सहल

मी शाळेत असतानाची गोष्ट. त्यावेळेस मी पाचवीला होते. दुसऱ्या दिवशी आमच्या वर्गाची सहल जाणार होती. त्यामुळे सहाजिकच मी बालसुलभ उत्साहात होते. सहलीची सर्व तयारी झाली होती, पण माझ्या डोक्यात वेगळच टेन्शन होतं. बाबांनी वेळेवर उठवलं नाही तर ? आईला लवकर जाग नाही आली तर? त्यामुळे बराचवेळ मला झोपच येत नव्हती. शेवटी सहलीची स्वप्नं रंगवतच मी झोपले.


किती वाजलेले माहीत नाही. खिडकीबाहेरच्या इमारतींचा जेमतेम उजेड घरात पडलेला. त्या उजेडात एक पांढरी आकृती अडखळत चालली होती. केस पिंजारलेले, काटकुळे हातपाय, पांढरे कपडे आणि लांबसडक बोटं. काळोखात तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. हळूहळू ती आकृती हॉल मधून चालत किचनमधे गेली आणि बाबांजवळ जाऊन वाकली. तिने बाबांना स्पर्श केला मात्र बाबांनी आरडाओरडा करत मोठ्याने बोंब ठोकली. 


https://draft.blogger.com/blog/post/edit/preview/31355566884577878/1263000932472138315


मग काय…पटापट घरातले दिवे लागले. काय झालं…काय झालं… म्हणत सर्वजण उठले. मी बाबांना झोपेतून उठवू लागले. त्यांच्या तोंडून भीतीने शब्द फुटत नव्हता. 


मग मीच बोलले,"बाबा, मला जरा लवकर जाग आली म्हणून तुम्हाला उठवायला गेले," पण बाबा उलट माझ्यावर डाफरले आणि क्षणात सर्व गोष्टीचा उलगडा झाला.


सहलीमुळे मला काही केल्या झोप येत नव्हती. झोपेतही डोक्यात सहलीचेच विचार होते. त्यामुळे मला लवकर जाग आली. बाबा उशिरा उठवतील म्हणून म्हटलं आपणच त्यांना उठवावं. डोळे चोळत, अडखळत किचनमधे गेले आणि बाबांना हात लावला…पण दिवा लावायला विसरले. मी फ्रॉक घातलेला तोही नेमका पांढरा. बाबा मुळातच भित्रे, ते मला भूत समजले. करायला गेले एक आणि झालं भलतंच.


गूढगर्भ - गूढकथासंग्रह

No comments:

Post a Comment