लालुच

दहा बारा वर्षांची शाळकरी पोर 'सोनी'. घरची परिस्थिती बेताची. भाऊ लहान, आजी, वहिनी व मोठ्या भावाची सहा मुलं पदरात. मोठा भाऊ वारलेला. मुलं शिकत होती. त्यामुळे घरखर्च चालवण्यासाठी ती धुणीभांडी करायची. झोपडीतली घरं. तिची कामं आसपासच्या वाडीत होती. घरी यायचा शॉर्टकट रस्ता एका बागेतून जात होता. लोकांना बागेचे वाईट अनुभव आलेले होते. रात्री कामं आटपून येताना कधी साडेदहा अकरा वाजायचे. पण सोनी तशी धीट होती.


अशीच एकदा ती रात्री कामं आटपून घरी येत होती. हातात कामावरच्या उरल्यासुरल्या अन्नाची पातेली. पावसाची भुरभुर. म्हणून ती घरी जायची घाई करत होती. शॉर्टकट रस्त्याने लवकर घरी पोहचू म्हणून तिने कुंपण ओलांडून बागेत पाय टाकला. तेवढ्यात तिला लहान बाळाचा आवाज आला. घसरगुंडी जवळ साधारण सात आठ महिन्यांचे बाळ मजेत खेळत होते. त्याचा गोरा रंग नजरेत भरत होता. तिने बागेत सभोवार नजर टाकली. एवढ्या लहान बाळाला कोण बरं सोडून गेलं असेल. नाही...असतील त्याचे आई बाबा इथेच कुठेतरी. बराचवेळ वाट पाहूनही कोणीच आले नाही. पातेली धरल्यामुळे हाताला रग लागली होती.


लालुच , https://draft.blogger.com/blog/post/edit/preview/31355566884577878/1033278675986794635

आता ते बाळ हळूहळू रांगत जवळच असलेल्या मोठ्या झाडाआड गेले. तिने विचार केला. आपल्याकडे तर वहिनीला फक्त मुलीच आहेत. हे बाळ आपण घरी नेलं तर घरचे खुष होतील. किती छान गुटगुटीत बाळ आहे. ही जेवणाची भांडी घरी ठेवून मी लगेच परत येईन.


पळतच ती घरी आली आणि आईला म्हणाली, 


"आए, अगं बागेत ना कोणीतरी बाळ विसरून गेलंय. ते आपण आणूया? नायतरी वैनीला सारख्या पोरीच होतात. आणूया आपण?" सोनी काकुळतीने म्हणाली. 


आई काय समजायचं ते समजली. म्हणाली, 


"गंऽऽ रांडं... वाजलंत बग किती. या वक्ताला कोन येतंय पोरं खेलवाया. तो जागेवाला हाय. तुला लालुच दावतोय. जाव नको." 


तिच्या अंगावर भितीने शिरशिरी आली. त्यानंतर अशा देखाव्याला ती कधीच बळी पडली नाही. दुसरा कोणी असता तर पुन्हा त्या रस्त्याने जायला घाबरला असता. पण तिला जाणं भाग होतं. बागेतल्या भुताटकीपेक्षा कुटुंबाच्या दारिद्र्याची भीती तिला जास्त होती.


(गूढगर्भ - कथासंग्रह)

No comments:

Post a Comment