अ मिडसमर ड्रीम - भाग २

जत्रेच्या त्या मोठ्या लाकडी दाराला एक लहानसा पोटदरवाजा होता. त्यातून चौघे आत गेले. प्रवेशदारापाशी एक विदुषकासारखे कपडे घातलेल्या माणसाने त्यांना हटकले आणि एक पुस्तक दिले आणि घोगऱ्या आवाजात म्हणाला, "हे पुस्तक फॉलो करा. यात जत्रेची नियमावली लिहिलेली आहे...."

"नियमावली? जत्रेत पण नियम पाळावे लागतात?"

".... या जत्रेत पाळावे लागतात. ही फक्त नियमावली नाही तर हा एक खेळ आहे. इथे प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला हा खेळ खेळावाच लागतो." एवढं बोलून त्याने ते पुस्तक फ्रँकच्या हातात दिले. त्याने त्याचे मुखपृष्ठ पहिले आणि आतला मजकूर वाचून म्हणाला, "ओके." इतर सर्वांनी त्याला दुजोरा दिला आणि समोर पाहतात तो मघाचा पुस्तक देणारा विदूषक नाहीसा झाला होता. फ्रॅंक नजरेनेच त्याला शोधू लागला. जत्रेत निरनिराळी खेळणी होती. वर्तुळाकार फिरते घोडे, रुळांवर उलट सुलट फिरणारी अळीसारखी लांबलचक ट्रेन, उंचच उंच आकाश पाळणा आणि इतरही बरीच खेळणी होती. पण त्या सर्व खेळण्यांचे रंग फिके पडले होते. त्यांची रया गेली होती. बहुतेक आपण रात्री आलोय त्यामुळे असे वाटत असेल असे समजून प्रत्येकजण स्वतःची समजूत घालत होता.

कुतूहल म्हणून स्टेलाने त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहिले. त्यावर नाव होते.... 'अ मिडसमर ड्रीम'. हे तेच पुस्तक होते जे तिला गाडीत केटने दिले होते. तिला हे विचित्र वाटू लागलं. विचारांती तिच्या लक्षात आलं की ती पुस्तक वाचत गाडीतच बसलेली. मग गाडी थांबली कधी? सर्व बाहेर उतरले कधी? आणि आपली एवढी तंद्री लागली तरी कशी? सर्वजण यंत्रवत चालत होते. जशी काही त्या जागेची त्यांना भुरळ पडली होती. जागोजागी रंगीत दिव्यांची सजावट केली होती. पण ते दिवे खूपच मंद होते. त्यामुळे वातावरणात एकप्रकारचा भकासपणा भरून राहिला होता.


gudhgarbh , goodhgarbh , a midsummer dream , part 2 , गूढगर्भ , गूढकथा , अ मिडसमर ड्रीम , भाग २


"मला वाटतं आपण इथं यायला नको होतं. या जत्रेचं नाव या आधी कधी ऐकिवात आलेलं नाही. इथे कुणी माणूस देखील दिसत नाही. ही अशी जत्रा?" स्टेला वैतागून म्हणाली.

"माय डिअर, एवढ्या रात्री इथे कोण येणारे खेळायला? प्लिज डू मी अ फेवर अँड डोन्ट बी अफ्रेड." केटने स्टेलाला समजावलं. 

पुस्तक फ्रँकच्या हातात होते. त्याने खेळाचे नियम वाचायला सुरुवात केली. पहिला खेळ होता.... 'हाईड ऑर डाय'.

"हा नियम आहे?" केटने आश्चर्याने विचारलं.

"काय माहित.... यात तर असंच लिहिलंय."

"पण नेमकं आपण करायचं तरी काय त्या गेटकिपरने काहीच सांगितलेलं नाही. आता कुठे गायब झाला तो?"  जेम्स वैतागून म्हणाला. तो पुरता गोंधळून गेला होता. आसपास कुणी दिसतंय का ते पाहण्यासाठी म्हणून तो वळला आणि दचकला. त्याला खेटूनच मघाशी गेटपाशी भेटलेला विदूषक उभा होता.

"ओह, बरं झालं तुम्ही भेटलात. हे नियम कसे आणि कुठे वापरायचे त्याबद्दल जरा सांगाल का प्लिज." फ्रॅंकने आर्जवी स्वरात विचारलं. बाकीचे सर्व इथेतिथे विखुरले होते. जत्रेतील खेळणी निरखित होते.

"पुस्तकाच्या सुरुवातीपासूनच खेळ सुरु होतात आणि त्यासोबत त्याचे नियमही. तुम्ही जिथे कुठे उभे असाल तिथूनच खेळाला सुरुवात होईल. वर ठळक अक्षरात लिहिलेलं वाक्यच खेळाचा नियम आहे आणि नाव देखील. हे नियम कसे पाळायचे आणि अडथळ्यांपासून कसं सुरक्षित राहायचं हे त्यात दिलेलं आहे. पण ते वाचून अंमलात आणायला तुमच्यापाशी फार कमी वेळ असेल. सर्व खेळ खेळून जो सुरक्षित राहील तोच जत्रेतून बाहेर जाऊ शकेल."

"म्हणजे? इज इट ए जोक? जस्ट टाईमपास म्हणून आम्ही इथे आलोय. तेही फ्री एंट्री आहे म्हणून. पेनल्टी भरायला आमच्याकडे एक छदामही नाही." फ्रॅंकने सद्यपरिस्थिती सांगितली.

"कळेल.... एकदा खेळाला सुरुवात करा. पैशांची गरज नाही. फक्त तुम्ही असलात म्हणजे झालं." विदूषक गूढ हसला आणि पाठमोरा होऊन चालू लागला. अंधारात दिसेनासा झाला.



(गूढगर्भ - गूढकथासंग्रह)


No comments:

Post a Comment