे. मला माहितीय हा घाट पर्यटनाव्यतिरिक्त अजून बऱ्याच गोष्टींसाठी कुप्रसिद्ध आहे. आणि हो, मीडियासमोर ही बातमी येता कामा नये. बी केअरफूल. या केसचा तिथल्या पर्यटन विकासावर परिणाम व्हायला नको. तेव्हा अक्कल गहाण ठेऊन तपास करू नका. जोखीम पत्करून तुम्हाला मी ही केस हाताळायला दिलीय. वरिष्ठांसमोर मान खाली घालायला लावू नका मला. केसची प्रोग्रेस मला रेग्युलरली रिपोर्ट करायला विसरू नका."
कमिशनर साहेबांनी खाडकन फोन आपटला. तावडेंनी मनोमन चरफडत त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली.
तावडे चहा तसाच ठेऊन डॉ. चंद्रांच्या लॅबकडे निघाले.


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


3 comments: