रघ्याची बायको - भाग ५

         अक्काच्या सुनेला रात्रभर झोप लागली नाही. शांतेनं एवढ्या रात्री कसलं गाठोडं आणलं याची उत्सुकता तिला स्वस्थ बसू देत नव्हती. सकाळी रघ्याची म्हातारी घरी नाहीसे पाहून ती गप्पा मारायच्या निमित्ताने शांतेच्या ओटीवर आली. शांता आत काम करत होती. अक्काची सून आल्याचं तिला समजलंच नाही. अक्काची सून घराच्या खिडकीतून ते गाठोडं दिसतंय का ते पहात होती. शांतेचं लक्ष जाताच ती वरमली. शांता लगबगीने बाहेर आली. शांतेनं तिचा पाहुणचार केला.

"कवा आलीस गं, अक्का कशा हायेत?"

"त्या? त्यांना काय धाड भरलीय. तुजी म्हातारी कुटं हाय?"

"सासूबाई होय? त्या गेल्यात तालुक्याच्या बाजारला. जरा खरेदी करायची हाय कापडाचोपडाची."

"काय गं, पयलं तर चार चार वर्सं म्हातारी एकच जुनेर नेसायची नि आज बरी हुक्की आली तिला कापडं घ्याची."

"व्हय गं. त्यांनी लै तरास काडलाय. आता कुटं सुखाचे घास खानार त्या."

"अगं पर तू गेलतीस कुटं? आन रातीला हातात काय घेऊन आलीस?" म्या जागी हुते काल. तुजा आवाज ऐकला म्हून इचारलं. झालं तरी काय राती?"

"ते होय? ती तर येगळीच गम्मत झाली बग. बरं तू बस हां, मी सकाळच्याला भुईमुगाच्या शेंगा भाजल्यात. घेऊन जा थोड्या."


gudhgarbh , goodhgarbh , gudhkatha , raghyachi bayko , part 5 , https://gudhgarbh.blogspot.com/2020/11/blog-post_4.html , गूढगर्भ , गूढकथा , राघ्याची बायको , भाग ५


"आग त्या ऱ्हाऊ दे. ती गम्मत कसली म्हनत हुतीस मगाशी? काय घबाड बिबाड मिळालं की काय दादाना?"

"तसंच समज...." शांता भाबडेपणाने पुटपुटली.

"म्हंजी?"

"आगं, सासूबाईंनी मला घराभायेर काडलं ना तवा.... "

भोळ्याभाबड्या शांतेनं त्या रात्री घडलेली इत्यंभूत कहाणी अक्काच्या सुनेला कथन केली. मनाशी एक खूणगाठ बांधूनच अक्काच्या सुनेनं शांतेचा निरोप घेतला. रघ्याने बाजूच्या गावातली जमीन बघून ठेवलेली. कधीपासून तो अशा जागेच्या शोधात होता. दात आहेत पण चणे नाहीत अशी अवस्था. त्याने दुसऱ्याच दिवशी आपलं राहातं घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी तो शेतावर गेलाच नाही. म्हातारीलाही रानात जाऊ दिले नाही. इथे राहण्यात धोक्का आहे हे ओळखून त्याने शांतेला आणि आईला बाहेर कुठेही न जाण्याची सूचना दिली होती. दुपारी तो दागिन्यांचं गाठोडं घेऊन एकटाच शेजारच्या गावी निघाला. वाटेत तालुक्याला त्याने त्यातले थोडे दागिने विकले. चांगले लाखभर रुपये झाले होते. कदाचित जास्तच होते. इतके दागिने पाहून सोनार त्याच्याकडे संशयाने पाहू लागला.

"सायेब, हे दागिने काय चोरून आनलेले न्हाईत. आमच्या कुलदेवतेचा परसाद हाय ह्यो. माज्या आयेच्या आयेची पुण्याई हायती. हे इकायचे न्हाईत. फकस्त मला याची किंमत किती हुईल तेवडं सांगा म्हणजे कदी येळ पडली तर अडीनडीला तुमच्याचकडं घेऊन येईन, कसं...."

रघ्याच्या साखरपेरणीने सोनार नरमला. त्याने दागिन्यांची एकूण किंमत सांगितली. ती पाच लाखाच्या वर भरली. पैसे आणि दागिने घेऊन त्याने पुढल्या गावाचा रस्ता धरला. त्या गावात गेल्यावर त्याने अगोदर ती जमीन पाहिली. सर्व व्यवहार सोयीचा आहे याची खात्री पटल्यावर त्याने जमीन मालकाला कागदपत्रं तयार करायला सांगून काही आगाऊ रक्कम दिली. उरलेली किंमत दोन दिवसांत देतो असं म्हणून तो मागे फिरला.


(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


* रघ्याची बायको - भाग ४

* अनाहूत

दत्तकृपा

* वारसा 

3 comments: