मला भेटलेली (देव) माणसं - २

            वाळवंटासारख्या परिस्थितीत मायेची, माणुसकीची सावली देणाऱ्या झाडासारखी काही माणसं भेटतात. आपण पुढे चालत राहतो. पण ही माणसं कायमची आठवणीत राहतात. त्यांच्या आठवणींचा सुरेख कोलाज पाहताना वेगवेगळ्या रंगाचे तुकडे नाचत असतात. त्यांनी साकारलेली प्रतिकृती डोळ्यांना सुखावून जाते.

            लग्न झाल्यानंतर मी गिरगावात राहायला आले. मी गरोदर असतानाची गोष्ट. त्यावेळी माझी मनःस्थिती ठीक नव्हती. मी खूप एकाकी झाले होते. सतत तणावाखाली असायचे. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती आलेली. नवरा सकाळी लवकर कामाला जायचा. त्याच्यासोबत मीही बाहेर पडायचे. तो निघून गेला की झावबावाडीच्या रामाच्या देवळात बसायचे. तिथे आधी काही टग्या बायकांशी माझी ओळख झाली. त्यांची वृत्ती पाहून नंतर मी त्यांना टाळायला लागले. देवळातल्या आतल्या बाकावर बसायला लागले. तिथे एक आजी नेहमी यायच्या. साधारण सत्तरीच्या असाव्यात. फिक्या रंगाच्या गोल सुती साड्या नेसायच्या. केसांची वेणी. केस अर्धे चंदेरी तर अर्धे पूर्ण पांढरे. हातात कायम कापडी पिशवी असायची.

त्यात काही निवडक स्तोत्रांची पुस्तकं, पाकीट, रुमाल आणि एखादं फळ नाहीतर बिस्किटचा छोटा पुडा असायचा. चांगल्या घरच्या होत्या त्या. मुलगा चांगला कामाला होता. सूनही चांगल्या ठिकाणी नोकरी करायची. एक नातं होती, नातू होता. कधीकधी त्यांच्या जोडीला दुसऱ्या एक मैत्रीण आजीही यायच्या. त्या लहान बाळांच्या मालिशची कामं करायच्या. फार क्वचितच त्या देवळात यायच्या. पाचेक मिनिटं बोलायच्या आणि लगेच निघूनही जायच्या पण या आजी मात्र रोज न चुकता आरतीला हजार रहायच्या.

आमची ओळख वाढली. कुणीतरी बोलायला मिळतं म्हणून मी नियमित देवळात जायचे. आम्ही खूप गप्पा मारायचो. हळूहळू एकमेकींच्या घरची परिस्थिती कळली. माझी मनःस्थिती मी न सांगताच त्यांनी हेरली होती. त्या मला नेहमी धीर द्यायच्या. म्हणायच्या, "काळजी करू नकोस. रामराया सगळं व्यवस्थित करेल." मला आमचं स्वतःचं घर असावं असं नेहमी वाटायचं. त्या म्हणायच्या, "अगं घेशील घेशील, रामरायावर विश्वास ठेव. तो कधी ना कधी तुझी हाक ऐकेलच." माझ्या वतीने त्या रामरायाला श्रद्धेनं साकडं घालत असाव्यात कारण वर्षभरातच आम्ही स्वतःचं घर घेतलं.


gudhgarbh , gudhkatha , mala bhetleli devmansa , https://gudhgarbh.blogspot.com/2021/10/blog-post.html


आजी सर्व सणवार, उपासतापास करायच्या. नातवंडांना आवडतं म्हणून घरी गोडधोड करायच्या. त्यांची सून बहुतेक त्यांच्याशी नीट वागत नव्हती. तिचा विषयच काढला नाही कधी त्यांनी. चुकून निघालाच तरी त्यांच्या कपाळावर आठ्या पडायच्या. आजींना वेगवेगळ्या गोष्टी करायची खूप आवड होती. वेगवेगळे पदार्थ बनवायच्या. भजन कीर्तनाचे तर कोणतेच कार्यक्रम त्यांनी चुकवले नाहीत. एकदा तर हद्दच झाली. रामनवमीच्या वेळेस देवळाला फुलांच्या चेंडूंची आरास केलेली. त्यांना ती आरास शिकण्याचा मोह झाला. त्या देवळात नेहमीच यायच्या. दोन दिवसांनी देवळातल्या कर्मचाऱ्यांना म्हणाल्या, "हे फुलांचं तोरण काढलं ना तेव्हा हे जे चेंडू आहेत ना फुलांचे त्यातला एक लहानसा चेंडू माझ्यासाठी ठेवा हो. मला बनवून बघायचाय." त्या कर्मचाऱ्यानेही त्यांना तिथल्यातिथे तो फुलांचा चेंडू त्यांना देऊनही टाकला. त्यांनी मला माझ्या मानसिक शांतीसाठी स्वामी समर्थांचं एक पुस्तक वाचायला दिलं होतं. एकदा मी माझ्या नवऱ्याची आणि त्यांची गाठ घालून दिली होती.  

मला मुलगी झाल्यानंतर ती दोन महिन्याची असताना मी आजींना भेटायला म्हणून नेहमीच्या वेळेत तिला देवळात घेऊन  गेले तर आजी नव्हत्या. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे चौकशी केली तर ते म्हणाले की काल तर आलेल्या. मी हिरमुसले. पुन्हा माझी मुलगी पाच महिन्यांची झाली तेव्हा पुन्हा एकदा आशेने देवळात घेऊन गेले. यावेळेस आजी भेटल्या. त्यांनी बाळाची चौकशी केली, बाळाला भरवायचे पौष्टिक पदार्थ पाककृतींसकट सांगितले, मला चार हिताच्या गोष्टी सांगितल्या.  समाधानाने मी  त्यांचा निरोप घेतला. आताशा माझं बाहेर जाणं कमी झालं होतं. अधूनमधून मी नवऱ्याला आजींबद्दल विचारी. त्याचीही भेट घालून दिलेली मी आजींशी. नंतर नंतर त्यांचं देवळात येणं कमी होऊ लागलं. त्या तिथे येईनाशी झाल्या. इतक्या दिवसात मी त्यांचं नाव, पत्ता काहीच विचारलं नव्हतं. त्यांचा उल्लेख देवळातल्या आजी असाच व्हायचा. देवळातल्या पुजाऱ्यापासून बाहेरच्या हारवाल्यापर्यंत त्या सर्वांच्या परिचयाच्या होत्या. देव आपल्यावर सतत लक्ष ठेऊन असतो. आपली काळजी घेतो. संकटकाळी धावून येतो. जेव्हा जेव्हा जिथे जिथे त्याला जात येत नाही तिथे तो अशी त्याची माणसं पाठवतो.

त्या कोण कुठल्या आजी. त्यांना काय गरज होती माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची. प्रार्थनेला पैसे लागत नाही. फारसे श्रमही लागत नाहीत. पण तरीही आजकाल दुसऱ्याच भलं चिंतणारी माणसं अभावानेच सापडतात. अशा अनुभवांमुळेच (दत्त) महाराजांवरचा माझा विश्वास दृढ झाला. ते एका गाण्यात म्हटलेल्या ओळी सार्थ आहेत.... ओळींत याचा पदोपदी प्रत्यय येतो.

मंदिरात अंतरात तोच नांदताहे

नाना देही नाना रुपी उभा देव आहे ll


(गूढगर्भ - लेखसंग्रह)

 

 

 

 

1 comment: