आभास

रात्री ९-९.३० ची वेळ होती. चाळीतल्या लहानशा खोलीत मित्रांची मैफल जमलेली. सर्व जेवणखाण आटोपून आरामात बसले होते. कुणी पत्ते खेळात होतं, कुणी गप्पांत मश्गुल होतं तर उरले सुरले टीव्ही पहात होते. चाळीच्या दुसऱ्या टोकाला खाली उतरण्यासाठी जिना होता. रात्री तिथे मंद दिवा चालू असायचा. डाव्या बाजूला चाळीचा गेट होता. रात्री तो बंद केलेला असायचा. पलीकडे दुसऱ्या इमारतीची मागची बाजू आलेली होती. चाळीतलं वातावरण कसं मोकळं ढाकळं असतं, त्यामुळे शेजारी सर्वांचेच दरवाजे उघडे होते. 


अचानक चाळीच्या दुसऱ्या टोकाला एक मर्मभेदी किंकाळी ऐकू आली आणि त्यापाठोपाठ एक मध्यमवयीन स्त्री पॅसेजमधून जिन्याच्या दिशेने धावत गेली. धावताना मागे लहरणारा तिचा पदर काहींच्या दृष्टीस पडला. नक्की काय घडलं ते कुणालाच समजलं नाही. सर्वकाही अगदी क्षणार्धात घडलं. सर्व घरांतून लोक बाहेर डोकावून पाहू लागले. पत्त्यांचा रंगात आलेला डाव टाकून मुलं दरवाज्याकडे पळाली.  धाड धाड जिना उतरून मुलं खाली आली आणि त्यांचा बावरलेला चेहरा पाहून तळातल्या लोकांनी त्यांनाकारण विचारलं. 


"का रे, एवढं बावरलेले का दिसताय? काय झालं?"


"अहो आत्ता इथून एक बाई ओरडत गेली ना? तुम्ही पाहिलंत का तिला?"



https://gudhgarbh.blogspot.com/2023/08/blog-post.html?m=1, gudhgarbh, aabhas, gudhkatha, bhaykatha


"कोण बाई?"


"माहित नाही कोण ती पण गेली खरी. आम्ही सर्वांनी पाहिली तिला. साडी नेसलेली होती. लगेच कुठे गायब झाली?"


"अरे अशी कुठली बाई खाली आलीच नाही. असती तर आम्हाला दिसली नसती का? मी तर इथे बाहेरच उभा आहे कधीपासून."


"अहो पण केवढ्यांदा किंचाळली ती. तेही नाही ऐकलं तुम्ही?"


"नाही रे पोरांनो. आणि ते बघा पलीकडचा गेट पण बंद आहे मग जाईल कुठे ती?"


सर्वजण विचारात पडले एकमेकांची तोंडं पाहू लागले. 


"अहो पण आम्हीही पाहिलंय तिला. तिची किंकाळी ऐकून तर बाहेर आलो सगळे." वरच्या मजल्यावरून एक काकू म्हणाल्या.


"कमालच आहे म्हणायची."


मुलांच्या आग्रहाखातर त्या गृहस्थांनी गेटवर बॅटरी मारली परंतु तिथे कुणीच नव्हतं. जर हा भास होता तर दारासमोरून धावत कोण गेलं? ती किंकाळी कुणाची होती? वरच्या मजल्यावरचे लोक एकमेकांत चर्चा करू लागले. पण जे डोळ्यांनी पाहिलं कानांनी ऐकलं त्यावर अविश्वास कसा दाखवावा विचार करकरून पोरांच्या डोक्याला मुंग्या यायची पाळी आली. तो भास त्यांना परत कधीही झाला नाही. पण मग जे दिसलं ते नेमकं काय होतं?

No comments:

Post a Comment